ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ५ - फलज्योतिष शास्त्र , प्रवाद ,समजुती

४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?
प्राचीन काळापासून आपल्याकडे शास्त्र हा शब्द फार सैलपणे वापरला गेला आहे. कोणत्याही विषयावरच्या ग्रंथगत माहितीला शास्त्र म्हटले जात असे. आपापल्या मताला शास्त्राचा आधार आहे हे दाखवण्याची धडपड चालत असे. शास्त्र म्हणजे काय तर आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला एखादा बहुजन-मान्य ग्रंथ. विधवांच्या पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे का नाही, किंवा संन्यास घेतल्यावर पुन: संसार करण्यास शास्त्राधार आहे का नाही याची चर्चा करणाऱ्या पंडितांनी आधार म्हणून कोणती शास्त्रे घेतली असावीत ? आणि मुळात त्या शास्त्रांना आधार कशाचा होता ? हा विचार केला म्हणजे आमचा मुद्दा लक्षात येईल. सायन्स या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्श्नरी मध्ये दिलेला अर्थ निरिक्षण आणि पडताळा यातून प्राप्त होणारे ज्ञान, विज्ञान, शास्त्र, असा आहे. शास्त्र आणि विज्ञान या शब्दांच्या सुस्पष्ट अर्थांबाबत मतभिन्नता आहे. तरीपण आपण विज्ञान म्हणजे फिजिकल सायन्स या अर्थाने फलज्योतिष हे विज्ञान आहे का नाही? असा प्रश्न जर विचारला तर त्यास नाही हेच उत्तर द्यावे लागेल.
विज्ञान या संज्ञेस पात्र ठरण्यासाठी काही पद्धती अवलंबावी लागते. त्यात १) निरीक्षण २) संरचना ३) प्रश्न ४) संयोजन ५) सामान्यीकरण ६) गृहीत प्रमेय ७) पुनर्मूल्यांकन ८) निष्कर्ष या गोष्टी अपरिहार्य आहेत. म्हणजे सामान्यपणे निरीक्षण, अनुमान, प्रयोग व निष्कर्ष हे ते प्रमुख टप्पे होत. विज्ञानाच्या अनेक शाखा या कारणे व परिणाम हे शोधण्यासाठी अनुभवाधिष्ठित अवस्थेतून गेलेल्या आहेत. जेव्हा त्या शाखांचे मूळ नियम हे प्राथमिक स्वरूपात सुद्धा निश्चित केले नव्हते त्यावेळी प्रयोग व निरीक्षण यांच्यातून दिसून येणाऱ्या अनुभवातून हे शोधण्याचे काम सुरू होते. हे प्रयोग पुन:पुन: व वेगवेगळया व्यक्तिंद्वारा केले जात. त्यातून काही आकृतीबंध तयार होई व त्यावरून त्याच्या मुळाशी असलेले नियम शोधले जात. फलज्योतिषात तपासता येतील असे नि:संदिग्ध नियम नाहीत. सर्वांचा साकल्याने विचार म्हणता म्हणता त्या नियमांना अर्थ राहत नाही.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कै. वि. म. दांडेकर हे फलज्योतिषात रस असणारे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारे. कै. डॉ.वि.म. दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित युगुलांच्या कुंडल्या संगणक व ज्योेतिषांच्या मदतीने अभ्यासल्या. या अभ्यासात त्यांना फलज्योतिषीय नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळले नाही. ( पहा:-आजचा सुधारक मार्च १९९९, पृष्ठ ३७५. पत्रलेखिका- कुमुदिनी दांडेकर.) पत्रलेखिकेने असे म्हटले आहे की, ज्या समंजस वाटणाऱ्या ज्योतिषाच्या मदतीने त्यांनी हा अभ्यास केला त्यालाही ही गोष्ट कबूल करावी लागली. यावरून हे लक्षात येईल की फलज्योतिष म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे अशा त-हेच्या नियमांचा व ठोकताळ्यांचा एक संग्रह आहे. त्यांचा अनुभव येणे न येणे ही योगायोगाची बाब आहे. साप्ताहिक सकाळ ता ८ जुलै १९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात, '' शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांबाबत तरी फरक दिसावयास हवा, तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमध्ये काही योग प्रामुख्याने दिसावयास हवे. पण माझयाजवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या त्यावरुन तरी हा फरक दिसून येत नाही.`` भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, ''जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?``
फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी एम्पीरिकल संशोधन करुन या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धीवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे :-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या पॅरामीटर्सची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय पॅरामीटर्स त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची आयडेंटीकल पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभाव विश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये एम्पीरिकल संशोधन कसे आणणार? त्यासाठी निसंदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत उदा. मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारिरिक व्यंग, इ.
४) पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत डाटा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन: एम्पीरिकल संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योेतिषाच्या समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. गोकॅलीनच्या संशोधनाचा प्रचलित फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास काहीही उपयोग झाला नाही.
त्यानंतरही अनेक फलज्योतिषी व संशोधक यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. प्रयोगही झाले. हे प्रयोग कुठल्याही भाकितांशी संबंधीत नव्हते. कारण संंशोधनासाठी घेतलेले पाश्चात्य फलज्योतिष हे भाकितांशी संबंधीत नसतेच. ते स्वभाव विश्लेषण, प्रवृत्ती, नैसिर्गिक कल वा पिंड यांचा पत्रिकेशी परस्पर संबंध या अनुषंगाने असते. अगदी अलिकडे गॅरी फिलिप्सन या ब्रिटीश पत्रकाराने लिहिलेल्या ' अॅस्ट्रॉलॉजी इन द ईयर झिरो ` या सप्टेम्बर २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. डेनिस एल्वेल या ब्रिटीश ज्योतिषाने भले थोरले लेख लिहून प्रतिवाद केले. त्याचे खंडन ज्योतिष चिकित्सक जॉफ्रे डीन, प्रो. इव्हान केलि, आर्थर माथर व रुडॉल्फ स्मिट यांनी केले. अखेर हा वाद जाने २००२ मध्ये संपला. डेनिस तपासता येईल अशी कुठलीही टेस्ट सुचवण्यास असमर्थ ठरला. त्याच्या मते जातकाचे समाधान हे महत्वाचे तसेच ग्रहयोगाचा साकल्याने विचार झाला पाहिजे. अशी सर्वसमावेशक संख्याशास्त्रीय चाचणी घेणे संशोधकांना अशक्य आहे. म्हणजे पुन्हा जैसे थे परिस्थिती.

४८) हे गोकॅलीनचे संशोधन नेमकं काय आहे?
डॉ. मिशेल गॉकेलिन या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने जे प्रचंड संशोधन केले तसे संशोधन दुसऱ्या कुणीही केलेले नाही. साधारण १९६० ते १९७५ या काळात हे त्यांनी हे संशोधन केले. या संशोधनाचा सुरुवातीचा जो निष्कर्ष निघाला तो मार्स इफेक्ट या नावाने गाजला. लढाऊ प्रवृत्तीचा आणि मंगळाचा काहीतरी संबंध आहे असे त्यावरून दिसत होते. सर्वसाधारण म्हणजे अॅव्हरेज लढाऊ माणसांना हे तत्व लागू नाही असे गॉकेलिनचे म्हणणे होते. उच्च श्रेणीच्या म्हणजे शौर्य-पदके मिळालेल्या जवानांनाच फक्त ते लागू आहे, आणि ते सुद्धा त्यांच्यातल्या फक्त पाचसहा टक्के लोकांनाच लागू आहे असे त्यांचे म्हणणे! आम्हाला हे सगळे अगदी विचित्र वाटते. गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही. पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष-समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही. मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही. मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे. साधी गोष्ट आहे, ज्यांनी रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावली पण ज्यांना फक्त कसलेही किताब मिळाले नाहीत अशा लाखो जवानांचा मंगळाशी काही संबंध नाही, फक्त काही मूठभर लोकांच्यावरच मंगळाचे नैसर्गिक प्रभाव पडतात ही गोष्ट तर्कशक्ती कितीही ताणली तरी मनाला पटत नाही. अर्थात्, मंगळाला जर चोखंदळपणे निवडानिवड करता येत असेल तर मात्र गोष्ट वेगळी!
याचा सरळ अर्थ असा होतो की गॉकेलिनने जो डाटा जमवला, जी सांख्यिकी पद्धत वापरली, तिच्यातच काही तरी गडबड घोटाळा नकळत का असेना पण शिरला असावा. कार्ल ई. कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने नेमके हेच दाखवून दिले. यूरो स्केप्टिक ९२ या नावाच्या नेदरलॅण्ड मधून प्रकाशित झालेल्या शास्त्रीय नियतकालिकात 'मार्स इफेक्ट अनरिडल्ड` या शीर्षकाच्या लेखात त्याने गॉकेलिनच्या संशोधनात 'सिलेक्शन बायस` हा दोष असल्याचे निदर्शनास आणले. दुर्दैवाने गॉकेलिन त्यापूर्वीच मृत्यू पावला होता, त्यामुळे हा वाद पुढे अनिर्णित राहिला. आता शास्त्रीय जगतात गॉकेलिनच्या संशोधनाचे महत्व उरलेले नाही. फलज्योतिषालाही या संशोधनाचा प्रत्यक्ष असा काहीच उपयोग झाला नाही. अप्रत्यक्ष उपयोग एवढाच झााला की ग्रहांचे प्रभाव माणसावर पडतात या मूलभूत कल्पनेला सलाईनचे एक इंजेक्शन मिळाले!

४९) चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृश्य परिणाम होतोच ना ? मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरून होत नसेल ?
गुरुत्वाकर्षणाचा फलज्योतिषाशी काहीही संबंध नाही. हे कशावरून म्हणायचे तर गुरुत्वाकर्षण दोन वस्तूमधल्या अंतराशी निगडित असते. पृथ्वीपासूनची ग्रहांची अंतरे सतत बदलत असतात त्या बदलांची दखल हे शास्त्र घेत नाही आणि विशेष म्हणजे राहू-केतूंना गुरुत्वाकर्षणच नाही. त्याचप्रमाणे चुंबकीय शक्तीचाही या शास्त्राशी काही संबंध नाही, कारण चुंबकीय क्षेत्रे अगदी मर्यादित अंतरापर्यंत प्रभाव टाकू शकतात. ग्रहांच्या ज्योतिषीय प्रभावांचा संबंघ जर गुरुत्वाकर्षणाशी असता तर हे शास्त्र निर्माणच झाले नसते कारण एकट्या चंद्राचे पृथ्वीवरचे आकर्षण बाकी सर्व ग्रहांच्या एकत्रित आकर्षणाच्या पाच लक्ष पटीहून अधिक असते असे डॉ. नारळीकरांनी अष्टग्रहीवर बोलतांना म्हटले आहे. म्हणून जेव्हा च्रंद्र पृथ्वीच्या एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला एक किंवा अनेक ग्रह असतील तेव्हा त्यांचे गुरुत्वाकर्षण नगण्य होईल व जर त्यांचे ज्योतिषीय प्रभाव गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतील तर तेही नगण्य होतील. पृथ्वीपासून हजारो अब्ज मैल दूर असलेल्या राशी-ताऱ्यांचे चुंबकीय आकर्षण पृथ्वीवर पोचणे अशक्य आहे, आणि राहू-केतूंना व चंद्राला तर चुंबकीय आकर्षणच नाही. फलज्योतिषाला वैज्ञानिक प्रतिष्ठा देण्याच्या प्रयत्नांत हा वैज्ञानिक मुलामा लावण्याचा प्रयत्न झालेला आहे.

५०) हे शास्त्र विज्ञानावर आधारित आहे का ?
मुळीच नाही. फिजिकल सायन्स या अर्थाने विज्ञान हा शब्द वापरला तर कोणत्याही शास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळण्यासाठी ज्या ८ कसोट्या पार कराव्या लागतात त्या फक्त भौतिकी शास्त्रांना म्हणजे फिजिकल सायन्सेसनाच लागू करता येतात. त्या कसोट्याना हे शास्त्र उतरत नाही. फलज्योतिष ज्या प्रकारचे ज्योतिषीय प्रभाव गृहित धरते ते भौतिकी शास्त्रात बसत नाहीत.
विद्युत चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकीय आकर्षण अशा तीन प्रकारचे उर्जा-स्त्रोत भौतिकी शास्त्राला किंवा विज्ञानाला माहीत आहेत, त्यापैकी एकाचेही साधर्म्य ज्योतिषीय प्रभावाशी नाही. इथूनच फलज्योतिषाची विज्ञानाशी फारकत होते म्हणून ते विज्ञानावर आधारित असणे अशक्य आहे. फलज्योतिषाचे 'शास्त्रत्व` लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी काही ज्योतिषी विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करत असतात. तसे केले नाही तर आपल्या शास्त्राला काही न्यूनत्व येईल असे त्यांना वाटत असते. फलज्योतिष हे विज्ञान नाही असे श्री. व. दा. भट यांनी पत्रिका या मराठी विज्ञान परिषदेच्या दिवाळी २००१ या अंकात, तसेच सोलापूरच्या अ.भा. ज्योतिषसंंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे म्हटले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याला बळेबळे विज्ञान ठरवले आहे. वास्तविक पहाता, ज्योतिर्विज्ञान हे अर्थाच्या दृष्टीने खगोलशास्त्राला उचित ठरणारे नाव आहे. परंतु यूजीसीने दडपेगिरी करून ते नाव फलज्योतिषासाठी वापरले आहे. या विषयाला वैज्ञानिक मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे. वैज्ञानिकांनी हा विषय विज्ञान शाखेत समाविष्ट करण्यासाठी तीव्र विरोध केल्याने त्याला आता कला-शाखेत ढकलले आहे.

५१) हे शास्त्र विज्ञानावर आधारित नाही तर वैज्ञानिकांनी त्याविरूद्ध ठोस भूमिका का घेतली नाही?
घेतली ना! पण त्याचा परिणाम उलटाच झाला. 'दी हयूमॅनिस्ट` या अमेरिकन मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या अंकात 'ऑब्जेक्शन्स टू दी अस्ट्रॉलॉजी` अशा शीर्षकाचे एक निवेदन प्रसिद्ध झाले. त्या निवेदनावर युरोप अमेरिकेतल्या नामवंत १८६ शास्त्रज्ञांच्या सहया होत्या. ( सुरुवातीला ते १९२ होते नंतर त्यातील ६ गळाले ) यात काही नोबेल पारितोषिक विजेते सुध्दा होते. हे निवेदन डॉ. बार्ट जे बोक यांनी तयार केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ग्रहतारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षणादि परिणाम ते पृथ्वीवर पोहोचे पर्यंत अगदी क्षीण होतात. अशा क्षीण प्रभावाने माणसाचे नशीब घडवले जाते असे मानणे बरोबर नाही.
या निवेदनावर विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सही देण्यास नकार दिला. झाले! ज्योतिषसमर्थकांना जणू कार्ल सेगनचा पाठिंबाच मिळाला. त्यांनी याचा डांगोरा पिटण्यास सुरवात केली. सौर डाग, कॉस्मिक रेडिएशन, चुंबकीय वादळे, कॉस्मो बायोलॉजी वगैरे भौतिक गोष्टींना पिंडी ते ब्रम्हांडी अशा तत्वज्ञानात अध्यात्मिक पातळीवर नेउन पचवून टाकले. सामान्य माणसांचा संभ्रम त्यामुळे अजूनच वाढला.
कार्ल सेगनचा नकार का?
निवेदनात फलज्योतिषातील तत्वे व संकल्पना ही निरर्थक कशी आहेत? केवळ भौतिक परिणामाचा भाग न घेता त्यांचा योग्य तो समाचार त्यात घेवून त्यावर का विश्वास ठेवू नये अशी मांडणी त्यात नव्हती. केवळ वैज्ञानिक सांगतात म्हणून ते खरे असा काहीसा सूर त्या निवेदनात होता. केवळ याच कारणासाठी कार्ल सेगनचा नकार होता. हे त्याने स्पष्टही केले होते. पण समर्थकांनी आपल्याला हवा तसा अर्थ त्यातून काढला.
मिशेल गॉकेलिन या फ्रेंच शास्त्रज्ञाने अशा संशोधनातून जे निष्कर्ष काढले ते सकृत् दर्शनी जरी फलज्योतिषाला अनकूल वाटत असले तरी एकतर त्याचे संशोधन वादग्रस्त ठरले आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज प्रचलित असलेल्या फलज्योतिषात भविष्य वर्तवण्यासंबंधीचे जे सिद्धांत किंवा ठोकताळे आहेत त्यांना या निष्कर्षांचा काहीएक उपयोग नाही. दुसऱ्या अनेक संशोधकांनी जे संशोधन केले आहे त्यातून फलज्योतिषाला अनुकूल असे निष्कर्ष निघालेले नाहीत. तरीपण तेवढ्यामुळे हे शास्त्र खोटे आहे असे स्पष्ट म्हणायची तिकडच्या संशयवादी म्हणजे 'स्केप्टिकल` तज्ज्ञांची अजून तयारी नाही. त्यांच्या मते एम्पीरिकल संशोधन अजूनही चालूच ठेवले पाहिजे, त्याच्यामुळेच सत्य काय आहे ते कळले तर कळेल, दुसरा काही मार्ग नाही. 'एन्सायक्लोपिडिया ऑफ द पॅरानॉर्मल` नावाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्य ग्रंथात जॉफ्रे डीन या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने ऎस्ट्रॉलॉजी या सदराखाली लिहिलेल्या परिच्छेदात हे मत व्यक्त केले आहे. ज्योतिषसमर्थकांना ही परिस्थिती सोयीस्कर अशीच आहे.

५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे व नियतकालिके राशीभविष्ये का छापतात?
तो एक केवळ लोकप्रियतेचा भाग असतो. केवळ तुमची जन्मरास एवढाच निकष लावून राशी भविष्य वर्तवणे हे 'फलज्योतिषकीय` दृष्टया सुद्धा 'अशास्त्रीय`च असतं. कारण त्यात लग्नराशी, ग्रहयोग, स्थानबल यांचा विचार नसतो. भारताची लोकसंख्या ९६ कोटी मानली तरी एका राशीचे सरासरी आठ कोटी लोक असतात. मग राशी भविष्यात अगदी वाट्टेल ते लिहीलं तरी ते कुणाना कुणाला अगदी अचूक लागू पडत असतं. कुणाचं तरी प्रमोशन असतं, कुणाचा तरी अपघात असतो, कुणाचा विवाह ठरत असतो, कुणाला सौद्यात फायदा किंवा तोटा होत असतो. निरनिराळया नियतकालीकातलं एकाच राशीचं भविष्य अगदी वेगळं असतं, अगदी परस्पर विरोधी सुद्धा असतं. वस्तुत: पुरोगामी समजणारी नियतकालिके सुद्धा राशी भविष्ये छापतात. कारण आपण ती छापली नाहीत तर खपावर काय परिणाम होईल हे त्यांना माहीत असते. केवळ प्रबोधन वा तत्वनिष्ठा बाळगून चालत नाही. अर्थकारणही बघावं लागतं. राशी भविष्य न छापणारी नियतकालिके अगदी कमी. न्यूयॉर्क टाईम्स वा अन्य पाश्चात्य नियतकालिकं सुद्धा राशी भविष्य छापतात. पण सिगारेटच्या पाकिटावर जसा ' सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे.` असा वैधानिक इशारा लिहीलेला असतेा तद्वत त्यावर तो एक करमणुकीचा भाग आहे. अशी टीप असते. ज्योतिषी म्हणतात कि 'भविष्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे` असा छापील इशारा कुंडलीवर छापण्यास आमची हरकत नाही. सिगारेटच्या पाकिटावरील इशारा वाचून सिगारेट ओढण्याचे सोडून दिले अशी उदाहरणे किती सापडतात? असा प्र्रतिप्रश्न ते उपस्थित करतात. शिवाय अंकात छापलेल्या सर्व गोष्टींशी संपादक सहमत असतीलच असेही नव्हे. श्री. माधव गडकरी यांनी ते संपादक असताना राशी भविष्य हे सदर स्वत:च आलटून पालटून मजकून टाकून एकदा चालवले होते असे प्रतिपादन केले होते.

५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही, तरी पण ते शास्त्र भ्रामक आहे हे आम्हाला कसे कळावे ?
अशिक्षित भाजीवाल्या बाईला गणिताचा पुस्तकी अभ्यास असावा लागतो का? पाच अधिक पाच बरोबर दहा हे समजायला रॅन्गलर व्हावे लागते का? शितावरुन भाताची परीक्षा घ्यायला काय बल्लवाचार्य व्हायला लागते? सर्वसाधारण तर्कबुद्धी जागृत ठेवली तरी या शास्त्राचा भ्रामकपणा समजू शकतो. प्रयोगशिलता असेल तर उत्तमच.
या बाबत ज्योतिष विज्ञान मंडळातला एक किस्सा सांगतो. एका ज्येष्ठ ज्योतिषप्रेमी व्यक्तीने एक कुंडली आणली. स्पष्टग्रह, भावचलित या सूक्ष्म बाबींसह ती फळयावर मांडली. 'या व्यक्तीला मी ओळखतो, तसेच कुंडलीच्या खरेपणाबाबत शंका नको.` असे सांगितले. या जातकाचा सामाजिक, आर्थिक, बोैद्धिक दर्जा काय असेल? असा प्रश्न विचारला. प्रत्येकाने विश्लेषण करून हा आलेपाकवाला असेल, शिपाई असेल, कारकून असेल अशा प्रकारचे काहीतरी सांगितले. कारण कुंडलीत कुठलाही ग्रह स्वगृही, उच्चीचा नव्हता. नवपंचम योग नव्हता. अतिसामान्य अशी कुंडली होती. पण वस्तुस्थिती म्हणजे ती व्यक्ती रिटायर्ड उच्चपदस्थ, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारी, दोन्ही मुले अमेरिकेत सुस्थितीत. बंगला, गाडी, नोकरचाकर, मानसन्मान लाभलेली अशी होती. मग आता वस्तुस्थितीचा अन्वयार्थ ग्रहयोगाशी लावण्याचे प्रकार सुरू झाले. भाकीत तर सोडाच. पण साधा वर्तमान काळ सुद्धा जर सांगता येत नाही तर जातकाचे भविष्य काय डोंबलं सांगणार? जन्मकुंडली ही जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीवर जर आधारित असेल तर 'वर्तमान काळ` हे त्यावेळच्या संदर्भाने भविष्यच असतं. त्याच तर्काने भूतकाळ हा सुद्धा तपासता येईल असा ताळा ठरतो.
तुम्ही सुद्धा ज्योतिषांच्या मदतीने याबाबत एक ब्लाईंड टेस्ट करून पाहू शकता. प्रश्न जोडया लावा. अ गटात १५ प्रकारचे पेशे- डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, कलाकार, राजकारणी वगैरे वगैरे. डॉक्टर म्हणजे वैदू पासून ते सर्जन पर्यंत जो औषध देतो तो. शिक्षक म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, प्राध्यापक, अगदी खाजगी शिकवणी घेणारासुद्धा, इतका साधा निकष. ब गटात ३० कुंडल्या त्यापैकी पंधरा त्या अ गटातील संबंधित व्यक्तिंच्याच आणि पंधरा या केवळ अतिरिक्त. सर्व डाटा अस्तित्वात असलेल्या व्यक्तिंचाच व खरा. ज्योतिषांच्याच संग्रहातील डाटा घ्या. व तुम्हीच प्रयोग करा. ८० टक्के जोडया जमल्या पाहिजेत. २० टक्के टॉलरन्स. बघा ज्योतिषी कुणी अशा प्रयोगांना तयार होतात का?
कुंडलीवरुन स्त्री का पुरुष? जिवंंत का मृत? विवाहित का अविवाहित? या साध्या वर्तमान काळातल्या गोष्टी सुद्धा जर सांगता येत नाहीत तर ते शास्त्र भविष्य काय सांगणार? वर्तमानाच्याच मर्यादा असणारे हे शास्त्र भविष्यात घडणाऱ्या घटना सांगते हे आपल्या तर्कबुद्धीला पटते का?

५४) राजकारणी सिनेनट व्यावसायिक हे वेळोवेळी ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?
राजकारण, सिनेनाटय, व्यवसाय-धंदा या सर्व प्रकारात अनिश्चितता, चढ-उतार हे नेहमीच असतात. राजकारणात प्रतिस्पर्ध्याचे वर्चस्व, पक्षनिष्ठा, तुमच्या मागे असणारे पाठबळ, बंडखोरी, मंत्रीमंडळात वर्णी लागण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वकीयांची नाराजी, गटबाजी असे कितीतरी घटक हे तुमच्या कर्तबगारीवर परिणाम करणारे असतात. सिनेक्षेत्रात सुद्धा लोकप्रियता, ग्लॅमर, संधीची उपलब्धतता हे घटक अनिवार्य असतात. एखादा चित्रपट सपाटून आपटतो तर एखादा गल्लाभरू चित्रपट सुद्धा बाजी मारून जातो. रात्रीतून एखादा स्टार बनतो तर एखादा गुणवत्ता असूनही बाजूला फेकला जातो. व्यवसायात सुद्धा कधी तुम्हाला अचानक संधी उपलब्ध होवून तुम्ही टॉपला जाता तर कधी तुमची चूक नसतानाही गाळात जाता. अशा गोष्टी मनाला अस्थिरता निर्माण करतात. भविष्य हे अज्ञात असल्याने कुठलाही अंदाज येत नाही. मग दिलासा मिळण्यासाठी पाहू या ग्रहांची साथ काय म्हणते? असे करत ज्योतिषाला जवळ केले जाते. प्रोडयूसर तर चित्रिकरणाच्या मुहूर्तापासून ते चित्रपटाचे नांव 'अ` ने सुरूवात असणारे असावे की 'क` ने इथपर्यंत ज्योतिषाचा सल्ला घेतो. काही पंतप्रधान वा राष्ट्रपती सुद्धा मुहूर्तावर शपथविधी, मंत्रिमंडळविस्तार, वास्तुप्रवेश करतात. शिवाजी महाराज जर मुहूर्तावर लढाई करत बसले असते तर छत्रपती झालेच नसते.

५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरूपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?
संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।

अर्थ :- ग्रहांंच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. ती उत्कंठा भागवणारा कुणीही माणूस दिसला की लोक त्याच्यामागे लागतात. समजा, तुम्हाला हस्तरेषांतले काहीही कळत नाही, तरी पण तसा आव आणून व थोडी हुषारी वापरून तुम्ही जरा थापा मारायला सुरुवात करा. लगेच तुमच्या परिचयातले लोक, मुलं, मुली सुद्धा हात पुढे करतील, याचा अनुभव घेऊन पहा! तुम्हाला ज्योतिषातले थोडेफार कळते एवढा सुगावा लागायचाच अवकाश की तुमच्या आप्त परिवारातले लोक तुम्हाला आपले भविष्य सांगायचा आग्रह धरतात की नाही ते पहा. एवढे लांब कशाला, पेपरात येणा या राशी-भविष्याचा तुमचा स्वत:चा काय अनुभव आहे त्याचा विचार करा. त्या भविष्यात काही अर्थ नसतो हे ठाऊक असूनही तुम्ही अधूनमधून का होईना पण तुमच्या राशीचे भविष्य वाचताच ना! "राशीचक्र" चा प्रयोग पाहून आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे मत विचारा, करमणूक भरपूर झाली, राशींची वर्णने काही पटली, काही नाहीत असेही म्हणतील, तरीपण प्रयोगाची लोकप्रियता काही कमी व्हायची नाही!
हे शास्त्र जर भ्रामक असेल तर त्याचे अनुभव लोकांना कसे येतात ? या शंकेचे उत्तर असे आहे की, नरबळी देणे, चेटूक, जारणमारण, भानामती, भूत काढणे, जट येणे, शुभ-अशुभ शकुन, गणपती दूध प्याला अशा कितीतरी वेडगळ अंधश्रद्धांंचे अनुभव लोकांना येत असतात म्हणून तर त्या आजवर टिकून राहिलेल्या आहेत. फलज्योतिषाचेही असेच अनुभव लोकांना येत असतात, पण त्या अनुभवांच्यामुळे हे खरे शास्त्र आहे असे सिद्ध होत नाही. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे वर्तवलेली 'भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली भाकिते वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून गणले जाते. आता हे भाकीत पहा :- ' तुमच्या मुलाला लवकरच नोकरी लागेल व ती यंत्राशी संबंधीत असेल.` आता कुठेही नोकरी लागली तरी या यंत्रयुगात यंत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. खऱ्या ठरलेल्या भाकितांची यादी जशी देता येते तशी खोटया ठरलेल्या भाकितांची यादी पण देता येते. चुकलेली भाकिते लोक विसरून जातात पण खरी झालेली भाकिते मात्र पक्की लक्षात ठेवतात. अशा अनेक कारणांमुळे फलज्योतिषाला एक फसवी प्रतिष्ठा लाभते.

जे का रंजले गांजले ...!
सतत प्रतिकूल परिस्थितीशी झगडता झगडता मेटाकुटीस आलेल्या माणसाला कुणीतरी धीर देणारा माणूस हवा असतो. ज्योतिषी ती गरज भागवतो. अमुक अनिष्ट ग्रहाची दशा दोन महिन्यांनी संपून तमुक शुभ ग्रहाची दशा सुरू होईल, असे काहीतरी ज्योतिषाच्या तोंडून ऐकले म्हणजे त्या बिचाऱ्याला हुरूप येतो. ज्योतिषी त्याला काही तरी दैवी उपाय करायला सुचवतो, त्याचा तरी निदान उपयोग होईल अशी आशा त्याला वाटते.
माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कंुडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो 'अनुभव` म्हणतो.

५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय?
केवळ तशी परिस्थिती नाहीये. सुखासुखी ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसांचे प्रमाण फारच कमी. काही ज्योतिषी लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेतात. प्रथम मानसिक खच्चीकरण करून, भीती निर्माण करून त्यानंतर ग्रहशांती, जपजाप्य, नारायण नागबळी सारखे विधी सांगून दक्षिणा घ्यायची व मानसिक समाधान वा आधार द्यायचा. हा कुठला आधार? ग्रहांचे खडे घातल्याने अनिष्ट ग्रहांच्या प्रभाव लहरी थोपवल्या जातात असा समज पसरवून धंदा करणारे ही ज्योतिषी भरपूर आहेत. बोलका पत्थरवाले पटवर्धन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विधीपूर्वक पूजा करून श्रद्धेने तोडगे केल्यास फायदा होतो. समजा नाही झाला तर तुमची श्रद्धा कमी पडली किंवा तुमच्या कडून विधी पाळले गेले नसतील ही पळवाट आहेच. विवाह जुळवताना पत्रिका बघताना सुद्धा आयुष्यातला महत्वाचा निर्णय हा ज्योतिषांवर सोपवला जातो. गुणमेलन, मंगळ, एकनाड या सारख्या गोष्टींना भीतीपोटी महत्व दिले जाते. विषाची परिक्षा कशाला घ्या? वैवाहिक जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचा संबंध मंगळाशी पत्रिकेशी जोडला जातो. वैधव्याचा योग आहे, आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट आहे, कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला धोका आहे. वगैरे भीती घालून व्यावहारीक दृष्टया सुयोग्य अशी स्थळं सुद्धा नाकारली जातात. व्यावसायिक, सट्टेबाज, राजकारणी हे लोक फलज्योतिषाचा आधार घेताना दिसतात कारण त्यांच्या जीवनात चढ-उतार सतत असतात. जिथे अनिश्चितता आहे त्या ठिकाणी माणसाला आधाराची गरज निर्माण होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक विवंचना असतात त्यावेळी रंजल्या गांजल्यांचा आधार म्हणून फलज्योतिषाकडे बघितले जाते. मग काही लोक विचारतात जर फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय? दारू, गांजा, अफू यामुळे माणूस आपली दु:खं काही काळ का होईना विसरतो म्हणून त्याने व्यसनात बुडून जाणे हा काय त्यांच्या दु:खावरचा ईलाज झाला का? आमच्या परिचयात एक गृहस्थ आहेत. त्यांना एका ज्योतिषाने मृत्यूचे भाकीत सांगून हादरवून टाकले. त्यानंतर त्यांनी अनेक ज्योतिषांकडे हा फीडबॅक घेवून चकरा टाकल्या. सर्वांचे खिसे भरले. काहींनी त्यांना चारसहा महिने काहींनी वर्ष दोनवर्ष मुदतवाढ दिली. अत्यंत मानसिक तणावात त्यांनी काही वर्ष काढली. त्यातील फोलपणा आम्ही समजावून द्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी सुद्धा काही वर्ष जावी लागली. सात आठ वर्ष उलटून गेली तरी त्यांना काही झाले नाही. मग मागे वळून पहाताना आता त्यांना वाटतं उगीच आपण हा काळ तणावात घालवला. मनुष्य अमर थोडाच आहे?
उठसूट ज्योतिषाकडे जाउ नये असे काही जेष्ठ ज्योतिषांनीच सांगितले आहे. कमकुवत मनाला सतत आधाराची गरज लागत असते. 'बुडत्याला काडीचा आधार` या म्हणीतच एक प्रश्न लपलेला आहे. बुडणाऱ्या माणसाला आधारासाठी काडी पुरेल का? माणसाचं मन कमकुवत झालं की त्याला कशाचाही आधार पुरतो. बहिणाबाईंच्या 'मन वढाय वढाय` कवितेत मनाच सुंदर वर्णन आहे. मनाला तार्किक, बुद्वीप्रामाण्य कसोटया लावता येत नाही. मन खंबीर करण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना केली तर सतत उठसूट ज्योतिषाचा आधार लागण्याची मानसिकता निर्माण होणार नाही. लहान मूल सुद्धा स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक तेवढाच आईचा आधार घेतं. नंतर आईचा हात सोडूनच चालायला शिकतं ना? खाचखळग्याच्या रस्त्यावर, अवघड ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा काठीचा, दोराचा आधार घेतातच ना! पण तो तेवढयापुरताच. आधार घ्यावा लागणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हा आधार विवेकपूर्ण असावा.

५७) मग ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?
फलज्योतिषाकडे येणारे लोक विविध प्रकारचे असतात. कुणी हताश होवून येतो. कुणी मार्गदर्शनासाठी येतो. कुणी उत्सुकतेपोटी येतो. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे या एकाच प्रश्नाचे उत्तराभोवती सर्व जण येवून ठेपतात. नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे. अपयश ही यशाची पायरी आहे.
सद्यस्थितीत विवाह जुळवण्याची पद्धत ही सदोष आहे. एकमेकाचे व्यक्तिमत्वाचा अंदाज न घेता केवळ पत्रिकेचा आधार घेणे हे तर्कशुद्ध नाही. विवाहाचे बाबतीत कुंडल्यांवरून निर्णय घेण्याच्या ऐवजी जर परिचयोत्तर विवाह ही संकल्पना स्विकारली तर एकमेकाला पूरक असे व्यक्तिमत्व जुळून विवाह यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढेल. सध्या काही सामाजिक संस्था असे वधूवर सूचक केंद्रे चालवतात. मेळावे आयोजित करतात. पुण्यात 'मिळून साऱ्या जणीं` ची साथ साथ ही एक अशीच संस्था आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी तडजोड ही बाब अत्यंत आवश्यक आहे. भविष्याविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी फलज्योतिषाचा आधार घेवून त्यावर निर्णय घेणे हे संयुक्तिक नाही. फलज्योतिषाकडे वळण्याचे मूळ कारण तपासून पाहिले तर आपल्याला अदृष्टाची भीती व अज्ञाताविषयी वाटणारे गूढ हेच आहे. त्याला व्यवहारोपयोगी असे पर्याय दिले तर नक्कीच हा ओढा कमी होईल.
लहानपणापासून मनावर झालेल्या संस्कारांचे जोखड फेकून देणे अवघड असते. ज्योतिषांची भाकिते खरी ठरल्याच्या गोष्टी नेहमी कानावर पडत असतात. दोन-अडीच हजार वर्षांच्या या पुराण्या शास्त्राला एकदम बोगस कसे म्हणावे अशी धास्ती वाटते. पण जुना धोपटमार्ग सोडून नव्या वाटेने जायला जे धैर्य लागते ते सुशिक्षित लोकांनी दाखवावे, कारण त्यात समाजाचे हित आहे असे आम्हाला वाटते.

५८) दोन तज्ज्ञ डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का?
मूळातच ज्योतिषी व डॉक्टर यांची तुलनाच चुकीची आहे. रोग्यावर औषध, उपाय योजना करताना अनेक तपासण्या व आवश्यक ती सावधगिरी बाळगावी लागते. कारण हा एखाद्या व्यक्तिच्या जीवाचा प्रश्न आहे. ज्योतिषाचे भाकीत चुकले म्हणून काही कोणाचा जीव जात नाही. वैद्यकीय क्षेत्रात जी प्रगती झाली आहे त्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे हे सत्य नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग या सारख्या रोगांवर अत्याधुनिक तपासण्यांवरुन रोगनिदानात एकमत होण्यात अडचण येत नाही. त्यावरील उपाययोजनांच्या बाबत कदाचित मत भिन्नता असू शकते. सर्वच रोगांवर रामबाण ईलाज झाले असते तर मनुष्य अमर झाला असता. तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनेल नेमून त्यांना रोगनिश्चिती साठी मधुमेह, कर्करोगी, मेंदूज्वर, हृदयविकार, अल्सर वगैरे निश्चित आजाराचे भिन्न रुग्ण तपासणी साठी दिले तर आधुनिक तपासण्यांच्या सहायाने रोगनिदान नक्की करता येते. तसे ज्योतिषांचे पॅनेल तयार आहे का? वैद्यकशास्त्रात संशोधन व विकास सतत चालू असतो तसे ज्योतिषशास्त्रात आहे का? अहो, ज्योतिषसमर्थकच असे म्हणतात की, हे दैवी शास्त्र असल्याने याला आधुनिक विज्ञानाचे निकष लागू होत नाहीत. मग तुम्हीच सांगा कशी तुलना करायची?

५९) विज्ञान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?
ज्योतिषशास्त्र परिपूर्ण असावे असे आमचे म्हणणे नाही. पण किमान अपूर्ण असण्याची तरी पात्रता त्यात आहे का? मूळात विज्ञानाची परिपूर्णता वा अपूर्णता याचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडणे हाच एक कांगावा आहे. अहो जी गोष्ट शास्त्राच्या निकषांवर उभीच राहू शकत नाही तिची तुलना तुम्ही विज्ञानाशी करता कशाला? ज्योतिषाच्या मर्यादा मान्य करुनसुद्धा त्या मर्यादेपर्यंत तरी आम्ही अमूक गोष्टी सांगू शकतो असे म्हणण्यात सुद्धा एकवाक्यता नाही. आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. आता कुणी म्हणेल की एखादा ज्योतिषी चुकला म्हणून काय शास्त्र चुकीचे का?
आपल्या सोयीप्रमाणे कधी ज्योतिषाला कधी आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीत आणून बसवायचे तर अडचण आली की दैवी शास्त्र म्हणून मोकळे व्हायचे. हा दुटप्पीपणा जनतेला इतके दिवस खेळवतो आहे. विज्ञान हे चिकित्सेला सतत खुले असते. ते व्यक्तीसापेक्ष नसते. अमुकएक गोष्ट प्रमाण असे प्रामाण्य त्यात अजिबात नसते. त्यात निष्कर्षांना पुष्टी मिळाल्यावर बदलही होत असतो. सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानाच्या चौकटीत बंद नसतात. तसे असते तर तर वैज्ञानिक प्रगती झालीच नसती. काही प्रश्नांची उत्तरे मिळताना काही नवे प्रश्न निर्माण होतच असतात. विज्ञान म्हणजे अंतिम सत्य असा विज्ञानाचा कधीही दावा नव्हता व नाही.

६०) फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?

त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!
प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ?
यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना.
या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भााकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे.
प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचााऱ्याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो. फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला पुढे सांगायचे आहे.
पत्रिका पहाण्याच्या प्रथेमुळे लग्ने जुळवण्यात येणाऱ्या अडचणीत आणखीच भर पडते. पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात असे जर हमखासपणे सिद्ध झाले असते तर ही अडचण सोसायलाही हरकत नाही असे म्हणता आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही हे सर्वांना माहीत आहे.
आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाशात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही. आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचेे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे.

६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?
विद्यापीठात तुम्हाला वेद, उपनिषद, पुराण या विषयांवर अभ्यास करुन डॉक्टरेट सुद्धा मिळवता येते. साहित्य, लोककला, इतिहास, संस्कृती, असे अनेक विषय विद्यापीठात घेतले जातात. त्यात अनेक उपविषय येतात. त्यात ज्योतिष हाही भाग आलाच. पण तो खगोल वा भौतिक विज्ञान या स्वरुपात नव्हे किंवा विद्यापीठाचा या विषयाशी संबंध आला म्हणजे त्याला विद्यापीठाची विज्ञान म्हणून मान्यता मिळाली असाही नव्हे. ज्योतिष हे वेदाचे अंग मानल्याने त्या अंतर्गतही तुम्हाला तो विषय पीएचडी साठी घेता येतो. विद्यापीठात असो वा नसो शैक्षणिक या अर्थान हा विषय खाजगी ज्योतिष संस्थांमध्ये पूर्वापार शिकविला जातो. त्यात ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, होरा मार्तंड, ज्योतिष चंद्रिका, ज्योर्तिभूषण, ज्योतिर्भास्कर वगैरे पदव्या त्या त्या संस्थेमार्फत दिले जातात. हे अभ्यासक्रम पत्राद्वारे पण पूर्ण करता येतात. लंडनमध्ये सुद्धा डिप्लोमा ऑफ फॅकल्टी ऑफ अॅस्ट्रॉलॉजिकल स्टडीज असा एक डिप्लोमा आहे. शिवाय सध्या अनेक मुक्त विद्यापीठे आहेत. त्यातून काही ज्योतिषांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवल्या आहेत.
फलज्योतिषाची पाश्चात्य देशातील स्थिती बाबत १९३५ साली प्रकाशित झालेल्या रा.ज.गोखलेे यांच्या 'फलज्योतिष चिकित्सा` या पुस्तकात ते म्हणतात:-
'अमेरिकेत स्मूमससलद येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` वगैरे विधानावरुन हे कॉलेज किंवा अशा दुसऱ्या संस्था ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील कॉलेजसारख्या असतील असे कोणाला वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या विषयाचे शिक्षण देण्याकरीता काही संस्था काही लोकांनी काढल्या आहेत व पाश्चात्य देशात मतस्वातंत्र्याचे तत्व मान्य असल्याने काही मर्यादेपर्यंत कोणासही मान्य असणारी गोष्ट करू देतात. या तत्वास अनुसरून अशा संस्थेस सरकारने मनाई केली नाही एवढेच. पण अशा संस्थांना तिकडे शास्त्रज्ञात मान्यता नाही.
पाश्चिमात्य देशात काही तोतया युनिव्हर्सिटयाही असतात हे ध्यानात ठेवावे. इकडील काही लोकांना डॉक्टरेटची पदवी देणारी अमेरिकेतील 'ओरिएंटल युनिव्हर्सिटी` अशापैकीच होय. काही अडचणीमुळे ती सरकारास बंद करता आलेली नाही; पण तिचा पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसने घेउ नये असा नियम तेथील सरकारने केला असल्याचे ऐकिवात आहे. सांगण्याचा अर्थ हा की पाश्चात्य देशातील 'कॉलेज` 'अकॅडमी` अथवा 'युनिव्हर्सिटी` एवढया नावावरून ती संस्था विद्वन्मान्य आहे असे मुळीच होत नाही.`
आजही अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मध्ये केप्लर कॉलेज ऑफ अस्ट्रॉलॉजीकल आर्टस अॅण्ड सायन्सेस मध्ये फलज्योतिषाचे एम.ए व बी.ए चे पूर्ण अभ्यासक्रम आहेत. त्यात फलज्योेेतिष- मानसशास्त्र व समुपदेशन कला, फलज्योेतिष व आरोग्य, वैदिक परंपरा व फलज्योतिष, खगोलशास्त्र -फलज्योेतिष व संगणकविज्ञान, फलज्योतिष व नवविज्ञान, फलज्योतिषाचे तत्वज्ञान व आधुनिक सिद्धांत यासारखे विषय शिकवले जातात.
ज्योतिष हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कुठलीही डिग्री लागत नाही तसेच ज्योतिषातील सुद्धा पदवी लागत नाही. तुमचे भविष्य चुकले म्हणून तुमच्यावर कायदेशीर कारवाईही करता येत नाही. पण विद्यापीठातून वकिल, डॉक्टर अशी डिग्री घेवून व्यवसाय करणाऱ्यांवर मात्र चुकीच्या उपाययोजनेबाबत कायदेशीर कारवाई होउ शकते व त्यांची सनद रद्द होउ शकते.

६२) परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?

संशोधनासाठी लागणारा पैसा हा सहजपणे उपलब्ध होत नाही. माहिती संकलन वा संपादन हा मूलभूत संशोधनासाठी आवश्यक असणारी बाब आपल्याकडे अपवादाने आढळते. अशासकीय संस्थांकडून सर्वेक्षण उपलब्ध करुन मग त्यावर संशोधन हा उपाय आहे पण मूळ प्रश्न असा की संशोधन कशासाठी? कुणासाठी? आणि करणार कोण? फलज्योतिष समर्थक म्हणतात हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जर संशोधन असेल तर त्याची आम्हाला गरज नाही. बहुसंख्य लोकांचा विश्वास, श्रद्धा व अनुभव हीच आमची सिद्धता. विरोधक म्हणतात कि जे शास्त्रच नाही त्यावर संशोधन करण्यात वेळ, श्रम व पैसा घालण्याची काय गरज आहे? फलज्योतिष हे शास्त्र आहे असे म्हणणाऱ्यांची आपले विधान सिद्ध करण्यासाठी संशोधन करणे ही जबाबदारी ठरते.
वि.म. दांडेकरांनी जेव्हा हा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विश्वासार्ह डाटा मिळण्यात सुद्धा अडचणी आल्या. फलज्योतिषावरील संशोधन करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख व जन्मठिकाण हा महत्वाचा डाटा आहे. तो विश्वासार्ह मिळण्यासाठी हॉस्पिटल मधील बिनचूक नोंदणी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे कुटुंबात सुद्धा व्यक्तिची ही माहिती बिनचूक असेल अशी खात्री नसते. समजा हा डाटा मिळाला तरी ग्रहयोग व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध ही बाब तपासण्यासाठी कुठले मॉडेल सॅम्पल म्हणून निवडावे ? या विषयी एकवाक्यता नाही. चिकित्सक बुद्धीच्या विवेकवादी लोकांना असे वाटते की जर हे शास्त्र इतके लोकप्रिय आहे तर त्याच्यात खरोखरी काही तथ्य आहे की नाही ते आपणच तपासून पाहिले पाहिजे. ते तपासून पहाण्यासाठी त्यांच्यापुढे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे या शास्त्राचा मुळापासून चिकित्सकपणे अभ्यास करुन त्यात काही तथ्य असू शकेल का ते ठरवायचे. हा मार्ग आम्ही निवडला व या शास्त्रात वैज्ञानिक दृष्टया तथ्य असणे का अशक्य आहे ते अन्यत्र दाखवून दिले आहे. दुसरा मार्ग असा की एखादे समान लक्षण असलेल्या शेकडो माणसांच्या कुंडल्या जमवायच्या आणि त्या कुंडल्यात काही समान ग्रहस्थिती आढळते का व ती किती प्रमाणात आढळते ते पहायचे, किंवा असे करायचे की एकाच प्रकारची ग्रहस्थिती असलेल्या पुष्कळ कुंडल्या घेउन त्या कुंडल्यांच्या माणसांत काही समान लक्षणे आढळतात का व ती किती प्रमाणात आढळतात ते पहायचे, व त्यावरुन हे शास्त्रातील तथ्य ठरवायचे. तिसरा मार्ग असा की घडून गेलेल्या निसंदिग्ध घटना व त्याचा काळ यापैकी एकच माहिती ज्योतिषांना पुरवायची व उर्वरित दुसरी माहिती ज्योतिषांनी वर्तवायची हा प्रयोग करणे. एखादा निष्कर्ष हा जेव्हा आपल्याला प्रतिकूल ठरतो त्यावेळी डाटा पुरेसा नव्हता अथवा विश्वासार्ह नव्हता. असे म्हणण्याची सोय आहे. अशा प्रकारचे संशोधन पाश्चात्य देशात मुबलक प्रमाणावर झालेले आहे. त्याचे निष्कर्ष बहुतांशी या शास्त्राला प्रतिकूल असेच निघाले आहेत. पण त्यांचा विशेषसा परिणाम सामान्य लोकांवर झालेला दिसत नाही. अशा संशोधनात ज्योतिष्यांची मदत घ्यावी लागते. आपल्याकडचे ज्योतिषी अशी मदत करण्यास कधीच पुढे येणार नाहीत. हात दाखवून अवलक्षण कोण करुन घेईल ?
आपल्याकडे यूजीसीने विद्यापीठात फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याच्या अगोदर या विषयात काही तथ्य आहे काय? हे तपासण्यासाठी जर एखाद्या विद्यापीठास पायलट प्रोजेक्ट म्हणून संशोधन करण्यास अनुदान दिले असते तर ते अधिक उचित ठरले असते.

६३) आतापर्यंत ज्योतिषांना काय आव्हाने दिली गेली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?
डॉ. अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने बुवाबाजी चमत्कार यांच्या वर हल्ला करण्यासाठी जगभरात जाहीर आव्हान दिले. त्यात फलज्योतिषाविरुद्धही आव्हान होते.
१ ते ३ डिसेंबर १९८५ मध्ये तिसरे आखिल भारतीय ज्योतिष संमेलनात हेच आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाच सहाशे ज्योतिषांसमोर मांडले होते. आव्हान खालील प्रकारचे होते.
१) दहा अचूक जन्मवेळांची माहिती वा कुंडल्या दिल्या जातील. तसेच दहा हातांचे ठसे दिले जातील त्यातून संबंधीत 'व्यक्ति स्त्री आहे की पुरुष?` व 'जिवंत आहे की मृत?` एवढेच अचूक सांगायचे.
२) वरीलप्रमाणे दहा कुंडल्या वा हाताचे ठसे दिले जातील त्या आधारे संबधीत व्यक्तीचे शिक्षण, विवाह, अपत्य, अपघात, व्यवसाय व उत्पन्न याबाबत भविष्यकथन करावे. ऐशी टक्के अचूक उत्तरे आल्यास आम्ही ज्योतिष हे शास्त्र मानू.
३) वरीलप्रमाणे कुंडल्या वा हाताचे ठसे पाच नामवंत ज्योतिषांना भविष्य पहाण्यासाठी देउ ( या पाच ज्योतिषांची निवड ही महामंडळानेच करावी) त्यांना वेगवेगळया खोलीत बसविले जाईल. त्यामुळे नामवंत ज्योतिषांची शास्त्रीय भविष्ये सत्यापासून व एकमेकापासून कशी दूर जातात याची जाणीव समाजाला होईल. असे होते की नाही याची तपासणी महामंडळानेच करावी.
या आव्हानांवर बरेच अकांडतांडव करण्यात आले. पण आव्हान स्वीकारण्यास कुणी होकार दिला नाही. या आव्हानानिमित्ताने वादविवाद अनेक लोकांशी झाले. त्यात मुंबईतील दिवंगत अभिनेते शाहू मोडक, सांगलीचे बॅंक अधिकारी गिरीश शहा, पुण्याचे अंकज्योतिषी एम कटककर, कोल्हापूरच्या डॉ. भावना मेहता (एम.बी.बी.एस.) यांचा सामावेश होता.
डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी १९८५ च्या ज्योतिषसंमेलनात वैद्यक ज्योतिषाच्या सेमिनारमध्ये खालील विधाने केली होती :-
१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते. धनभारित व्यक्तिमधे आत्मिक सामर्थ्याने रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानाने भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तिंनी पाणी दिले तरी त्याचे औषध बनते.
२) गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे आधी कळते.
३) डॉ. पुरंदरेंनी ऑपरेशन करुन एक जुळे काढले. त्यांचे पोषण करणारी वार एकच होती. वैद्यकशास्त्र सांगते की अशी जुळी भावंडे अगदी एकसारखी असतात. परंतु तेवढया वेळात चंद्राने नक्षत्र बदलल्याने त्या मुली पूर्णपणे वेगळया रंगरुपाच्या, गुणाच्या झाल्या.
हे दावे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचेवर येते असे आव्हान लोकसत्तेच्या १९.१.८६ च्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 'भविष्याचे भ्रमजाल` या लेखातून दिले. परंतु या बाबत त्यांचा कुठलाही प्रतिसाद आलेला नाही.
पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन रोगनिदान हे जवळजवळ ८० ते ८५ टक्के बरोबर येते. परदेशात जवळजवळ ६० ते ६५ टक्के डॉक्टर मंडळी याचा आपल्या वैद्यकव्यवसायात उपयोग करुन घेतात. असे विधान कोल्हापूरच्या डॉ.भावना मेहता यंानी केले होते. त्यावर त्यांना असे जाहीर आव्हान दिले होते:-
१) परदेशात ६० ते ६५ टक्के डॉक्टर याचा वापर करतात यासाठी सबळ पुरावा सादर करावा. कुठल्या मेडिकल जर्नल मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे?
२) सोयीच्या कुठल्याही हॉस्पिटल मधले २० रुग्ण आम्ही देउ. त्यांच्या कुंडल्या पाहून त्यांनी रोगनिदान करावे. त्यासाठी ते डॉ.बी.एन. पुरंदरे, दिल्लीचे डॉ. जे.एन.राव यांची मदत घेऊ शकतात. ते सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. तसेच त्यानंतर पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पॅनेल आधुनिक वैद्यकीय चाचण्या करुन आपल रोगनिदान देईल. तेही सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. दोन्ही पाकिटे डॉक्टर व माजी न्यायमूर्ती यांच्या तटस्थ पॅनेलसमोर उघडली जातील. डॉ. भावना मेहतांनी ८० टक्के जरी अचूक रोगनिदान केलेले आढळले तरी त्यांचा दावा आम्ही मान्य करु.
यावर कुठलेही आव्हान स्वीकारले गेले नाही. ही आव्हाने सुरवातीला एक लाख, त्यानंतर दोन लाख व आता पाच लाख अशा रक्कमेपर्यंत गेली आहेत. ज्योतिषांच्या दाव्यानुसार त्यात थोडाफार बदल केला जातो.ही आव्हाने वेळोवेळी दिली जातात. पण एकूण ढाचा याच पद्धतीचा असतो. आव्हान देण्यात केवळ हेतू हा की लोकांचे लक्ष या निमित्ताने वेधले जाते व लोक त्यावर चिकित्सकपणे विचार करू लागतात. आव्हानाच्या निमित्ताने लोकांच्यासमोर महत्वाची गोष्ट आली की, पत्रिकेवरुन व्यक्ती स्त्री आहे का पुरूष? जिवंत आहे की मृत ? या साध्या गोष्टी सुद्धा सांगता येत नाहीत. अहो, तुम्हाला वर्तमान काळ नीट सांगता येत नाही तर तुम्ही भविष्य काळ काय सांगणार? या साध्या तर्कशुद्ध प्रश्नावर ज्योतिषाचे पितळ उघडे पाडण्यास मदत झाली. नंतरनंतर या ज्योतिषाच्या मर्यादा आहेत. ज्योतिषाचा वापर मार्गदर्शक म्हणून होतो. ते दैवी शास्त्र आहे. ते धर्माचे अंग आहे. त्याला भौतिक कसोटया लागू करता येत नाहीत. अशी भूमिका घ्यायला सुरवात केली. आव्हानाकडे दुर्लक्ष केले तरी आपल्या कडे येणाऱ्या गि-हाईकावर याचा काही परिणाम होणार नाही याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी आव्हानाची दखल घेणे सोडून दिले.
आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ साली रा.ज.गोखले या पुणे येथील शिक्षक गृहस्थाने 'फलज्योतिषचिकित्सा` नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सविस्तर चिकित्सा केली आहे. फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी एक निर्णायक समितीची स्थापना केली. भविष्यज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या पद्धतीच्या पुरस्कर्त्यांस व तज्ज्ञास एक विनंती केली, आपली वर्तवलेली भविष्ये त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी. त्यासाठी यथोचित पारितोषकही देण्याची तयारी ठेवली होती. पण त्यासाठी त्यांनी फलासंदर्भात अटी घातल्या.
१) ज्या गोष्टी करणे व्यक्तिच्या हातात आहे ( उदा. प्रवासास जाणे ) त्या संबंधी भविष्ये समिती विचारात घेत नाही.
२) भविष्य स्पष्ट म्हणजे निश्चितार्थक असले पाहिजे. अर्थात त्याचे स्वरुप व त्याचा काल नियमित पाहिजे.
३) भविष्य एका वर्षाचे आत व फार तर दोन वर्षाचे आत घडणारे असावे
४) कोणताही सिद्धांत अनेक उदाहरणांवरुनच सिद्ध होणे जरुरी आहे. यास्तव फले पुरेशी न मिळता बरीच मिळाल्यास, मिळालेल्या उदाहरणांवरुन होणारा निर्णय 'तात्पुरता खरा` असेच मानण्यात येईल.
५) भविष्य व्यक्तिस अनिष्ट ( उदा. आजार, मृत्यू, इ. स्वरुपाचे ) असल्यास ते गुप्त ठेवले पाहिजे.
६) भविष्य साधार म्हणजे नियमासह द्यावे.
या आवाहनात्मक प्रकाराचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही.