प्रशासकीय धोरणे
प्रेषक युयुत्सु (शुक्र, 03/16/2007 - 19:02)
सर्वप्रथम ह्या नवीन संकेतस्थळाबद्दल आपले अभिनंदन !
या आधीच्या अशा प्रकारच्या संकेतस्थळांनी केलेल्या चुका आपण दुरुस्त कराल असा विश्वास सदस्यांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी आपण आपले प्रशासकीय धोरण स्पष्ट करावे असे मला वाटते.
मला ह्या संकेतस्थळाविषयी काही प्रश्न आहेतः
- हे स्थळ सदस्यांसाठी नेहमीच फुकट राहील का ?
- ह्या स्थळाचे प्रशासक, प्रकाशक कोण आणि किती ?
- संपादन लेखनपूर्व की लेखनोत्तर ?
- वाढत्या सदस्यसंख्येला सामावून घेण्यासाठी प्रशासनाने काय उपाय योजिले आहेत ?
- प्रशासन सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्वरेने देतील का ?
- शुद्धिचिकीत्सकाच्या सुविधेबद्दल प्रशासनाने योजना केली आहे का ?
- इतर साहित्यप्रकार (उदा. कविता) प्रकाशित करण्याची योजना आहे का ?
असेच इतरही प्रश्न अनेक सदस्यांच्या मनात असतील. ते या चर्चेत विचारावेत ही विनंती.
- मिलिंद
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

तुलना आणि धोरणे
या संकेतस्थळाची तुलना इतर संकेतस्थळांशी इतक्यातच करू नये ही विनंती. प्रशासकीय धोरणे यथावकाश स्पष्ट होतीलच. पण सदस्यांच्या सूचना/योजना यांची यथायोग्य दखल घेतली जाईल आणि निर्णयप्रक्रियेत सदस्यांचा सहभाग असेल याची खात्री बाळगावी.
सध्याच्या धोरणानुसार तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
१. हो.
३. लेखन प्रकाशित होण्यासाठी परवानगी लागणार नाही.
५. प्रयत्न नक्कीच करतील (नेहमी त्वरेने उत्तर देणे शक्य होईलच असे सांगता येणार नाही)
६. शुद्धिचिकित्सक आणि तसे इतर प्रक्रल्प मुक्त (मुक्तस्रोत) असावेत अशी इच्छा आहे. उपक्रम समुदायाचा वापर याकामी चांगला होईल असे वाटते.
७. नवे लेखनप्रकार आवश्यकतेनुसार बनवता येतीलच.
अभिनंदन
सर्वप्रथम मी ह्या स्थळाच्या निर्मितीबद्दल आपले अभिनंदन करतो.
प्रशासनाविषयी आपले विचार कळू शकतील का ?
- मिलिंद
धन्यवाद!
धन्यवाद सर्किट!
या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील उद्दिष्टे वरील लेखात दिलेली आहेतच. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखनाचे सर्वमान्य संकेत पाळणारे लेखन सदस्य इथे (व्यवस्थापनाच्या पूर्वपरवानगीशिवाय) करू शकतात. सदस्यत्वही सर्वांसाठी खुले आहे.
मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठीचा जाळ्यावरील वापर वाढण्यास साहाय्यक होऊ शकणारे तांत्रिक प्रकल्प या आणि अश्या इतर गोष्टींसाठी या संकेतस्थळाचा वापर व्हावा अशी इच्छा आहे.
या संकेतस्थळाच्या जडणघडणीत आणि विकासात सहभागी होणे सदस्यांना शक्य आहे. (याबद्दल अधिक माहितीसाठी उपक्रम! हा समुदाय पाहावा.)
आपणांस आणखी काही विशिष्ट प्रश्न असतील तर अवश्य कळवावेत.
तत्परता
प्रशासक महोदय,
माझ्या पहिल्या प्रश्नाला तुमचा तत्परतेने प्रतिसाद पाहून बरे वाटले. (एका जुन्या संकेतस्थळावर असे झाले असते, तर तिथून बाहेर पडण्याचे कारणच नव्हते.)
ही शक्य गोष्ट सुलभ होण्यासाठी आपण ह्या संकेतस्थळासाठी सध्या कुठले तंत्रज्ञान वापरताय याचा खुलासा अपेक्षित आहे. माझ्या मर्यादित माहितीनुसार (म्हणजे view source करून) आपण द्रुपॅल वापरून हे स्थळ बनवलेले आहे. आणि ओकार जोशींची गमभन ही आज्ञावली वापरली आहे. सुशोभितीकरणासाठी काय वापरले आहे ? ९०% किमान देवनागरीची अट घातली आहे का ?
आपण जनमत चाचणीचे मॉड्यूल ठेवले आहे, परंतु तशी सुविधा अद्याप स्थळावर दिसत नाही.
मला असलेले इतर प्रश्न मी वेगळ्या चर्चाप्रस्तावात दिलेले आहेतच.
- मिलिंद
माहिती
अगदी बरोबर. या संकेतस्थळाच्या जडणघडणीत आणि विकासात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांना ही सर्व माहिती मिळेलच. आधी अश्या लोकांना एकत्र करणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि इतर बऱ्याच बाबतीत सदस्य आपले योगदान देऊ शकतील. उपक्रम! समुदायात लवकरच ही माहिती दिली जाईल.
"प्रशासक" हा शब्द वापरणे हेतुतः टाळले आहे.
धन्यवाद
अगदी अचूक निर्णय. अभिनंदन ! आपण सुपंथ धरलाय याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे आपल्याला सहाय्य करायला मी आणि माझे समविचारी मित्र उत्सुक असू ह्याची खात्री बाळगावी. प्रशासक ह्या शब्दाविषयी मी माझे विचार ह्या लेखात व्यक्त केले आहेत.
- मिलिंद
अभिनंदन
नव्या संकेतस्थळाचे अभिनंदन.
परंतु इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच या संकेतस्थळावरही 'आमच्याबद्दल' ही माहिती का नाही.
आमंत्रणाप्रमाणेच पारदर्शकताही आवडेल असे सांगावेसे वाटते.
पारदर्शकता
धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये पारदर्शकता राहीलच.
काही प्रश्न
१. हे उपक्रमाचे बीटा वर्जन् आहे काय? (याची माहिती इतरत्र् दिली असल्यास फक्त् दुवा द्यावा मी अजून सरावलेली नाही.)
२. आपण सध्या या उपक्रमात किती सदस्यांना सामिल करण्याच्या विचारांत आहात की येणारा प्रत्येकजण उपक्रमात सामिल होऊ शकतो?
३. वर आणि इतरत्र सर्किटने विचारलेले काही प्रश्न आपण टाळलेले आहेत आणि आम्ही जाणून घेण्यास उत्सुक आहोत. अशाप्रकारे सदस्यांना अंधारात का ठेवले जात् आहे? एखाद्या नव्या संकेतस्थळावर गेल्यावर आणि त्याचे सदस्यत्व् घेतल्यावर त्याबद्दलची माहिती कळणे हा त्या सदस्याचा हक्क असावा असे वाटते.
धन्यवाद.
हक्क आणि कर्तव्य
सदस्यांच्या हक्कांबद्दल प्रियालीशी सहमत आहे.
सदस्यांचे सहकार्य हवे असल्यास व्यवस्थापकांनी खुले धोरण स्वीकारणे आवश्यक आहे.
तसे नसल्यास इतर संकेतस्थळांची मोडकी धोरणे आपणही पुढे चालवताय असे वाटून सदस्य होण्याविषयीची आस्था नाहिशी होईल् असे वाटते.
कलोअ,
मिलिंद
माहिती
नाही. या आवृत्तीला असे काही नाव दिलेले नाही आणि या आवृत्तीत नजीकच्या भविष्यात तरी मोठे बदल केले जाणार नाहीत.
सर्वांना या संकेतस्थळाचे सदस्य होता येईल आणि लेखन, वाचन, चर्चा करता येईल.
सदस्यांना अंधारात ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही.
इथे विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांत सर्वांना रस असेलच असे नाही. वर लिहिल्याप्रमाणे तांत्रिक योगदान करू इच्छिणारे लोक एकत्र आल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेलच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे संकेतस्थळ हे एक साधन आहे साध्य नाही. संकेतस्थळावर होणारे बदल संख्येने कमी असतील आणि त्यांची वारंवारताही कमी असेल, जेणेकरून सदस्य लेखन आणि वाचन यावर आणि तंत्रज्ञ सदस्य इतर (शुद्धिचिकित्सक किंवा तत्सम) प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करू शकतील.
इतरत्र विचारलेल्या प्रश्नांपैकी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेतच आणि त्याबाबत प्रश्नकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे, आपल्याही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे.
पारदर्शकता म्हणजे रे काय भाऊ?
हो का? मग सांगा बरं संपादन मंडळात कोण कोण विद्वान आहेत?
एक शंका!
वरूणदेवा,
हो का? मग सांगा बरं संपादन मंडळात कोण कोण विद्वान आहेत?
पण मुळात संपादक मंडळात जी मंडळी आहेत ती 'विद्वान' आहेत हे कशावरून? ही माझी आपली अशीच एक शंका हो, त्यामुळे विशेष जड न घेता हलके घेतलेत तरी चालेल! :)
तात्या.
अभिनंदन
अतिशय छान उपक्रम! अभिनंदन. आपण तत्परतेने सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता आहात हे पाहून बरे वाटले. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहो.
परंतू अजुनही आपण कोण ह्याचा खुलासा केलेला नाही. ह्या वेबसाइटचे मालक चालक हे वेगवेगळे आहेत की एकच? प्रशासनाची जवाबदारी एकच व्यक्ति सांभाळते की अनेक? मागच्या (कटू) अनुभवांवरून हि माहिती उपलब्ध करणे गरजेचे आहे असे वाटते.
शुद्धिचिकित्सकाची सुविधा अद्याप उपलब्ध नाही का? मला सापडला नाही.
- वरूण
धन्यवाद/माहिती
आपल्या प्रश्नांची उत्तरे काही काळाने मिळतीलच. कृपया थोडा धीर धरावा.
शुद्धिचिकित्सकाची सोय अद्याप उपलब्ध नाही.
धीर धरावा
अजुन किती काळ वाट पाहायची आम्ही? गणेश चतुर्थी पर्यंत जमेल का?
हेच..
आपण तत्परतेने सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता आहात हे पाहून बरे वाटले. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहो.
अगदी हेच म्हणतो!
परंतू अजुनही आपण कोण ह्याचा खुलासा केलेला नाही.
'कोण तू, कुठला राजकुमार?' या गीतरामायणातल्या ओळी सहजच आठवल्या! ;)
मागच्या (कटू) अनुभवांवरून हि माहिती उपलब्ध करणे गरजेचे आहे असे वाटते.
हेच म्हणतो!
शुद्धिचिकित्सकाची सुविधा अद्याप उपलब्ध नाही का? मला सापडला नाही.
शुद्धीचिकित्सकाची मला व्यक्तीश: तशी गरज वाटत नाही, पण हाताशी असलेला केव्हाही बरा! ;)
असो,
आपला,
(उपक्रमी) तात्या.
अभिनंदन
या नव्या आणि आकर्षक संकेतस्थळाच्या निर्मीती बद्दल अभिनंदन.
वर विचारलेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी माहिती असल्याने त्यांच्या बद्दल सुरुवातीलाच विचारणा व्हावी यात गैर वाटत नाही.
येथील व्यवस्थापक तत्परतेने प्रतिसाद देताहेत हे पाहून आनंद होतोय. आपल्या उपक्रमास शुभेच्छा !
नीलकांत
प्रकाटाआ
प्रकाटाआ
म्हणजे काय ?
हे "प्रकाटाआ" काय प्रकरण आहे बुवा?
चुभूद्याघा!
खिरे
म्हणजे
हा प्रश्न यापूर्वीही विचारला गेल्याने जाहिर उत्तर देते.
प्रकाटाआ = प्रतिसाद काढून टाकला आहे.
मी अडचणी आणि निराकरण मध्ये टाकायचा प्रतिसाद चुकून येथे टाकला होता. लक्षात आल्यावर येथील काढला.
---
अवांतरः इंग्रजी शब्दांप्रमाणेच अशाप्रकारच्या मराठीतील थोडक्या शब्दांची एक यादी करता येईल. मजेशीर प्रकार ठरू शकेल.
अभिनंदन
सर्वप्रथम या संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल अभिनंदन.
वर विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला आवडेल.
राजेंद्र
अभिनंदन
नमस्कार,
या चांगल्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
--लिखाळ.
घड्याळात गडबड??
उपक्रम महाशय
ह्या प्रश्नावलीची सुरूवात मिलिंदने सोळा मार्चला १९:०२ ह्या वेळेस केली आणि त्याला आपलं पहिलं उत्तर २१:२६ ह्या वेळेस आलं. पण नंतर जरा गडबड झालेली दिसते. कारण मिलिंदचा पुढचा प्रतिसाद १८:०६ ला आला आणि त्याला तुमचं उत्तर १९:१८ ला आलं. ह्यावरून् दोन गोष्टी संभाव्य वाटतात् - एक तर सेवादात्याच्या घड्याळात काहीतरी गडबड तरी असावी किंवा मिलिंद आणि उपक्रम एकच् असावेत. अर्थात् हा "गैर"समजही असू शकतो म्हणा, पण अशा गोष्टींची खबरदारी घ्यायला ह्याबद्दल प्रशासकीय धोरणांत काही तरतूद आहे का?बघा बुवा, नाहीतर् उगाच् आरोपांच्या फैरी झडायच्या. ;)
शिवाय मिलिंदरावांना ह्या संकेतस्थळावरच्या बर्याच तांत्रिक बाबी माहित असाव्यातसं वाटतं कारण् त्यांचे प्रश्न फार खोलवर माहिती असल्याशिवाय् विचारता येणार् नाहीत.त्यावरून् आमच्या डोक्यात सर्किट (मिलिंद) आणि उपक्रम एकच् असावेत् अशी (कु)शंका आली हे ही जाता जाता नमूद करावेसे वाटते.
पण् आपल्या "उपक्रमा"साठी काही मदत लागली तर ती करायची तयारी आणि इच्छा आहे. शुभकार्याला शुभेच्छा!!
आपला, मंदार
वेळा आणि माहिती
वेळांबाबतचे आपले निरीक्षण अचूक आहे. या चर्चा प्रस्तावाच्या आधी अन्यत्र आलेले समांतर विषयावरील प्रतिसाद नंतर इथे हालवल्याने हा वेळेतील फरक पडला आहे.
वैश्विक जाळे आणि संकेतस्थळ बांधणीचे तंत्रज्ञान यांचे ज्ञान असणार्यांना सर्किट यांनी मिळवलेली माहिती मिळवणे अवघड नाही.
धन्यवाद! मदतीची आवश्यकता असेल तेंव्हा तुमच्याशी अवश्य संपर्क करू.
उपक्रम सदस्यांचे हक्क आणि सदाचारांची अपेक्षा
ही चर्चा म्हणून मी प्रस्तुत करत आहे, पण ह्याचा रोख उपक्रमच्या कारभारींवर आहे. (आता प्रशासक म्हणायचं न्हाय मंग काय म्हन्नार्?!)
आपल्याला सवड मिळेल तेंव्हा जरा एक "members bill of rights" प्रकाशित करता येईल काय? मी प्रशासकीय धोरणांची चर्चा वाचली, पण त्यावरून नुस्ता अंदाज बांधता येतोय, प्रत्यक्षात धोरणं काय आहेत हे कुठे वाचता आलं तर मला फार आवडेल. त्याच बरोबर उपक्रम सदस्यांकडून काय सदाचाराच्या आपल्या अपेक्षा आहेत हे कळलं तर बरं होईल (मधुन मधुन आपण सूचना केलेल्या लक्षात येतात म्हणून म्हटलं)
अजून एक गोष्ट : "उपक्रम" ह्या संस्थेबद्दल (आणि पर्यायानी आपल्याबद्दल) काही माहिती दिली तर जरा बरं वाटेल. "मनोगत" ह्या संकेतस्थळाविषयी माझी एक तक्रार अशी होती की त्यांच्या प्रशासकांनी स्वतः बद्दल कधी माहिती दिली नाही. "उपक्रम" ही संस्था जर लाभार्थी (profit motive) कंपनी असेल तर मला आनंदच होईल, कारण त्यातून हे संकेतस्थळ टिकण्याची शक्यता जास्त आहे असं वाटेल. जर ही non-profit असेल तर इतर सदस्य ह्याच्या घडणीत मदतीचा हातभार देऊ शकतील. म्हणजे काहीही असलं तरी गुप्तता ठेवण्याचं कारण नसावं.
कळावे लोभ असावा,
खिरे
(माझ्या नावाबद्दल गुप्तता मी ठेवतो, पण गूगल / याहू वरुन सापडता येईल असा दुवा मला माझ्या व्यावसायिक दृष्ट्या पूरक नसेल म्हणून ही काळजी. वैयक्तिक पातळीवर मी माझ्याबद्दल माहिती देण्यास तयार आहे)
अशी माहिती/अपेक्षा
धोरणे आणि सदाचार यांची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
आधी एके ठिकाणी लिहिल्याप्रमाणे "संकेतस्थळ हे साधन आहे साध्य नाही" त्यामुळे संकेतस्थळाविषयी होणारी चर्चा इतर लेखन/चर्चा यांच्या तुलनेत कमी असावी अशी अपेक्षा आहे.
ह्या चर्चाप्रस्तावाचा विषय वरील प्रस्तावाशी समांतर असल्याने इथे स्थलांतरित केला आहे.
नेमका उद्देश काय आहे? आणि अवांतर
प्रशासक उपक्रम
आपल्या संकेतस्थळाचा सदस्य नुकताच झालो आहे. संकेतस्थळ उत्तम आहे. पण अशा प्रकारची संकेतस्थळे (उदा. मनोगत) व उपक्रम यांच्या धोरणात नेमका काय फरक आहे? म्हणजे फरक नसेल तर नवीन संकेतस्थळ नकोच असे माझे मत नाही, कारण जितकी जास्त संकेतस्थळे तितके मराठीसाठी चांगले (अर्थात् मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे व त्याला अशा आणि या संकेतस्थळांमुळे जीवनदान मिळेल अशा भ्रमात मी नाही). तरीही फरक असला तर तो समजावा ही इच्छा !
आता संजोप राव उपक्रम म्हणजे व्हिव्हियन रिचर्डस व मनोगत म्हणजे संजय बांगर अशी टिप्पणी सुरू न करोत म्हणजे झाले!
विनायक
अवांतर - १. इथे ल हे अक्षर हिंदीसारखे का टंकित होते आहे?
२. मनोगतावर व इतरत्रही दीर्घ वेलांटीसाठी मनोगतावर ii व ee असे दोन्ही पर्याय चालायचे. इथे फक्त एकच चालतो.
३. कुठलाही अकारांत शब्द संपवताना त्याच्या शेवटी a हे अक्षर टंकित करावे लागते. नाहीतर पाय मोडलेले अक्षर टंकित होते. त्याऐवजी पाय मोडक्या अक्षरांसाठी वेगळी सुविधा जसे .h देऊन चालणार नाही का?
४. ज्ञ या अक्षरासाठी मनोगतावर dnya तर इथे jna असा फरक का?
स्वागतपर सहमती
विनायकराव
उपक्रमपंत जेव्हा त्यांना सवड असेल तेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे देतीलच. (आजवर त्यांनी सर्व प्रश्नांना त्वरित उत्तरे दिली आहेत, तेव्हा इतर संकेतस्थळांपेक्षा येथे तुम्हाला तो बदल जाणवेलच.) पण तोवर त्यांचे माझ्यावर असलेले ऋण फेडण्याचा एक प्रयत्न म्हणून मीदेखील काही उत्तरे देतो (अर्थात उपक्रमपंतांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय त्यांचा काही उपयोग नाही.)
कारण जितकी जास्त संकेतस्थळे तितके मराठीसाठी चांगले
आपल्याशी ह्या मुद्द्यावर पूर्णपणे सहमत आहे. अशा प्रकारच्या सर्व संकेतस्थळांवर जुन्या संकेतस्थळाच्या सदस्यांनी सदस्यत्व घ्यावे ह्या विचाराचा मी आहे. आपण आपल्या मित्रांना / मैत्रिणींना उपक्रम वर निमंत्रित कराल अशी अपेक्षा मी करू शकतो का ?
आता संजोप राव उपक्रम म्हणजे व्हिव्हियन रिचर्डस व मनोगत म्हणजे संजय बांगर अशी टिप्पणी सुरू न करोत म्हणजे झाले!
संजोपरावांनी उपक्रमावर काय लिहावे आणि काय लिहू नये, याबद्दल आपले काही खास विचार असतील तर ते आपण त्यांच्या खरडवहीत नोंदवू शकता. ही खरडवही सर्वांना वाचता येते. तुम्हाला हा निरोप त्यांना खाजगी म्हणून पाठवायचा असेल, तर व्यनिची सुविधा येथेदेखील उपलब्ध आहे.
अवांतर - १. इथे ल हे अक्षर हिंदीसारखे का टंकित होते आहे?
आपण जी अक्षरचित्रमाला (फाँट्) वापरत असाल, त्यात एखाद्या अक्षराचे जसे चित्र दिसते, तसेच येथे दिसते.
मनोगतावर व इतरत्रही दीर्घ वेलांटीसाठी मनोगतावर ii व ee असे दोन्ही पर्याय चालायचे. इथे फक्त एकच चालतो.
दोन्ही पर्याय उपल्ब्ध व्हावेत असे आपल्याला वाटत असेल, तर मुक्तस्त्रोत टंकनसुविधेचे शिल्पकार ओंकार जोशी ह्यांना व्यनितून कळवावे.
ठलाही अकारांत शब्द संपवताना त्याच्या शेवटी a हे अक्षर टंकित करावे लागते. नाहीतर पाय मोडलेले अक्षर टंकित होते. त्याऐवजी पाय मोडक्या अक्षरांसाठी वेगळी सुविधा जसे .h देऊन चालणार नाही का?
ह्यासाठी मी ओंकार जोशींना आधीच उपाय सुचवला आहे. ते त्यांच्या गमभन ह्या सुविधेत तो उपाय अंतर्भूत करतील तेव्हा ह्या आणि गमभन वापरणार्या इतर सर्व सुविधांवर तसे होऊ शकेल.
ज्ञ या अक्षरासाठी मनोगतावर dnya तर इथे jna असा फरक का?
दोन्ही स्थळांवर वेगवेगळ्या टंकनसुविधा वापरतात. मनोगतकारांनी ते वापरत असलेली सुविधा विकत घेतलेली आहे. त्या सुविधेवरून प्रेरणा घेऊन तशी किंवा त्यापेक्षा चांगली मुक्तस्त्रोत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गमभन ह्या सुविधेचा जन्म झालाय. फरक हे असणारच. पण हे फरक असलेली सुविधा अधिक वापरात येईल, त्यामुळे मनोगतकारांना कधीतरी त्यांची सुविधा बदलावी लागेल. तेव्हा सर्वांना एकाच सुविधेची सवय होईल, आणि मराठी टंकन व्यवस्थेविषयी माझे एक स्वप्नदेखील पूर्णतेला येईल.
आपला येथे वावर वाढावा ही शुभेच्छा.
- मिलिंद
सर्किट महोदय,
ज्ञ या अक्षरासाठी मनोगतावर dnya तर इथे jna असा फरक का?
तांत्रिक बाबीत मला काही समजत नाही. परंतु उच्चारानुसार टंकलेखनाची सर्व सुविधा असताना ज्ञ साठी तसे नाही. ज्ञ च उच्चार द्न्य असा आहे त्यामुळे ही अडचण अनेकांना यईल.
कळावे,
--लिखाळ.
ज्ञ - बदल
गमभन च्या नव्या आवृत्तीमध्ये हा बदल करण्यात येईल. येत्या शनि रवि नवी आवृत्ती उपलब्ध होईल. उपक्रम वर तो बदल करण्यासाठी पुढच्या आठवड्यात नवी आवृत्ती उपलब्ध झाल्यावर उपक्रमास सूचना पाठवेन. साधारण १० दिवसांत हे बदल उपक्रम करेल असे गृहीत धरून तोवर कळ सोसावी. :)
मराठी माणसांसाठी संकेतस्थळ
नमस्कार,
जय महाराष्ट्र !
आजच या संकेतस्थळाचा सदस्य झालो.
हे तर मराठी माणसांसाठी एका मराठी माणसाने चालवलेले लोकशाहीतील संकेतस्थळ. संकेतस्थळ आपल्याला आवडले.
आपला
कॉ.विकि
उपक्रमरावांना धन्यवाद
(पुस्ती - श्री धोंडोपंत यांच्या निरोपाच्या उत्तरादाखल पाठवलेल्या निरोपातील मजकूर सर्व सदस्यांना मार्गदर्शक ठरेल असे वाटल्याने इथे देत आहे. "कोणत्याही विशेष व्यक्तिमत्त्वाच्या किंवा लोकनेत्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या जीवनावर, कर्तृत्वावर किंवा शिकवणुकीवर एखादा माहितीपूर्ण लेख तुम्ही लिहू शकता. फक्त अभिवादनाच्या चर्चाप्रस्तावापेक्षा असा एखादा लेख अधिक चांगली श्रद्धांजली ठरेल असे वाटल्याने संपादन मंडळाने तुमचा चर्चाप्रस्ताव अप्रकाशित केला आहे.")
नुकताच श्री. उपक्रमरावांचा निरोप आमच्या पत्रपेटीत आला.
त्यात उपक्रमरावांनी अत्यंत सभ्य शब्दात त्यांचे विचार मांडले आहेत. आणि आम्हाला उपक्रमावर झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
आम्ही उपक्रमरावांच्या या निरोपाचे स्वागत करतो आणि त्यांनी दाखवलेल्या सृजनशीलतेचा आदर करतो.
आमचे उपक्रमावर लिहीणे हे उपक्रमरावांच्या उत्तरावर अवलंबून आहे, असे आम्ही पूर्वीच म्हटले होते.
उपक्रमरावांच्या निरोपातील सकारात्मक दृष्टिकोणामुळे आणि भूमिकेमुळे आम्ही उपक्रमावर येऊ.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
जाताजाता....
आम्ही उपक्रमीनां रु १६० ला पुंज लॉईड हा समभाग घ्यायचा सल्ला दिनांक ४ एप्रिल रोजी दिला होता. आज दिनांक १७ एप्रिल रोजी त्याचा भाव रु. १८४ झाला आहे.
म्हणजे १४ दिवसात १५% नफा या समभागाने दिला आहे.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
४ नव्हे ९
आम्ही पुंज लॉईड ४ एप्रिल रोजी सुचवलेला नसून ९ एप्रिल रोजी सुचवलेला आहे.
शेवटचे वाक्य ९ दिवसात १५% नफा असे वाचावे.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
काही प्रश्न..
उपक्रमरावांनी हा निरोप इथल्या सगळ्या सभासदांना पाठवला आहे का (कारण ज्यांचे लेखन उडवले गेले त्या सर्वांनाच मनस्ताप झाला आहे असे वाटते.) ? मला तरी अजुन मिळालेला नाही. तसेच हे त्यांचे सभ्य शब्दातील विचार जाहीरपणे मांडण्यास काय बरे आडकाठी असावी? ह्याचा अर्थ काही उडवलेले जुने लेख पुन्हा दिसू लागणार का? नसल्यास का नाही? उपक्रमराव पुन्हा सर्वांना उत्तरे देत आहेत हे बघुन आनंद झाल्याने काही प्रश्न मांडत आहे.
शुभेच्छा!
-वरूण
अपेक्षा
पूर्वी म्हटल्याप्रमाणे संकेतस्थळ हे साधन आहे साध्य नाही त्यामुळे आपली उर्जा आणि वेळ यांचा उपयोग प्रामुख्याने आपापल्या अभ्यासाच्या, माहितीच्या आणि आवडीच्या विषयांवर माहितीप्रधान लेखन आणि चर्चा यासाठी करावा अशी विनंती आहे.
उपक्रम च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेले लेखन करण्याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत नसलेले साहित्य वेळेच्या उपलब्धतेनुसार अप्रकाशित केले जाईल.