मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स वगैरे

[ह्या लेखाची मूळ आवृत्ती मी गेल्या वर्षी माझ्या अनुदिनीवर प्रकाशित केली होती. त्या काळात मी मराठी साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या आणि त्यावर विसंवाद करणाऱ्या एका दुसऱ्या संकेतस्थळाचादेखील सदस्य होतो, परंतु तेथे हा लेख प्रकाशित झाल्यास त्याची कदर होणार नाही, हे लक्षात आल्याने हा लेख तेथे मुद्दामून प्रकाशित केला नाही.]

इ.स. २००६त बिल गेट्सने घोषणा केली की ते २००८ पासून मायक्रोसॉफ्टच्या दैनंदिन व्यवहारापासून दूर राहतील, आणि त्यांच्या "बिल आणि मेलिंडा गेट्स चॅरिटेबल फाउंडेशन" चे काम पूर्णवेळ पाहतील. हे अर्थातच अनपेक्षित नव्हते. काही वर्षांपूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्टची व्यवसाय-सूत्रे स्टीव्ह बामरकडे (मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकार - CEO) सोपवली होती आणि स्वत: तंत्रज्ञानाकडे लक्ष देऊ लागले होते. मध्यंतरी त्यांनी रे ऑझीची ग्रूव्ह नेटवर्क्स ही कंपनी विकत घेतली, त्याचा मुख्य उद्देश रे ऑझीला मायक्रोसॉफ्टमध्ये आणावे, हा होता. रे ऑझी हा लोटस नोट्स या प्रसिद्ध आज्ञावलीचा निर्माता. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बाना-शॅंपेन मधून पदवी मिळाल्यावर त्यांनी स्वीय संगणकावरील पहिली अंकासरी व्हिजिकॅल्क ही डॅन ब्रिकलिन बरोबर विकसित केली. तेव्हापासून एक प्रतिभाशाली तंत्रज्ञ म्हणून रे ओझींना ओळखलं जातं.

ओझी मायक्रोसॉफ्टमध्ये आल्यावर त्यांच्यावर आधी एम.एस.एन. ची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी महिन्याभरातच एक अभ्यासपूर्ण पत्र मायक्रोसॉफ्टच्या सगळ्या व्यवस्थापन यंत्रणेला पाठवलं. त्याचा मुख्य रोख होता, गूगल सारख्या प्रतिस्पर्धकांसमोर मायक्रोसॉफ्टचा निभाव कसा लागणार ? फक्त स्पर्धेचा आढावा घेऊनच ओझी थांबले नाहीत, तर विंडोज लाइव्ह, आणि ऑफिस लाइव्ह अशा दोन उपक्रमांना त्यांनी जोरात सुरुवात केली. त्याच चतुर्थकात (quarter) मायक्रोसॉफ्टने या दोन प्रकल्पांवर खूप आज्ञायकांना नेमले. त्याचे परिणामही लगेच दिसून आले. एम.एस.एन वर येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. ह्या दोन प्रकल्पांमुळे मायक्रोसॉफ्टचे स्वरूप पालटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत मायक्रोसॉफ्टचे उत्पन्न मुख्यत: विंडोज आणि ऑफिस ह्या दोन आज्ञावलींच्या विक्रीतून होते. ह्या आज्ञावली विकत घ्या, तुमच्या संगणकावर स्वत:च स्थापित करा, आणि वापरा. तुमचा त्या आज्ञावलींचा वापर कितीही कमी असला, तरी किंमत तेव्हढीच द्यावी लागणार. संगणक तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षांत "शुल्ककेंद्रित" (subscription-based) अशा आज्ञावलींची चलती सुरू झाली. गूगलनेही Writely नावाची कंपनी विकत घेतली आणि त्यांची शब्दासरी (word-processor) ही फुकट प्रकाशित केली. तसेच नुकतीच त्यांनी एक अंकासरीदेखील (spreadsheet) अशाच विनामूल्य धर्तीवर उपलब्ध करून दिली. त्यातून जाहिराती दाखवून त्यावर पैसा मिळेल असे गूगलचे गणित आहे. किंवा ह्या आज्ञावली एकदा लोकप्रिय झाल्या तर त्यांच्यावर "वापराल तेव्हा शुल्क द्या" (pay-as-you-go) या स्वरूपाने उत्पन्न मिळवावे अशीही कल्पना असू शकेल. सेल्सफोर्स.कॉम नावाच्या कंपनीने तर ग्राहक-संबंधाचा संपूर्ण आज्ञाकोशच शुल्कपद्धतीने उपलब्ध केला. या नवीन तंत्रज्ञानाची ही केवळ सुरुवात आहे. पण त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे धाबे दणाणले आहे.

पण या नवीन तंत्रज्ञानाला सामोरे जाणे शक्य व्हावे म्हणून मायक्रोसॉफ्टने त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बामर सोडल्यास मायक्रोसॉफ्टची पूर्णपणे पुनर्रचना केली आहे. त्यासाठी बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट सोडणेच योग्य होते. ते त्यांनी स्वत:हून ओळखले, हे विशेष.

भारतातील वर्तमानपत्रात बिल गेट्स म्हणजे कुणी संगणकक्षेत्रातला सर्वोत्कृष्ट अभियंता, असे वर्णन नेहमी वाचायला मिळत असते. वार्ताहरांना संगणकक्षेत्रातील खाचाखोचा समजावून सांगणे हे माझे फावल्या वेळातील एक काम आहे, पण त्याचा परिणाम होतोय असे दिसत नाही. तसेही तंत्रज्ञानाविषयी भारतातील विशेषत: मराठी वृत्तपत्रांत खूपच कमी लिहिले जाते. त्याविषयी लिहिणाऱ्या लोकांचे वाचन कसे वाढवावे, हा मोठाच प्रश्न आहे.

बिल गेट्सचे संगणक विज्ञानात योगदान नगण्य आहे. (मायक्रोसॉफ्टने स्वत: फार कमी शोध लावले आहेत. परंतु इतर यशवंत संशोधकांची नक्कल खूपच चांगली करून, किंवा त्यांच्या कंपन्याच विकत घेऊन ते अग्रेसर राहिले आहेत.) परंतु व्यवसायात त्यांच्या तोडीचे फार कमी. त्यामुळे व्यवसायावर येणारे संकट त्यांनी लगेच ओळखले. यापूर्वी १९९५ मध्ये महाजालामुळे मायक्रोसॉफ्टला निर्माण झालेला धोकाही त्यांनी तसाच ओळखला होता, आणि मायक्रोसॉफ्टला महाजालाशी दोन हात करण्याऐवजी संगनमत करायला लावून त्यांनी पूर्णपणे बदलले होते. पण आता पुन्हा तसे करण्याइतकी शक्ती त्यांच्यात उरली नसावी. दुसरे म्हणजे जेव्हा तुमच्याकडे बिल गेट्सइतकी माया असते, तेव्हा दानधर्म हे देखील एक पूर्णकालीन काम असते. हे दान योग्य पात्री पडते की नाही हे समजण्यासाठी व्यावसायिक दृ्ष्टिकोणच हवा. (तसा दृष्टीकोण नसल्यामुळे देशांची सरकारे किती उधळपट्टी करतात हे आपण पाहिलेच आहे.) दानधर्माला बिल गेट्समुळे असा व्यावसायिक दृष्टिकोण लाभणार असेल, तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे.

ज्यावेळी आज्ञायन (programming) हा व्यवसाय नसून एक छंद होता, तेव्हा बिल गेट्सने आज्ञायकांना उद्देशून फेब्रुवारी ३, १९७६ ला एक मुक्त पत्र लिहिले होते. ते आपल्यालला येथे वाचता येईल.

या एका पत्राने संगणक व्यवसायात क्रांती घडून आली. आता अशीच क्रांती दानकर्मात कधी येते ते बघायचे.

लेख आवडला

छान लेख!

आताच संगणकावर विंडोज एक्स पी चा अपडेट 'Windows Genuine Advantage (WGA)' पुन्हा एकदा घुसणासाठी परवानगी मागू लागल्यावर 'बिल गेट्स' चा उद्धार करत त्याला हाकलून लावले.

बिलवाच्या ह्या दान धर्मामागे देखिल व्यावसायीक दृष्टिकोन('ण'?) आहे हे पटले.. (मागे भारतात येउन ह्या दान धर्माची बरिच जाहिरात करून आंध्र प्रदेश की मध्य प्रदेश इथल्या सरकारी संगणकांचे मोठे कंत्राट मिळवले असे ऐकिवात आले होते! )

-वरूण

वि. ९८ आणि मॅक

विन्डोज् ९८ च्यावेळी बिल गेट्स यांनी एक सूत्र आज्ञायकांना सांगितले होते - ' मेक इट लाईक मॅक!'

छान् फारच् छान्

मायक्रोसॉफ्टने स्वत: फार कमी शोध लावले आहेत. याबद्दल्

त्यांचा पुर्ण् वेळ् कदाचित् विंडोज् सांभाळण्यतच् जात् असावा ?

छान लेख

लेख बराच माहीतीपुर्ण आहे. जसे तुमचे बाकिचे लेख असतात. एम्एसएन् चे विन्डोज लाइव्ह कसे झाले याबद्दल उत्सुकता कधीची होतीच. ती माहीती दिल्याबद्दल धन्यवाद्.

- सूर्य

फार छान लेख आहे

फार छान लेख आहे

रे ऑझी

रे ऑझी यांनी ब्राउझर याचा अर्थच न्याहाळक असा असल्यामुळे तो लिहिण्यास अनुकूल असा कधीच होणार नाही असा मेनी टू मेनी या ब्लॉगवर दिलेला प्रतिसाद मी माझ्या प्रतिसादातून खोडून काढला होता. अर्थात तेव्हा रे ऑझी मायक्रोसॉफ्टमध्ये नव्हते आणि मला इतकी मोठी माणसे बोलत असताना आपण गप्प राहून फक्त वाचावे इतका पोच नव्हता.
त्यानंतर मी प्रतिसाद देताना बरीच काळजी घेऊ लागलो आहे.

पण आपले बरोबर ठरले आहे

गूगल ने राईटली ही शब्दासरी विकत घेऊन ऑझींना न्याहाळकात लिहिताही येते, हे पटवून दिले असावे.
ह्या जगात व्हिजनरी म्हणवणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. त्यांचे सगळ्यांचे नेहमीच बरोबर असते असे नाही.
आय बी एम चे संचालक टी जे वाटसन ह्यांनी ह्या जगात ५ पेक्षा अधिक संगणकांना मागणी नाही, असे म्हटले होते.
याचा अर्थ टी जे वाटसन मूर्ख होते असा नाही. पण त्यांची संगणकाची व्याख्या चुकली होती.

- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव