हिंदूंनी कधी अत्याचार केलेच नाहीत?
धर्मांतरण म्हणजे काय ? या चर्चेत 'जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले, धर्मातरण केले, आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही' असा एक मुद्दा मांडला गेला. या चर्चेला आलेल्या एका प्रतिवादात्मक प्रतिसादात'पुष्यमित्र शुंग वा मिहिरकुल यांचे नाव बौध्द भिक्षूंच्या हत्येसंदर्भात, धार्मिक स्थळांच्या नाशासंदर्भात घेतले जाते' असे त्याचे खंडन केले गेले.
सदर प्रसंग आणि त्यातील प्रमुख पात्रे (किंवा एकंदरीतच तत्कालीन इतिहास) यांबाबतीत मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्यामुळे टिप्पणी करू शकत नाही, पण हा एक अपवादात्मक, आयसोलेटेड (मराठी?) प्रसंग आहे, आणि याव्यतिरिक्त हिंदूंनी कोणावर धार्मिक अत्याचार केल्याचे फारसे दाखले नाहीत, असाही एक प्रतिवाद याविरुद्ध केला जाऊ शकेल. या प्रतिवादात कितपत तथ्य आहे, हिंदूंनी खरोखरच धार्मिक अत्याचार केले नाहीत का, हे तपासून पाहू.
संत ज्ञानेश्वर आणि त्यांचा परिवार हे ब्राह्मणकुलोत्पन्न. ज्ञानेश्वरांच्या तीर्थरूपांनी काही एक तथाकथित धार्मिक आगळीक केली, या सबबीवर त्यांना (अर्थात विठ्ठलपंत कुलकर्ण्यांना, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या तीर्थरूपांना) त्यांच्याच ज्ञातिबांधवांनी (अर्थात इतर ब्राह्मणांनी) जी वागणूक दिली, जिच्या परिणामी विठ्ठलपंतांना पत्नीसमवेत आत्महत्या करावी लागली, आणि त्यापश्चातसुद्धा ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना याच इतर ब्राह्मणांनी जी वागणूक दिली, ते धार्मिक अत्याचार नव्हते?
डॉ. आनंदीबाई जोशींना केवळ त्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला (पर्यायाने समुद्रोल्लंघन करून) जाऊन आल्या, विदेशी वातावरणात राहिल्या (पर्यायाने त्यांचा धर्म 'भ्रष्ट' झाला) असल्या कारणांवरून तत्कालीन कर्मठांनी जे छळले, आणि त्यांच्या आजारपणात त्यांन औषधालासुद्धा पारखे केलेcitation required, तो धार्मिक छळ नव्हता?
डॉ. आनंदीबाई जोशींच्याच काळातील गोष्ट घ्या. त्याकाळी नवराबायकोंनी संध्याकाळी फिरायला जातानासुद्धा नवर्याने पुढे आणि बायकोने दहा पावले मागे चालावे लागे म्हणे. अशा परिस्थितीत आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव एकत्र फिरायला गेले तर 'धर्म बुडाला' म्हणून त्यांच्यावर दगडफेक करणारे धार्मिक अत्याचार करत नव्हते?citation required
रस्त्यातून चालताना अंगावर 'अस्पृश्या'ची सावली पडली, त्यामुळे विटाळ झाला, धर्म बुडाला म्हणून त्या 'अस्पृश्या'स बदड-बदड बदडणारे (आणि नंतर घरी जाऊन आंघोळ करणारे) ब्राह्मण धार्मिक अत्याचार करत नव्हते?
गोव्यात विहिरीत पावाची लादी टाकून 'तुम्ही त्या विहिरीचे पाणी प्यालात म्हणजे आता तुम्ही ख्रिस्ती झालात' अशी आवई उठवून मिशनर्यांनी हिंदूंचे फसवणुकीने आणि बळजबरीने धर्मांतरण केले खरे. तो (ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेला) धार्मिक अत्याचार होता याबद्दल वादच नाही. पण अशा स्वेच्छेविरुद्ध बाटलेल्या हिंदूंना इतर हिंदूंनी धर्मबहिष्कृत करणे (आणि पर्यायाने त्यांच्या धर्मांतरणावर शिक्कामोर्तब करणे - पण याबद्दल नंतर.), आपल्यात न घेणे, वाळीत टाकणे, त्यांच्याशी रोजचे व्यवहार तोडणे अशा प्रकारची वागणूक म्हणजे धार्मिक छळ नव्हता तर काय होते? (हे लोक स्वेच्छेने जरी ख्रिस्ती झाले असते, तरीही त्यांना अशी वागणूक देणे अक्षम्य होते. पण तो मुद्दा वेगळा.)
मुसलमानांबद्दलसुद्धा असेच झाले असावे. बाहेरच्या मूठभर आक्रमक मुसलमानांनी बळजबरी करून हिंदूंना बाटवले असेल. पण अशा बाटवलेल्या मुसलमानांच्या धर्मांतराची दखल न घेता, यांचे धर्मांतर कधी झालेच नाही अशा थाटात उर्वरित हिंदूंनी पहिल्याच दिवसापासून त्यांच्याशी व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवले असते ('त्यांना आपलेच लोक मानून' असे लिहिणार होतो, पण ते आपलेच लोक होते, त्यांना तसे 'मानण्या'चा प्रश्नच नव्हता.), तर त्यांनाही आपली 'मुसलमान' अशी ओळख सांगण्यात काही स्वारस्य नसते. पर्यायाने त्यांचे हे सक्तीचे धर्मांतरण प्रभावी तर ठरले नसतेच, किंबहुना रद्दबातल झाल्यात जमा झाले असते. पण आपणच अशा इच्छेविरुद्ध बाटलेल्यांना वाळीत टाकून, धर्मबहिष्कृत करून (पर्यायाने धार्मिक छळ करून) त्यांना स्वतःला मुसलमान मानण्यावाचून पर्याय ठेवला नाही, आणि आपल्यासाठी एक कायमचा अंतर्गत शत्रू बनवून ठेवला. अशाने ते कट्टर झाले नसते, तरच नवल.
शुद्धीकरण वगैरे काही खरे नाही. कारण 'शुद्धीकरणा'त मुळात ती व्यक्ती 'अशुद्ध' (अर्थात धर्मबाह्य!) झाली होती, हे गृहीतक आहे, अधिक मुळातल्या त्यांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या धर्मांतरणावर शिक्कामोर्तब आहे. आता मुळात त्या व्यक्तीला धर्मबाह्य, धर्मबहिष्कृत कोणी केले, आपणच ना? मग आता त्या व्यक्तीला "तू 'अशुद्ध', धर्मबाह्य झाला होतास, आता तुला आम्ही 'शुद्ध' करून पुन्हा 'आमच्या'त घेत आहोत" हे मानभावीपणे, उपकार केल्यासारखे सांगणे याहून त्या व्यक्तीचा मोठा अपमान कोणता? का यावे त्याने परत? मुळात त्याने काय पाप केले होते? मुळात धर्म सोडून तो स्वखुशीने गेला होता, की त्याला घालवले गेले होते? (आणि अगदी स्वखुशीने जरी सोडून गेला असला, तरी त्याला परत घेण्यात कोण कोणावर उपकार करतोय? त्याला परत घेण्यात गरज कोणाची आहे?)
शिवाजीमहाराजांनी नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदुधर्मात परत आणले, हे मोठ्या अभिमानाने वगैरे मिरवले जाते. पण याच्यात मोठेपणा तो नेमका काय आहे? मुळात या शुद्धीकरणाची गरज काय होती? "तुझे धर्मांतर झाले होते, तू मुसलमान झाला होतास, हेच मुळात आम्ही मानत नाही. आमच्या लेखी तू नेहमीच हिंदू होतास आणि आहेस, त्यामुळे तू कायम हिंदूच असताना तुला हिंदुधर्मात 'परत' घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही" अशी [काहीशी क्यूबन किंवा चिनी नागरिकत्वासारखी*] भूमिका घेता आली असती. शुद्धीकरण हे निव्वळ स्तोम होते. अर्थात शिवाजीमहाराजांना या बाबतीत दोष देता येणार नाही, कारण राजकीय सत्ता जरी त्यांच्या हातात असली, तरी धर्मसत्ता भलत्यांच्याच हातात असल्याकारणाने महाराजांच्या अधिकारकक्षेच्या हे बाहेर असावे. आणि ज्यांच्याकडे धर्मसत्ता होती, त्यांचा कल नेहमी अधिकाधिक लोकांना धर्मबहिष्कृत करण्याकडेच राहिलेला असल्यामुळे त्यांच्याकडून अशा भूमिकेला मान्यता मिळण्याची अपेक्षाच नव्हती**.
(अर्थात आजच्या परिस्थितीला हा तोडगा मूर्खपणाचा आणि हास्यास्पदच नव्हे, तर आगाऊपणाचा ठरेल. इतकी शतके वेगळे राहिल्यावर, नव्हे, त्यांना वेगळे ठेवल्यावर, जर आपण [येथे 'आपण' हा शब्द 'आपण हिंदू' अशा अर्थाने वापरला आहे.] आज मुसलमानांना सांगू लागलो, की 'तुम्ही हिंदूच आहात; तुम्ही इतर कोणी आहात किंवा कधी इतर कोणी होतात असे आम्ही मानत नाही', तर त्याला 'पण आम्ही मानतो ना!' असे उत्तर मिळणे साहजिक आहे. 'हिंदुस्थानातील मुसलमान हे इस्लामपंथी हिंदूच आहेत' असे मानणे हे निधर्मीपणाचे लक्षण नव्हे, तर मानभावीपणाचे आणि तितकेच मूर्खपणाचेही लक्षण आहे. मुळात इतकी वर्षे वेगळे ठेवल्यावर त्यांना आता हिंदू म्हणवून घेण्याची कोणतीही इच्छा असण्याचे काहीही कारण नाही. 'तुम्ही हिंदूच आहात' हे म्हणण्याची वेळ पहिला हिंदू बाटला, तेव्हा होती. ती वेळ कधीच टळून गेली आहे. आणि 'आपण इस्लामपंथी हिंदूच आहोत' असे मानण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करणे यासारखे रेमेडोकेपणाचे आणि [दुसर्या चांगल्या शब्दाअभावी] विकृत असे दुसरे काही नसावे.
शहाणपणा हाच आहे, की त्यांना मुसलमान म्हणूनच पूर्ण आदराने त्यांच्या पद्धतीने राहू द्यावे. तसेही भारताचे नागरिक म्हणून आपल्या पद्धतीने राहण्याचा [प्रत्येक भारतीय नागरिकाप्रमाणे] त्यांना अधिकार आहेच. भारतावर नागरिक म्हणून त्यांचाही हक्क आहे, आणि ते तो सोडून कोठेही चाललेले नाहीत किंवा जाणारही नाहीत. जाण्याचे कारणही नाही. 'हा त्यांचा देश नव्हे' असे मानणारांना बॅ. जीनांच्या द्विराष्ट्रवादाचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही, कारण हे वाक्य म्हणजे दुसर्या शब्दांत द्विराष्ट्रवादच आहे.
हिंदूंनी हिंदू म्हणून रहावे, मुसलमानांनी मुसलमान म्हणून; मुसलमानांना हिंदूंत [विशेषतः त्यांची इच्छा नसताना] सामावून घेण्याची काहीही गरज नाही. महत्त्वाचा आहे तो दोन्ही जमातींतील सलोखा. आणि हा सलोखा सामान्य माणसाच्या पातळीवरील परस्परसंपर्कातूनच उद्भवू, वाढू शकेल.)
तर सांगण्याचा मुद्दा, हिंदूंनी धार्मिक अत्याचार केले नाहीत अथवा त्यांच्यात ती वृत्ती नव्हती अथवा क्षमता नव्हती, यात काही तथ्य नाही. एवढेच म्हणता येईल की आम्ही आमच्याच धर्मबांधवांवर धार्मिक अत्याचार करण्यात आमची ऊर्जा इतकी वापरली, आणि त्याचीच चटक आम्हाला इतकी होती, की इतरधर्मीयांवर धार्मिक अत्याचार करायला आमच्यात फारशी ऊर्जा किंवा इच्छा उरली नाही; नाहीतर आमच्यात ती क्षमताही होती, आणि वृत्तीही होती. आणि म्हणूनच 'हम हिंदू हैं'मध्ये विशेष काही 'गर्व से कह'ण्यालायक वाटत नाही.
*क्यूबन नागरिकत्वाच्या कायद्यानुसार एखाद्या क्यूबन व्यक्तीने इतर देशाचे (उदा. अमेरिकेचे) नागरिकत्व जरी घेतले, तरी ती व्यक्ती जोपर्यंत क्यूबन सरकारकडे कायदेशीर अर्ज करून आपल्या क्यूबन नागरिकत्वाचा त्याग करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती क्यूबन सरकारच्या लेखी क्यूबन नागरिक आणि केवळ क्यूबन नागरिकच राहते, आणि क्यूबाचे सर्व कायदे अशा व्यक्तीस लागू पडतात. (अमेरिकन नागरिकत्वाच्या शपथेत 'मी इतर कोणत्याही परकीय राष्ट्र अथवा राजाप्रति निष्ठेचा - आणि पर्यायाने नागरिकत्वाचा - त्याग करत आहे' असा एक भाग असतो. परंतु या त्यागाला त्या दुसर्या राष्ट्राने अथवा राजाने मान्यता दिल्यासच या भागाची अंमलबजावणी होऊ शकते. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, अमेरिकन नागरिकत्व पत्करल्यावर अशी शपथ घेतली असूनसुद्धा जर एखाद्याने आपले मूळ राष्ट्रीयत्व सोडले नाही आणि त्या मूळ राष्ट्राची त्यास काही हरकत नसेल, किंवा त्या मूळ राष्ट्राचा नागरिकत्वाचा त्याग करायला विरोध असेल किंवा त्या राष्ट्राच्या कायद्यात नागरिकत्वाच्या त्यागाची तरतूदच नसेल, तर अमेरिकन सरकार त्याबदल काहीही करू शकत नाही, आणि अशा व्यक्तीची दोन्ही नागरिकत्वे कायम राहतात. अशा परिस्थितीत अमेरिका सोडताना आणि अमेरिकेत परत प्रवेश करताना अशा व्यक्तीने अमेरिकन बंदरांत अथवा विमानतळांवर आपला अमेरिकन पासपोर्टच वापरावा, इतर कोणताही पासपोर्ट वापरणे अवैध आहे, मात्र अमेरिकेबाहेर पडल्यावर इतर देशांत जो वाटेल तो पासपोर्ट वापरावा, एवढेच बंधन अमेरिकन सरकार घालते. त्यामुळे अमेरिकन शपथविधीतील क्यूबन नागरिकत्वाच्या त्यागाची क्यूबन सरकारच्या लेखी काहीही वैधता नाही.) किंबहुना अशा व्यक्तीने आपल्या परकीय पासपोर्टवर क्यूबात प्रवेश केल्यास त्या व्यक्तीचा परकीय पासपोर्ट जप्त केला जाऊन अटक व तुरुंगवास होण्याचीही शक्यता असते, असेही ऐकिवात आहे. चिनी नागरिकत्वाचा कायदा तर याहून एक पायरी पुढे: जन्माने चिनी नागरिकास आपल्या नागरिकत्वाचा त्याग करण्याची माझ्या माहितीप्रमाणे तरतूदच नाही. मग भला तो कोठेही पळून जावो आणि दुसर्या देशाचे नागरिकत्व - स्वखुशीने! - पत्करो. याउलट आपले भारतीय सरकार एखाद्या भारतीयाने इतर देशाचे नागरिकत्व घेतल्यास (तथाकथित दुहेरी नागरिकत्वाचा कायदा*** होऊनसुद्धा) तातडीने आपल्या भारतीय नागरिकत्व सोडावयास भाग पाडते आणि चालू (रद्द न केलेला) भारतीय पासपोर्ट बाळगणे अथवा वापरणे हा गुन्हा मानते. आपल्याच लोकांना 'बाह्य' करण्याची आपली घाई नागरिकत्वाच्या क्षेत्रातही जात नाही.
**अशी गोष्ट ऐकिवात आहे, की कश्मीरच्या एका जुन्या राजाने (नक्की कोण ते माहीत नाही. कदाचित मागल्या शतकातला किंवा त्याही आधीचा असेल. गोष्ट ऐकीव आहे, संदर्भ माहीत नाहीत, आणि माझा इतिहास कच्चा आहे.) म्हणे काशीच्या पंडितांना कळवले की माझी समस्त मुस्लिम प्रजा माझ्या आदेशास मान देऊन हिंदू बनण्यास तयार आहे, तेव्हा कृपया शुद्धी करून त्यांना हिंदुधर्मात सामावून घेणेचे करावे. काशीच्या पंडितांनी साफ नकार दिला. परिणाम आपण पाहतोच.
***भारतीय तथाकथित दुहेरी नागरिकत्व हे काही खरे नाही. सर्वप्रथम भारतीय नागरिकत्व सोडावे लागते, आणि मग या तथाकथित दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागतो. आणि ते मिळाल्यावर भारतात कितीही काळ (अगदी आयुष्यभरसुद्धा) वास्तव्यासाठी, खाजगी नोकरी/धंद्यासाठी अथवा शिक्षणासाठी व्हिसा न लागणे अथवा पोलीस नोंदणी करावी न लागणे (जी सामान्यतः दीर्घ काळासाठी भारतात राहू इच्छिणार्या कोणत्याही परदेशी नागरिकास करावी लागते), याव्यतिरिक्त भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही अधिकार मिळत नाहीत. भारतीय पासपोर्ट मिळू शकत नाही. सरकारी नोकरी करता येत नाही. शेतजमीन विकत घेता येत नाही. मतदान करता येत नाही. निवडणुका लढवता येत नाहीत. किंबहुना, 'आयुष्यभराचा व्हिसा' यापलिकडे या तथाकथित दुहेरी नागरिकत्वास फारसा अर्थ नाही. (पण हेही नसे थोडके!)
खर्याखुर्या दुहेरी नागरिकत्वाची तरतूद असलेल्या इतर देशांत (उदा. ब्रिटन, कॅनडा) असे नाही. ब्रिटिश नागरिकास इतर देशाचे नागरिकत्व घेताना निदान ब्रिटिश कायद्यानुसार तरी आपले ब्रिटिश नागरिकत्व सोडावे लागत नाही. (ज्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे त्या देशात दुहेरी नागरिकत्व अवैध असल्यास कदाचित सोडावे लागेल, पण तो भाग वेगळा. ब्रिटिश कायदा तरी असा कोणताही निर्बंध घालत नाही.) असा दुसर्या देशाचे नागरिकत्व घेतलेला पण आपले ब्रिटिश नागरिकत्व टिकवून असलेला ब्रिटिश नागरिक ब्रिटिश पासपोर्ट बाळगू व वापरू शकतो, आणि त्याला ब्रिटिश नागरिकाचे (मतदानाच्या आणि निवडणुका लढवण्याच्या अधिकारांसह) सर्व अधिकार प्राप्त असतात. थोडक्यात तो ब्रिटनचा पूर्ण नागरिक राहतो.
तसा भारतीय दुहेरी नागरिकत्वाचा कायदा, त्यातल्या तरतुदी (किंवा तरतुदींचा अभाव), त्यातले विरोधाभास आणि त्यामागचे (लालकृष्ण अडवानीलिखित) विधेयक यांचा थोडाफार अभ्यास केल्यास, मागचापुढचा किंवा आपण हे नेमके कशासाठी करतो आहोत याचा फारसा विचार न करता केलेला हा कायदा आहे, हे लक्षात येते. मुळात ओव्हरसीज़ फ्रेंड्स ऑफ बीजेपीकडून (आर्थिक इ.) पाठबळ मिळत राहावे, म्हणून त्यांना खूष ठेवण्यासाठी काहीतरी भावनिक नजराणा म्हणून घाईघाईने बनवून तोंडावर फेकलेला हा कायदा होता. आणि ओव्हरसीज़ फ्रेंड्स ऑफ बीजेपीलासुद्धा यात भावनांच्या नावावर आपल्याला उल्लू बनवले जात आहे, किंवा यातून कोणाचाच काही फारसा फायदा नाही, हे काही केल्या लक्षात आले नाही. (शेवटी बोलूनचालून भाजपचेच मित्र ते!) आणि नंतर मनमोहनसिंगांच्या काँग्रेस सरकारला यात (ठराविक १६ देशांऐवजी पाकिस्तान व बांग्लादेश वगळता जेथे दुहेरी नागरिकत्व वैध आहे अशा कोणत्याही देशासाठी ही योजना खुली करण्याव्यतिरिक्त) फारसा बदल करण्यात स्वारस्य नसावे.
यातले विरोधाभासही मोठे मनोरंजक आहेत. एखाद्या दुहेरी नागरिकाच्या मुलांना (काही पिढ्यांपर्यंत) अर्ज करून (दुहेरी नागरिकत्व पुढच्या पिढीस आपोआप मिळत नाही. अर्ज करावा लागतो.) दुहेरी नागरिकत्व मिळवता येते. याचा अर्थ, भारताबाहेर जन्मलेल्या आणि म्हणून परदेशी नागरिकत्व असणार्या मुलास, त्याच्या पालकांपैकी किमान एक जण भारताचा भूतपूर्व नागरिक असलेला परदेशी नागरिक असेल, तर दुहेरी नागरिकत्व मिळू शकते. मात्र अशा मुलाचे दोन्ही पालक जर भारतीय नागरिक असतील, तर दुहेरी नागरिकत्व मिळू शकत नाही. (थोडक्यात, 'दुहेरी नागरिकत्व पाहिजे? मग आईवडिलांपैकी एकाला भारतीय नागरिकत्व सोडून द्यायला सांग!')
थोडक्यात, कोणत्याही प्रकारचे नागरिकत्व न देणारे हे आभासी नागरिकत्व आहे. भारताच्या विविध वकिलातींच्या संकेतस्थळांवर 'भारताचे दुहेरी नागरिकत्व [अधिकृत नाव: ओव्हरसीज़ सिटिझनशिप ऑफ इंडिया] हे नागरिकत्व नाही; भारतीय कायद्यात दुहेरी नागरिकत्वाची कोणतीही तरतूद नाही आणि परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय नागरिकत्वाचा त्याग न करणे अथवा भारतीय पासपोर्ट बाळगणे अथवा वापरणे हा पासपोर्ट ऍक्टान्वये गुन्हा आहे, तेव्हा परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यावर त्वरित आपला भारतीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी वकिलातीकडे पाठवावा.' असे स्पष्टपणे लिहिलेले असते.
थोडक्यात, इथेही 'तुम्ही आता आमचे नाही, तुम्ही बाहेरचे. (फक्त मेहेरबानी करून तुम्हाला परत येण्याचा अधिकार - मागितलात तर! - देऊ शकतो.)' असे म्हणण्याचा हा प्रकार म्हणावा काय?
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

माहितीपूर्ण
लेख माहितीपूर्ण आहे. जमेल तशा प्रतिक्रिया लिहीत आहे.
धर्मांतरासंबंधी फार पूर्वी ऐकलेली एक रोचक गोष्ट आठवते. हिंदु समाजाबद्दल असे म्हण्टले जाते की, हा एक-दिशा-मार्ग असल्यासारखा आहे. म्हणजे , तुम्हाला त्यातून बाहेर पडता येते ; पण "बाहेरच्याला" आत घेता येत नाही. कारण मुख्य मुद्दा : "आत" घायचे तर ठीक , पण कुठल्या जातीत घालायचे ?
सहमत
धार्मिक अत्याचाराच्या बाबतीत हिंदुही काही कमी नव्हते या बाबतीतले आपले मुद्दे पटण्यासारखेच आहेत.
एकदा धर्म सोडला की मग पुन्हा स्विकारलेल्या धर्मात सुखी राहिला तर ठीक, नाही तर त्याच्या धर्मात परत येण्यानेही ( शुद्ध होऊनही ) समाज मात्र त्याच्याकडे धर्म सोडून गेलेलाच म्हणुन पाहत असेल असे वाटते.
बाकी मुद्दे पटवून सांगतांना लेखात दिलेले संदर्भ, सही !!!!
मुद्दे
मला वाटते, या मुद्द्यामधे थोडे ओव्हरसिम्प्लिफिकेशन(मराठी शद्ब ?) आहे. कुठल्याही कारणांमुळे असेल पण मुसलमान आक्रमकांचे अधिराज्य प्रस्थापित झाले आणि त्यानंतर घाऊक प्रमाणात धर्मांतरे झाली. "पहिल्याच दिवसापासून त्यांच्याशी व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवले असते " असे म्हणताना , या सर्व प्रक्रियेमधे असणार्या तत्कालीन सरकारमान्य दहशतीचा , हिंसेचा लेखकाला विसर पडलेला दिसतो. तत्कालीन हिंदु धर्मव्यवस्था आदर्शवत नव्हतीच - नव्हे ,कुठल्याही धर्माची मध्ययुगामधे जी हालत होती, तीच हिंदु धर्माची होती यात काहीच वाद नाही. पण धर्मांतरितांना आपली 'मुसलमान' अशी ओळख सांगण्यामधले स्वारस्य केवळ अ़कॅडमिक (मराठी शब्द) नव्हते. तशी ओळख ही तलवारीच्या पात्याला साक्षी ठेवून बनली. ज्यानी त्याला विरोध केला असेल त्यांना दहशतीला सामोरे जावे लागले (डोळे फोडणे वगैरे वगैरे नाजूक प्रकार).
तरीही...
कबूल. पण दहशतीमुळे सत्तेसमोर आपली ओळख नाइलाजाने 'मुसलमान' अशी सांगणार्यांना उर्वरित हिंदू समाजाने पहिल्यापासूनच जर बहिष्कृत न करता, ते हिंदूच आहेत, त्यांचे धर्मांतर झालेच नाही, ते आपल्यातीलच आहेत अशा पद्धतीने, सहानुभूतीने जर वागवले असते, तर त्यांना दिलासा मिळून जाहीररीत्या नाही, तरी खाजगीमध्ये तरी त्यांच्या मनात "आपण हिंदूच आहोत, केवळ नाइलाजाने आपली ओळख 'मुसलमान' म्हणून सांगावी लागत आहे" अशी आपुलकीची भावना निश्चितच रुजली असती, आणि कोण जाणे, त्यांची खाजगी निष्ठा (आणि दहशतीचे दडपण यदाकदाचित कालांतराने सत्तांतरामुळे किंवा इतर कारणांनी दूर झाल्यास जाहीर निष्ठासुद्धा!) हिंदुधर्माप्रति राहिली असती.
मला वाटते परकीयांच्या दहशतीपेक्षासुद्धा ही स्वकीयांकडून मिळणारी वागणूक अधिक घातक ठरली.
असो. ती वेळ कधीच निघून गेली आहे, आणि पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
मुद्दे २
उपरोक्त विवेचनामधे असहमत होण्यासारखे काहीच नाही. अत्यंत पोलिटीकली करेक्ट असे र्हेटोरिकल असे हे विवेचन आहे. एक तत्त्व म्हणून शिवसेना, अबु आझमीचा पक्ष , मनसे , भाजप , मुस्लिम लीग यांच्या निवडणुकीनिमित्त काढलेल्या चार्टरमधे (मराठी शब्द ?) असे "सर्वधर्मसमभाव" सारख्या गोष्टी वाचायला मिळतातच. पण हिंदू धर्मातील हिंसेच्या इतिहासाच्या संदर्भामधे या वर्तमानकालीन प्रश्नांची सरमिसळ करणे ही गल्लत आहे असे वाटते. उपरोक्त मुद्द्यांचा आधार घेऊन मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मातील वर्तमान प्रश्नांचा उहापोहसुद्धा घेता येईलच , पण मूळ लेखनाचा आणि त्या अनुषंगाने चालणार्या चर्चेचा उद्देश तो नव्हे हे मला कळते. त्याच प्रमाणे , मूळ लेखकानेही ही जाणीव ठेवायला हवी होती असे वाटते.
चांगला लेख आणि चर्चा
लेख छान आहे.
वरील ट्ग्यांचा लेख तसेच मुक्तसुनीत आणि बिरूटेसरांची वक्त्यव्ये वाचली आणि पटली. आशा करतो की चर्चा न भरकटता आणि "हेल्दी" होईल. विषय मोठा असल्याने जसे आठवेल तसे आणि अजून येणार्या प्रतिक्रियासंदर्भात लिहीन. येथे फक्त २-३ मुद्दे:
टग्यांनी म्हणलेले अत्याचार नक्कीच झालेत, काही ऐतिहासीक उदाहरणे त्यात जसे आहे तसे अस्पृश्यता नामक एक शाप पण आहे. फक्त ह्यात हिंदू धर्मातील वाईट रुढी आणि त्यांचा होणारा हिंदूधर्मीयांना त्रास हाच काय तो भाग आहे. तो विशेष करून राजसत्तेने दिला नसून पौरोहीत सत्तेने अर्थातच ब्राम्हणांनी दिला होता अथवा त्यांच्याकडून तशा रुढी तयार झाल्या आणि त्या सर्वच उच्चवर्णीयांनी वापरल्या. तसे भाग मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातपण झाले आहेत/होत आहेत. पण जेंव्हा "अत्याचार" हा शब्द वापरला जातो तेंव्हा त्याचा संदर्भ तत्संदर्भात जे "परकीय" असतात त्यांनी केलेल्या "इतरांवरील" अत्याचारासंदर्भात असतात. थोडक्यात तथाकथीत हिंदूत्ववादी हे मुसलमानांनी मुसलमानांवरच जी धार्मिक बंधने आणून त्यांनाच (म्हणजे मुसलमानांनाच) जखडून ठेवले आहे त्याला अत्याचार म्हणत नाहीत. पण मोहंमद घोरीने जे काही केले तिथपासून मोघलादींनी जे धार्मिक अत्याचार केले - त्यात स्त्रीयांना पळवणे, गुलाम करणे, बळजबरीची धर्मांतरे आणि अर्थातच स्थानीक सांस्क्रूतीक ठेवा उध्वस्त करणे त्यातील मंदीर हा मंदीर म्हणजे देऊळ म्हणून काही भाग असायचा त्याला बाकी सांस्कृतिक बाजू असायच्याच. शिवाय तक्षशिला/नालंदा यांचा/तत्सम विध्वंस ह्यात बसतो.. तेच पोर्तुगीज आणि इतर ख्रिश्चन मिशनर्यांबाबत. थोडक्यात तशा प्रकारचे हल्ले हे हिंदूंनी आणि ज्यूंनी इतरांवर केले नाहीत. म्हणून त्यांनी अत्याचार केले नाहीत असे म्हणले जाते.
शुद्धीकरण हा शब्द शिवाजीने वापरला का आत्ताचा आहे ते माहीत नाही. पण हिंदू (आणि ज्यू) धर्मांबाबत अशी अवस्था होती की त्यात तुम्ही जन्माने हिंदू होता बाहेरील व्यक्तीस हिंदू करण्याची व्यवस्था नव्हती. असे गंमतीत म्हणले जाते की, "everyone is born Hindu, unless and untill one denoucnes or embraces any other religion by some ceremony (such as to become catholic)." आपल्या (तुमच्या-माझ्या) अधुनिक सुशिक्षित मनाला असे म्हणणे की आपण नुसते हिंदू आहोत असे म्हणले तर काय बिघडले, असे म्हणणे सोपे आहे आणि खरे म्हणजे "लॉजिकल" पण आहे. पण शेवटी तसे त्या मनाला समजवण्यासाठी आणि इतरांना समजावून देण्यासाठी ती प्रथा तयार केली. शिवाजीची महानता काय तर त्याने नेताजी पालकर आणि (आठवते त्याप्रमाणे) बजाजी निंबाळकराचे धर्मांतर करून परत स्वधर्मात घेतले आणि मोघलांना आणि स्वकीय धर्ममार्तंडांना संदेश (मेसेज) दिला की असे होऊ शकते. इतकेच करून थांबला नाही तर स्वतःच्या मुलीचे लग्नपण बजाजीशी लावून् दिले (येथे नावात कदाचीत मी चू़क करत असेन, संदर्भ बघून चूक असल्यास सांगेन, अथवा इतरांना माहीत असल्या कृपया सांगा). थोडक्यात ह्यात केवळ एक मानसीक नजरेतून बदल करायचा प्रयत्न केला गेला. तीच गोष्ट त्याने ३ पोर्तुगिज पाद्र्यांना गोव्यातून पळवून आणून जबरदस्तीने हिंदू करून पोर्तुगिजांना दम देण्याबाबत केल्याचे ऐकले आहे.
**अशी गोष्ट ऐकिवात आहे, की कश्मीरच्या एका जुन्या राजाने (नक्की कोण ते माहीत नाही. कदाचित मागल्या शतकातला किंवा त्याही आधीचा असेल. गोष्ट ऐकीव आहे, संदर्भ माहीत नाहीत, आणि माझा इतिहास कच्चा आहे.) म्हणे काशीच्या पंडितांना कळवले की माझी समस्त मुस्लिम प्रजा माझ्या आदेशास मान देऊन हिंदू बनण्यास तयार आहे, तेव्हा कृपया शुद्धी करून त्यांना हिंदुधर्मात सामावून घेणेचे करावे. काशीच्या पंडितांनी साफ नकार दिला. परिणाम आपण पाहतोच.
ही गोष्ट मी देखील ऐकली आहे. त्यात इथपर्यंत ऐकले की ह्या पंडीतांनी राजालाच धर्मबाह्य करण्याची भिती घातली! नशिब तो राजा वैतागून मुसलमान झाला नाही (हे मी भारतीय भौगोलिक राजकारणासंदर्भात म्हणत आहे) !
बाकी अजून पण बरेच लिहीता येईल. पण जरी जवळून माहीती नसली तरी इतकेच म्हणेन की विशेष करून धर्मांतर आणि स्वगृहप्रवेश/शुद्धीकरण वगैरे जे प्रकार चालू केले गेले त्यात मूळ उद्देश हा समाजाच्या मनात ठसवण्याचा होता की आता हे हिंदू आहेत. (कारण नाहीतर आम्ही पावाचा तुकडा विहरीत पडला म्हणून अथवा पाद्र्याची घंटा ऐकली म्हणून एखाद्याला/एखादीला ख्रिश्चन समजणार!) .
अर्रर्र! बजाजीशी नाही
अवश्य! बजाजी निंबाळकर महाराजांचे मेव्हणे. सईबाईंचे बंधू. बजाजींच्या मुलाशी महादजीशी महाराजांनी आपल्या मुलीचे, सखुबाईचे लग्न लावून दिले.
आपल्या आजुबाजुला ..
प्रामुख्याने भारतात रहाणारया वाचक लोकां करीता हा प्रश्न आहे .
१.आपल्या अथवा जवळच्या नातेवाईकाच्या (वा मित्राच्या )मुलीचे मुस्लीम माणसाशी लग्न् झालेले आहे काय् ?
२.अश्या "माजी हिंदू" मुलींशी असलेले संबंध हिंदू नातेवाईक कश्या प्रकारे हाताळत आहेत ?
३. हिंदू मुलीने मुस्लीम मुलाशी लग्न करताना त्याला धर्मांतर करायला लावल्याचे ऐकीवात आहे काय ?
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
मला माहीत असलेले उदाहरण
पुण्यातील एका संशोधन संस्थेतल्या माझ्या मित्रांची गोष्ट :
हिंदू मुलगी/मुसलमान मुलगा कोणीही धर्मांतरण केले नाही. घरून ठीकठाक असावे. बॉसचा स्त्रीबद्दल दूषितग्रह, वाईट वागणूक - नोकरी (नवराबायको दोघांनी) सोडली.
शेजारी : एका हिंदू कुटुंबाची दुहेरी व्यथा. पहिल्या मुलीने मुसलमान मुलाशी लग्न ठरवले - धर्मांतरणाची अट नाही. आईने "आत्महत्या करेन" अशी धमकी देऊन लग्न मोडले. या मुलीचे पुढे पोटजातीत, हुंड्यासकट विधिवत लग्न झाले. दुसरी मुलगी (आईचे आत्महत्येचे बहुधा अतिरंजित बोलणे आहे असे मानून) घरातून चालती झाली, ख्रिश्चन मुलाशी लग्न केले (धर्मांतरण नाही.). पाच वर्षे मायलेकींत अबोला. मूल जन्मता नवी आजी/नवी आई/बाळात समेट.
भारताबाहेर अनेक उदाहरणे ठाऊक आहेत - कुठल्यातच धर्मांतरण नाही - पण येथील संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे सर्वच उदाहरणे अवांतर होतील.
उलटे उदाहरण
भारताबाहेर अनेक उदाहरणे ठाऊक आहेत - कुठल्यातच धर्मांतरण नाही - पण येथील संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे सर्वच उदाहरणे अवांतर होतील.
भारतातील माहीत नाही, पण अमेरिकेत मात्र मी भारतीयांसंदर्भात अशी उदाहरणे पाहीली आहेतः
मुलगा हिंदू-मुलगी मुसलमान. दोघेही चांगले. पण लग्नाची वेळ आल्यावर मुलाकडून कुठलीच अट नसताना, मुलीकडून अट आली की धर्मांतर करावे लागेल. जेंव्हा विचारले की जर तुला कोणी म्हणत नाही आहे, आणि लग्ने दोन्हीप्रकारे "एन्जॉय" करू वगैरे, तर उत्तर मिळाले, की प्रश्न तो नाही आहे. आम्ही एकवेळ ख्रिश्चन अथवा ज्यूंशी त्यांना धर्मांतर करायला न लावता लग्न करू शकतो, पण हिंदूंच्याबाबतीत नाही... नर्गीसचे ढळढळीत इतके जुने (आणि चांगले) उदाहरण माहीत होते, तरी देखील ते सांगून पालथ्या घड्यावर पाणी...
तसेच गोरे अमेरिकन्सपण पाहीले आहेत. पुरूषाने (गोरा ख्रिश्चन) धर्मांतर केले - मुलगी मुसलमान (मध्यपुर्वेतील). (अमेरिकन) बायकांनी धर्मांतर केलेले ऐकले आहे, पाहीलेले नाही.
भारतीय वंशाचा हिंदू मुलगा आणि ख्रिश्चन मुलगी. दोघेही उच्चविद्याभूषित आणि रुढार्थाने धार्मिक नाहीत पण मुलीच्या घरून लग्नाला विरोधच (धर्मांतर वगैरेचा प्रश्नच नाही)! वडीलांनी हार्टपेशंट असल्याची भिती घालून एका अर्थी दोघांची (मुलगा-मुलीची) आयुष्ये उध्वस्त केली.
लेख आवडला
लेख आवडला. हिंदूंनी हिंदूवर अत्याचार केले हे निर्वीवाद. पण माझ्या मते जेव्हा जेव्हा 'जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले, धर्मातरण केले, आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही' असे मुद्दे येतात तेव्हा त्यात 'हिंदूंनी इतर धर्मियांवर (आपला धर्म वाढवण्यासाठी/वर्चस्व स्थापित करण्यासाठी) केलेले अत्याचार' असा अर्थ अभिप्रेत असावा. ज्याची जगाच्या इतिहासार फार कमी (अथवा अजिबात नाही) नोंद असावी
मान्य, पण...
जर तर
एवढेच म्हणता येईल की आम्ही आमच्याच धर्मबांधवांवर धार्मिक अत्याचार करण्यात आमची ऊर्जा इतकी वापरली, आणि त्याचीच चटक आम्हाला इतकी होती, की इतर धर्मीयांवर धार्मिक अत्याचार करायला आमच्यात फारशी ऊर्जा किंवा इच्छा उरली नाही; नाहीतर आमच्यात ती क्षमताही होती, आणि वृत्तीही होती.
ह्यात जर-तर चा भाव आला. हिंदू धर्मातील आपण सुरवातीस दिलेली उदाहरणे ही हिंदू संस्कृतीचा कालावधी (>५००० वर्षे) लक्षात घेतल्यास अधुनीक आहेत. जे काही स्वधर्मीयांवर अत्याचार झालेत त्यातील बहुतांशी हे गेल्या सहस्त्रकातील आहेत. वर्ण व्यवस्था जुनी धरली तरी अस्पृश्यता हा प्रकार पण जुना नाही आहे. आणि जेंव्हा हे अत्याचार चालू झाले त्यावेळेस आपली राज्ये असण्यापेक्षा आपली बरीच राज्ये इस्लामीक राजवटीच्या अधिपत्याखाली गेली होती. सत्यकाम जाबालीसारखा वेश्येच्या मुलाला पण ज्ञानप्राप्ती करून घेताना ज्ञानेश्वरांसारख्या "ब्राम्हणाच्या" मुलासारखा त्रास झालेला नव्हता. नंतरच्या काळात नियम तयार झाले तरी अस्पृश्यता तयार झालेली दिसणार नाही.
थोडक्यात हा उर्जेचा प्रश्न नव्हता तर संस्कृतीतून तयार झालेल्या वृत्तिचा प्रश्न होता. हिंसक आणि आक्रमक वृत्ती ही स्वकियांविरुद्ध आणि परकीयांविरुद्ध असा भेदभाव करत बसत नाही. हिंदू धर्मात आधी म्हणल्याप्रमाणे धर्मांतर वगैरे काही प्रकार नव्हता कारण "एकम् सत् विप्रा बहुदा वदंती" म्हणणार्या या तत्वज्ञानात तुम्ही तुम्हाला पाहीजे तसे रहा खर्या अर्थाने Live and let live विचारसरणी होती/आहे. आपली त्यासंदर्भात आक्रमक वृत्ती असण्यापेक्षा स्वसंरक्षणार्थ (defensive as aganist aggressive) कृती असते. तीच पुर्वीच्या काळात दिसेल आणि आताच्या आपल्या राजकीय / अंतर्राष्ट्रीय धोरणात पण दिसेल.
हिंसक आणि आक्रमक प्रवृत्ती
हिंसक आणि आक्रमक प्रवृत्ती निर्माण होण्यास भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा असतो. जिथे दररोजच्या खाण्याची किंवा जगण्याची भ्रांत असते तिथे "बॅटल फॉर सर्वायवल" हा एकच नियम लागू होतो.
भारतीयांना सुदैवाने हा नियम लागू झाला होता असे वाटत नाही आणि त्यामुळे ती प्रवृत्ती येथे रूजली नसावी.
बाकी, अस्पृश्यतेचा मुद्दा बहुतांशी योग्य आहे.
संस्कृती आणि वृत्ती
हिंसक आणि आक्रमक प्रवृत्ती निर्माण होण्यास भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा असतो. जिथे दररोजच्या खाण्याची किंवा जगण्याची भ्रांत असते तिथे "बॅटल फॉर सर्वायवल" हा एकच नियम लागू होतो.
आत्ताच्या काळात, अमेरिकेची तसेच पुर्वी युरोपातील काही राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील हिंसक आणि आक्रमक वृत्तील् ही काही "बॅटल फॉर सर्वायवल" मुळे आली असे म्हणता येईल असे वाटत नाही. पूर्वीच्या काळात, अलेक्झांडरला काही खायची भ्रांत होती असे वाटत नाही की ज्यामुळे त्याने उगाच युद्ध पुकारत पर्शिया जिंकला आणि त्याच गुर्मित भारत जिंकण्याच्या इर्षेने आला.
भारतीयांना सुदैवाने हा नियम लागू झाला होता असे वाटत नाही आणि त्यामुळे ती प्रवृत्ती येथे रूजली नसावी.
भारतीयांना हा मुद्दा लागू न होण्याचे मुख्य कारण हे येथील संस्कृती आणि तत्वज्ञान हेच आहे. आज काही झाले तरी एखादा ख्रिस्त (आणि तो परत प्रेषित, धर्मसंस्थापक नाही) सोडला की ज्याच्या बद्दलच्या गोष्टीप्रमाणे, ज्याने क्रुसावर चढवले जात असताना पण तसे करणार्या लोकांबद्दल क्षमा मागितली, तर अब्राहमिक रिलिजन्स मधे संयम, अहींसा आणि शांतता कमी दिसेल. पण एक धर्मग्रंथ नसलेल्या हिंदू धर्मात ज्ञानेश्वरांचे पसायदान हे काही त्यांना अचानक सुचलेले नाही आहे तर ते अनेक सहस्त्रकाच्या संस्कृतिक आणि तत्वज्ञानातून रक्तात भिनलेली वृत्ती आहे. म्हणूनच इतकी पुराणे लिहीली गेली, त्यात अत्याचार दाखवले गेले, अन्याय झालेले सांगीतले, लढाया, हिंसा आणि शेवटी विजय सर्व काही आले. पण तात्पर्य सांगताना "पुण्य ते उपकार, पाप ते परपिडा" (अष्टादश पुराणेशू व्यासस्य वचनद्व्यम् परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनम्) असेच सांगीतले गेले. म्हणूनच हे केवळ भौगोलीक म्हणून आपण नकळत स्वतःला "नको तेथे" उगाचच कमी लेखतो असे वाटले.
अलेक्झांडर आणि अमेरिका
हे एखादेच निघतात. अलेक्झांडरप्रमाणे अत्यंत महत्त्वाकांक्षी एखादाच असतो, त्याला ग्रीकांची (मॅसेडोनिया) प्रवृत्ती म्हणता येणार नाही.
अलेक्झांडरला खायची भ्रांत नसली तरी जगायची भ्रांत नक्कीच असावी. अर्थात, राजाची भ्रांत प्रजेच्या भ्रांतीपेक्षा वेगळी असावी. चिमुकला देश, अन्य ग्रीक राज्यांचे वर्चस्व, पर्शियाच्या सततच्या आक्रमणाने खिळखिळी झालेली राज्यव्यवस्था, लहान राजा गादीवर बसतोय म्हणताच आक्रमणाला सज्ज होणारे अथेन्स आणि थेबेस इ. इ. याला अलेक्झांडरची गुर्मी म्हणता येत नाही.
पर्शियाच्या विजयानंतर मात्र ही जगज्जेत्यांची गुर्मी बनते पण त्यानंतर हिंसक आणि रानटी प्रवृत्ती राहात नाही (निदान दाखवायला, अलेक्झांडरने रानटी शिरकाणे केलेली आहेत पण तीही ग्रीकांची प्रवृत्ती म्हणता येत नाही, ती त्याची मानसिकता होण्याची चर्चा इतरत्र करता येईल.) कारण आपण दया, कला, संस्कृती यांचे रक्षक आहोत हे ठसवून द्यायचे असते. नाहीतर, अलेक्झांडरने भारतात आल्यावर ब्राह्मणांशी वाद-विवाद चर्चा न करता सर्वांची कत्तल केली असती. पुरूला अभयदान दिले नसते. (यात राजकारण आहे,प्रेमळपणा नाही)
शेवटी, ग्रीकांचे तत्वज्ञानही आपल्या तोडीचेच (वेगळ्या अंगाने जात असले तरी) आहे. अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे अशाच रितीने आपण तारणहार असल्याचे दाखवतात.
परंतु, अलेक्झांडर भारतातून परतण्याचे एक मुख्य कारण त्याच्या सैन्याला भारतीय हवामान आणि भौगोलिक परिस्थितीशी (जंगले, श्वापदे, किटक, पाऊस) जमवून घेता येईना हे आहे. तसेच, अलेक्झांडरने जिंकलेला पर्शिया, इराक, अफगाणिस्तानचा प्रदेश हा काही त्याला फायद्यात टाकणारा होता असे वाटत नाही, टाकलेच तर नुकसानीतच टाकणारा होता (आणि तो तसाच ठरला.) त्यामुळे या सपाट ओसाड वाळवंटापुढे एक प्रगत प्रदेश आहे याचे कुतूहलही त्याला पुढे नेणारे ठरले.
याउलट, जर आपल्या राजांना पूर्वापार गांधारानंतर वाळवंट किंवा ओसाड प्रदेश (निदान त्यांच्या जमिनीपेक्षा) आहे हे माहित असेल तर ते उगीच पुढे का जावेत? यात मला शहाणपणा दिसतो.
हेच म्हणायचे आणि हे सुचण्याचे कारण आपल्याकडील चांगली नैसर्गिक स्थिती हे अमान्य करता येत नाही. भरल्या पोटी समाजाला तत्वज्ञान सुचणे (फक्त ज्ञानेश्वरांना नाही, ते अपवाद, वेगळे, थोर आहेत पण सामान्य जनता) हे संस्कृतीच्या वाढीचे लक्षण आहे. म्हणूनच मुघल सत्ता इथे रूजल्यावर अकबराला तत्वज्ञान सुचू लागले. परागंदा हुमायूंला ते सुचणे अवघड होते आणि जेत्या औरंगझेबाला त्याचा मद चढला. (अमेरिका, अलेक्झांडरप्रमाणे. तसेच, याचे एक कारण त्याची अरसिकताही असू शकेल.)
अमेरिकेत बोटीतून बांधून आणलेल्या काळ्या गुलामांची गाणी ऐकली तर त्यात स्वच्छ आभाळ, पोटाला अन्न, मोकळीक याप्रकारचे शब्द दिसतात. त्यात जाणीवपूर्वक अध्यात्म नाही. याचा अर्थ अध्यात्मिक प्रवास करण्याची त्यांची तयारी नाही असे नसून पोटाची भ्रांत असा आहे. बरेचदा, लेखक - कवी यांना राज्याश्रय का देत किंवा आपल्या वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मणांना पोटासाठी काबाड कष्ट करण्याची गरज का ठेवलेली नाही? याचे कारण हेच की भरल्या पोटी होणारी साहित्य निर्मिती ही भुकेल्या कंगाल पोटापेक्षा वेगळी असते.
केवळ भौगोलिक असे म्हटलेले नाही (भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा असतो, जसे, अमेरिकेला तेल हवे) आणि हे स्वतःला कमी लेखायचे कारण कोठे आहे? ही तर बर्याच संस्कृतींची वाटचाल आहे. बर्याच प्राचीन संस्कृती याचमुळे लयाला गेल्या कारण कोणाला कला, स्थापत्त्य, तत्वज्ञान, अध्यात्म सुचू लागले. भारतीय संस्कृती त्या सर्वांतून तग धरून राहिली यात कोठेही कमीपणा नक्कीच वाटत नाही.
अत्याचार
हिंदूंनी जबरदस्तीनेच काय पण स्वखुशीनेसुद्धा परधर्मियांना हिंदू करून घेतले नाही. अपवाद, शिवाजी, सावरकर आणि काही हिंदुत्ववादी(फक्त) पक्ष. त्या अर्थाने हिंदूंनी धार्मिक अत्याचार केले नाहीत. --वाचक्नवी
अत्याचार
अत्याचाराची व्याख्या/संकल्पना
अत्याचाराची मानसिकता
अत्याचाराच्या पद्धती
अत्याचाराची तिव्रता
अत्याचाराचे परिणाम
असे निकष लाउन प्रत्येक अत्याचाराकडे तुलनात्मक पहावे.
असे निकष लावले तर प्रत्येक धर्मात अत्याचार आहेत. क्रुरता ही त्यामागची नैसर्गिक प्रेरणा असावी. जेत्याला जिंकण्यासाठी अत्याचार , त्यानंतर आपल्या यशाचा उन्माद साजरा करण्यासाठी अत्याचार लागतोच. मात्र वर्तमान विवेकवादी/ मानवतावादी निकष लाउन आपण भुतकाळातल्या गोष्टींकडे पाहत राहिलो तर उपाययोजना या कालविसंगत ठरतात.
दिवसा फुलपाखर हातात सापडत नाहीत म्हणून पहाटे शेतातल्या पानमळ्यात अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे पकडून त्यांचे पंख मी गंमत म्हणुन लहानपणी तोडत् असे . आज मला तो फुलपाखरांवर केलेला अत्याचार वाटतो.
प्रकाश घाटपांडे
अत्याचार - सुधारणा...
असे निकष लावले तर प्रत्येक धर्मात अत्याचार आहेत.
हे वाक्य मान्य असले तरी अर्धे वाटते... "केवळ प्रत्येक धर्मातच नाहीत तर स्वतःला निधर्मी म्हणवणार्यांमधे आणि म्हणूनच मानवी स्वभावातच अत्याचारी वृत्ती दिसेल" असे म्हणावे. केवळ धर्मांना त्यात गुंतवणे म्हणजे थोडासा बुद्धीभेद वाटतो.
भारताचे दुहेरी नागरिकत्व
काही वाचलेले आणि जवळून ऐकलेले
पंतप्रधान नरसिंहरावांना जेंव्हा विचारले होते की दुहेरी नागरीकत्व का देत नाहीत? ते उत्तरले की जर इतके सोपे असते तर आधीच्या लोकांनी कधीच केले असते :-) - काही अंशी प्रामाणिक उत्तर (अर्थात कारणे प्रकाशित न करत प्रश्न उडवत लावून!)
रालोआ ने जे आणले ते काही पी ओ आय पेक्षा विशेष वेगळे नव्हते
पंतप्रधान मनमोहन सिंगसरकारने जे काही बदल केले त्यात "रेसिपोर्सिटीचा" भारतीय कायद्यातील कलम काढून टाकले. त्याच कलमामुळे (बदलायच्या आधी) सोनीयागांधींना पंतप्रधान पद नाकारता आले होते.
धर्मांतर..
धर्मांतर..
माझ्या माहितीतल्या काही व्यक्ती (पुरुष आणि स्त्री दोन्हीही) ह्या जन्माने मुसलमान असून आता धर्मांतर करून हिंदु झालेल्या आहेत. त्यांना धर्मांतर करताना काहीही त्रास झालेला नाही. सविस्तर नंतर लिहेन.
हैयो हैयैयो!
लेख आवडला
टगेरावांचा लेख व इथे आलेले प्रतिसाद फार चांगले व माहितीपूर्ण आहेत.
-- आजानुकर्ण
पुष्यमित्र शुंग
जो प्रतिसाद नविन लेखाला कारणीभूत ठरला तो परत देत आहे.
पुष्यमित्र शुंग(? पुष्यमित्र बद्दल मतभेद आहेत.)
मिहिरकुल.
पल्लव
विकी चा दुवा.