फलज्योतिषाचे 'ज्योर्तिविज्ञान` असे गोंडस नामकरण करुन यूजीसीने त्याचा अंतर्भाव विज्ञान शाखेत सुरुवातीला केला होता. बीएस्सी अस्ट्रॉलॉजी, एमेस्सी अस्ट्रॉलॉजी यासारखे कोर्सेस सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे फलज्योतिषाला खगोलशास्त्रापासून दूर ठेवणारी रेषा पुन्हा एकदा धूसर केली गेली. त्यासाठी आपल्याला किमान पाच शतके मागे नेणारा अभ्यासक्रम अक्षरश: लादला होता. परंतु जनमताच्या रेटयामुळे हा विषय आता किमान विज्ञान शाखेतून वगळला आहे.
यूजीसीने १९९० मध्ये फलज्योतिषाला शिष्यवृत्ती देण्यासाठी असलेल्या विषयात समाविष्ट केले. हा चंचुप्रवेश होता. त्यावेळी एसएनडीटी विद्यापीठात ज्योतिषशास्त्र व हस्तसामुद्रिक हे अभ्यासक्रम सुरु करण्याचे घोषित करण्यात आले. परंतु त्याविरुद्धही असाच गदारोळ होउन विद्यापीठाला प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता. यूजीसीच्या आत्ताच्या प्रस्तावाबाबत ३१ मार्च २००१ च्या इंडियन एक्सप्रेस या मान्यवर वृत्तपत्राने पुढील प्रमाणे बातमी प्रसिद्ध केली - यूजीसी चे चेअरमन हरी गौतम म्हणाले, 'बी. एस्सी. व एम. एस्सी. इन ऎस्टा्रलॉजी हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून तो विवक्षित विद्यापीठात उपलब्ध असेल. तेथे 'ज्योतिर्विज्ञान` या नांवाने हा विषय शिकविला जाईल. अधिक तपशील लौकरच जाहीर होईल. वेगवेगळया विद्यापीठाच्या तज्ज्ञ लोकांचे पॅनल याचा अभ्यासक्रम निश्चित करेल.` यावर साहजिकच वादळ उठले. त्यानंतर यूजीसी ने आपल्या निर्णयाच्या पुष्टयर्थ खालील मुददे मांडले :-
१) वैदिक फलज्योतिष हा आपल्या पारंपारिक ज्ञानाचा एकमेव मुख्य विषय नाही. परंतु ही शाखा मानवी जीवनात घडणाऱ्या घटना व विश्व यांचे कालसापेक्ष ज्ञान देते.
२) या शाखेचे वैशिष्टय असे की यात काळ, त्याचे स्वरूप व मानवी जीवनावर हाणारा परिणाम यांची उपयुक्तता अभ्यासता येते.
३) अचूक अंदाज व्यक्त करण्या साठी सर्वोत्कृष्ट पद्धतीचा वापर केला असून सुद्धा प्रत्यक्षात घटना मात्र वेगळयाच प्रकारे घडतात, ही एक दृष्टिस पडणारी बाब आहे आणि त्यातूनच आयुष्यातील तणाव, चिंता, नैराश्य वाढत जाते. याठिकाणी अज्ञाताचा वेध घेण्यासाठी वेदिक फलज्योतिष उपयुक्त ठरु शकेल कारण हा कालाशी निगडीत असलेला विषय आहे.
४) या कोर्समुळे केवळ ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नसून वैदिक गणित, वास्तुशास्त्र,
हवामानाचे अंदाज शेती, खगोल आदि विषयांच्या संशोधनाला नवी दिशा मिळेल.
परंतु तरीही वादळ शमले नाही. त्यानंतर ६ ऑगस्ट २००१ रोजी हिंदुस्तान टाईम्स ने प्रसिद्ध केलेली बातमी होती - 'यूजीसीने ज्योतिर्विज्ञान हे विद्यापीठाने विज्ञान शाखेतच सामाविष्ट केले पाहिजे असा आग्रह धरला नसून बी.ए. एम.ए. अशा अभ्यासक्रमातही हा विषय सामाविष्ट केला जाउ शकतो असे म्हटले आहे. तसेच २२ विद्यापीठांना अशी परवानगी देण्यात आली आहे.` अखेरीस यूजीसीने पलटी मारलीच!
तत्पूर्वी शास्त्रज्ञ डॉ. पी.एस.भार्गव, प्रो. के. सुभाषचंद्र रेड्डी व चंदन चक्रवर्ती यांनी या निर्णयाविरुद्धची याचिका आंध्र प्रदेश न्यायालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. ज्योतिष हे विज्ञान म्हणून सिद्ध झालेले नाही. किंवा तशी चाचणीही घेण्यात आली नसताना हा विषय थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हे अतार्किक असून सद्सद विवेकाचे नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बॅंक कर्मचारी प्रबोधिनी लातूर, यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात या विषयासंबंधी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी धर्मावर आधारित असलेले शिक्षण हे नागरिकांच्या पैशाने विद्यापीठातून देणे हे भारतीय राज्य घटनेच्या कलम २८ प्रमाणे चूक आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्योतिर्विज्ञान हा विषय विद्यापीठात सुरु करणे बाबत अध्यक्ष हरी गौतम यांच्या सहीने पाठविलेली पत्रे ही बेकायदेशीर आहेत अशी भूमिका मांडली आहे.
भारतातील काही राजकीय पक्षांनी मात्र शिक्षणाच्या भगवेकरणाला किंवा ब्राम्हणी वर्चस्वाच्या सुप्त शक्यतेला विरोध म्हणून यूजीसीच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
परंतु एक प्रश्न तरीही उरतोच, ज्ञान सागरातले शिंपले इकडून तिकडे जाण्यासाठी यु.जी.सी. च्या संमतीची काय गरज आहे? यूजीसीनेच आपल्या उपसचिव डॉ. पंकज मित्तल यांच्या सहीने वेदिक ऎस्ट्रॉलॉजी विभाग सुरु करु इच्छिणाऱ्या विद्यापीठांना पाठवलेल्या २३ फेब्रूवारी २००१ च्या पत्रा सोबत पूर्वी पासून हा विषय शिकवणाऱ्या विद्यापीठांची यादीच माहीतीपत्रकात जोडली आहे. यात राजस्थान विद्यापीठ उदयपूर, विक्रम विद्यापीठ उज्जैन, एम.एस. विद्यापीठ बडोदा, पी.एस. तेलगु विद्यापीठ हैदराबाद या सारख्या १६ विद्यापीठांची यादीच जोडली आहे. म्हणजे यूजीसीच्या संमतीविनाही हा विषय भारतात शिकवला जात होता हे खुद्द यूजीसीनेच कबूल केले आहे.
विविध तज्ज्ञांची मते
भविष्यातील घटना जाणून त्याद्वारे तणाव, चिंता, नैराश्य या अडचणी सोडवता येतात असे यूजीसीचे शिक्षणतज्ज्ञ गांभीर्याने कसे म्हणू शकतात? अशी शंका इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते 'अहो, ज्योतिषाचे समर्थक सुद्वा असे म्हणणार नाहीत. फलज्योतिषाला शास्त्रीय ज्ञान म्हणणे व ते ज्ञान जगाला प्रदान करायचे आहे असे म्हणणे म्हणजे विज्ञानाची थट्टा करण्यासारखे आहे.`
प्रा.यशपाल खगोल भौतिकतज्ञ व माजी चेअरमन यूजीसी यांच्या मते ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञान शाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल.
जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ प्रा.जयंत नारळीकर यांनी हा निर्णय देशाला मागे नेणारा आहे असे म्हटले आहे. त्यांच्या मते ज्या विषयाचे दावे विज्ञानाच्या कसोटीवर हास्यास्पद ठरतात असा विषय विज्ञान म्हणून शिकवणे हा विरोधाभास आहे. अशा त-हेने छद्मविज्ञानाला दिलेला पाठिंबा हा जगात भारताची चुकीची प्रतिमा निर्माण करेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
काहींना ही बाब मुरलीमनोहर जोशी यांचा कावेबाजपणा असून त्यात त्यांना हिंदुत्वाचा छुपा अजंडा दिसतो.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी अर्थातच या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणतात, ''यामुळे फलज्योतिष या विषयावर संशाधन होउन प्रगती होईल. प्रत्येक व्यवसायात जशा अनिष्ट प्रवृत्ती असतात तशाच त्या ज्योतिषातही आहेत. त्यामुळे हा विषयच अंधश्रद्धा म्हणून टाकून देणे योग्य नव्ह.``
डॉ. वसंत गोवारीकर यांनी म्हटले आहे, '' विज्ञानाची आजची परिमाणे फलज्योतिषाला लागू पडत नाहीत. म्हणून फलज्योतिष हे मी विज्ञान म्हणून मानत नाही. त्यामुळेच फलज्योतिषाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करावा असा यूजीसी आदेश मला चुकीचा वाटतो. फलज्योतिषाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा हा निर्णय घातक व बुद्धीभेद करणारा आहे.
एकवीसाव्या शतकात प्रवेश करताच भविष्याकडे पाठ फिरवून भूतकाळात जाण्याचा हा प्रयत्न आहे, प्राचीन परंपरेच्या दुराभिमानातून, वैदिक वारसाच्या भावनातिरेकातून घेतलेला हा निर्णय आहे, असे मत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ.चित्रा नाईक यांनी म्हटले आहे, '' भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसमोर ज्योतिषशास्त्र, प्राचीन वाटणारे वास्तूशास्त्र यांना विज्ञान म्हणावे असे पुरावे प्रथम आले तरच उच्च शिक्षणांत या विषयांना स्थान देतो येईल.``
'विद्यापीठे ही समाजाची, समाजासाठी त्याच्या गरजेनुसार ज्ञानदान करणारी केंद्रे आहेत. ती काही विशिष्ट शास्त्रासाठी, केवळ बुद्धीमंतांची गरज भागवण्यासाठी नाहीत. समाजाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे. त्या त्या संबंधीचे ज्ञान सुव्यवस्थितपणे मिळालेच पाहिजे. समाजाला ज्योतिषशास्त्राची गरजच का वाटते? याचे सोपे उत्तर सोडून अंधश्रद्धा वगैरे प्रश्न निर्माण करण्याचे कारण नाही. अज्ञाताचा पडदा दूर सारुन भविष्यात काय दडले आहे. हे जाणून घेण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याला त्यासंबंधी सतत उत्कंठा आहे. आणि त्यामुळे समाज वैज्ञानिक दृष्टया जरी अत्यंत प्रगत झाला तरी तो भविष्य शास्त्राचा कानोसा घेणारच असे असल्याने त्यासाठी उत्तम अभ्यासक्रम करुन विद्यापीठाने समाजाची मानसिक गरज पुरी करणे आवश्यक आहे. नवीन स्पर्धात्मक युगात ही गरज जास्त तीव्रतेने वाटणार आहे कारण नशीबवान तोच पुढे जाणार आहे! ` असे मत प्रसिद्ध ज्योतिषी व.दा.भट यांनी व्यक्त केले आहे
अभ्यासक्रम ठरविण्यातच खरी अडचण
अकरा वेगवेगळया तज्ज्ञांच्या समोर सर्वानुमते मान्य होणारी गृहीतके, सिद्धांत, नियम तयार करताना त्यांना अंतर्विसंगतीला मोठे तोंड द्यावे लागणार आहे. काही ज्योतिषी फलज्योतिषाला आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीत बसविण्यास उत्सुक आहेत. त्याला विद्या म्हणणे त्यांना आधुनिक युगात कमीपणाचे वाटते. त्या उलट ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाचे निकष लागू होत नाहीत. दोन अधिक तीन बरोबर पाच असे गणित येथे लागू पडत नाही. तो अनुभूती वा श्रद्धेचा भाग असून त्याचे अनुभव ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे असे मानणारेही ज्योतिषी आहेत. ज्योतिषातला एक कट्टर पंथ असे मानतो की यदृच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलू शकत नाही. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटना ठरलेल्या असतात. तुम्ही निमित्तमात्र असता. दुसरा पंथ असे मानतो की एक पंचमांश दैवाचा भाग आहे व चार पंचमांश भागावर इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात. त्या अर्थाने तुम्हाला मर्यादित स्वातंत्रय आहे.
या मूलभूत संकल्पनांमधील या विसंगतीनंतर ज्या गणितावर कुंडली हा नकाशा तयार होतो त्यातील निरयन व सायन पंथ. निरयन गणित हे राशी चक्राचा आरंभ बिंदू स्थिर मानते. पारंपारिक ज्योतिष हे निरयनवादी आहे. त्यात पुन्हा ते आरंभ स्थान कुठले मानावे या विषयीचे वाद. त्यामुळे पंचागऐक्या विषयी टिळकांच्या काळात बरेच वादंग निर्माण झाले होते. पाश्चात्य पद्धती ही सायन म्हणजे राशीचकाचे आरंभस्थान हा चल बिंदू आहे असे मानतो. हे सर्व गणित करण्याच्याच इतक्या विविध पध्दती आहेत. त्यानंतर या गणितावरून तयार होणाऱ्या कुंडलीतील फलिताच्या नियमाबाबतच्या अंतर्विसंगती हा तर अजून पुढचा टप्पा आहे. या सर्व अडचणींचा विचार करता सर्वमान्य प्रमाणित अभ्यासक्रम तयार करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. न जाणो, त्यावर ही ते मार्ग काढतील. वैद्यकीय पॅथी जशा एकमेकावर टीका करत का होईना आनंदाने मार्गक्रमणा करीत आहेत त्या पद्धतीने जर हे अभ्यासक्रम तयार झाले तर एकमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे चालतील. मुळात या सर्व अभ्यासक्रमांचे थेट परिणाम भोगावे लागणारा 'जातक` हाच जर भाबडा व अंधश्रद्धाळू राहिला तर अशा अभ्यासक्रमांची वैधता ही बाबच नंतर गौण ठरेल.