ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय?
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .
यूरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषी लोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिकांविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असायचा. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदर निर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते ! `` पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.

२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?
कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग. भारतीय कालगणनेसाठी ज्योतिर्गणित हे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे. त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे. चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात.
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून जशा राशी झाल्या तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा झाला.
वार हे अंग उशीरा प्रचारात आले. वार हे मूळ भारतीयांचे नव्हेतच. ते खाल्डियन कदाचित इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले असावेत. कारण महाभारतात वारांचा उल्लेख नाही असे भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास कर्ते शं. बा. दिक्षीत सांगतात.
योग व करण हे व्यवहारोपयोगी नसल्याने आता व्यवहारात योग व करण ही अंगे प्रचारात नाहीत. पंचांगात मात्र ती दिलेली असतात.
या व्यातिरिक्त पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय वगैरे वगैरे. औषधाची जशी प्रथमोचाराची पेटी असते तसे हे धार्मिक प्रथमोचाराचे अंग म्हणून घरात टांगलेले असते.

३) जन्मकुंडली म्हणजे काय?
तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते पण वर्तुळाकार कुंडली मांडण्याची पद्धत पाश्चात्यात आहे.दक्षिण भारतात चौकटीतच परंतु थोडी वेगळया पद्धतीने मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे.

४) जन्मरास म्हणजे काय? जन्मनक्षत्र म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती ज्या वर्तुळात फिरते ते वर्तुळ जर कल्पनेने मोठे-मोठे करीत नेले व तारांगणाच्या घुमटाला भिडवले तर तेथे जे काल्पनिक महा-वर्तुळ तयार होईल त्याला अयनवृत्त किंवा क्रांतीवृत्त म्हणतात. या महा-वर्तुळावर एक आरंभ-बिंदू ठरवायचा आणि तिथून सुरुवात करून महा-वर्तुळाचे १२ समान भाग मानायचे. दरएक भाग तीस अंशाचा होतो. त्यालाच रास म्हणतात. मेष ते मीन अशा बारा राशी आहेत.तुमच्या जन्माचे वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती तुमची जन्मरास मानली जाते.
आता याच महा-वर्तुळाचे २७ समान भाग केले तर एकेक भाग १३ अंश व २० कलांचा होईल. एक भाग म्हणजे एक नक्षत्र. तुमच्या जन्माचे वेळी जर चंद्र मृग नक्षत्रात असेल तुमचे जन्मनक्षत्र मृग असे म्हणायचे. ही सत्तावीस नक्षत्रे बारा राशींमध्ये वाटलेली आहेत म्हणून एकेका राशीत सव्वादोन नक्षत्रे बसतात. प्रत्येक नक्षत्राचे चार भाग करतात त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात.
अंतरिक्षाच्या कल्पनातीत अफाट पार्श्वभूमीवर दिसणारे हे राशी-नक्षत्रांचे चित्र आपल्या तोकड्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यात येईल अशा रितीने मांडता येईल का? येईल. अशी कल्पना करायची की, सूर्यापासून प्लूटोपर्यंत पसरलेली आपली संपूर्ण सूर्यमाला एका रुपयाएवढ्या लहानशा वर्तुळात मावेल एवढी लहान केली आहे. ही रुपयाच्या आकाराची सूर्यमाला एका विस्तीर्ण मैदानात मध्यभागी ठेवली आहे. आता या प्रमाणावर, म्हणजे स्केलवर, राशी-नक्षत्रांच्या ताऱ्यांची मांडणी मैदानात करायची आहे. त्यासाठी त्या रुपयाच्या भोवती ३०० फूट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. या वर्तुळाच्या आत एकही तारा नाही. त्याच्या बाहेर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात मैलभर अंतरापर्यंत डोळ्यांना दिसू शकणारे राशी-नक्षत्रांचे तारे विखुरलेले आहेत. मृग नक्षत्रातला व्याधाचा तारा ५५० फूट अंतरावर आहे. काही नक्षत्रांचे तारे दीड-दोन हजार फूट अंतरावर आहेत. आता जरा आपल्या रुपयाकडे पहा. त्यावर कुठेतरी आपली पृथ्वी व चंद्र एका तिळाएवढ्या लहानशा जागेत आहेत असे समजायचे. पृथ्वीवर उभे राहून चंद्राकडे पहाणारा म्हणत असतो की मला चंद्र आत्ता मृग नक्षत्रात दिसतो आहे, वास्तविक तो बापडा चंद्र कुठे असतो आणि ते मृग नक्षत्र कुठे असते! तरी पण फलज्योतिषात असे म्हणायचे असते की माझ्या जन्मवेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसत होता म्हणून माझे जन्मनक्षत्र मृग. या नक्षत्राचा मालक कोण तर मंगळ, म्हणून मला जन्मत: मंगळाची महादशा चालू झाली! हे सगळे बघून विज्ञाननिष्ठ माणसाला असे वाटू लागते की ज्योतिष्यांची दुनिया म्हणजे वेड्यांचा बाजार आहे !

५) नावावरून जन्मरास व जन्मनक्षत्र कसे ओळखतात ?
खेडेगावात मूल जन्माला आल्यावर गावच्या जोशाकडून त्याचे जन्म-नांव काढून घेतात. पूर्वी गावात भिक्षुकी करणाराच ज्योतिषीही असायचा. तो पंचांगातून त्या दिवशीचे नक्षत्र पाहून अवकहडा चक्रावरून नावाचे आद्याक्षर सांगायचा. चू, चे, चो, ला, ली, लू, डा, डी अशा अक्षरातून तो एखादे अक्षर सुचवायचा. मग त्या अक्षरावरून डामदेव, चोमदेव अशी निरर्थक नांवे किंवा साधी नावे सुद्धा जन्मनांव म्हणून ठेवली जायची. या पद्धतीमुळे जन्मतारीख किंवा जन्मवेळ कुठेही नोंदलेली नसली तरी जन्मनांव पक्के लक्षात रहात असल्यामुळे त्या नावावरून अवकहडा चक्रातून जन्मनक्षत्र व जन्मरास कोणती ते कळते.

६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?
जेव्हा जातकाच्या मनात काही प्रश्न असतात, उदाहरणार्थ, मला प्रमोशन कधी मिळेल? घर कधी बांधून होईल? हरवलेली वस्तू सापडेल का? मॅचमध्ये भारत जिंकेल का? जेव्हा असा एखादा प्रश्न कुणी ज्योतिष्याला विचारतो तेव्हा ज्योतिषी लगेच किती वाजले आहेत ते पाहून त्यावेळेची कुंडली मांडतो. तिला प्रश्न कुंडली म्हणतात. फलज्योतिषात कृष्णमूर्ती किंवा नाक्षत्रज्योतिष नावाची पद्धत आहे. या कृष्णमूर्तीचा तत्वज्ञ जे. कृष्णमूर्तीशी काही संबंध नाही. या पद्धतीत प्रश्नकुंडलीला विशेष महत्व आहे. असे समजा की एका निवडणुकीतले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच वेळी एका ज्योतिष्याकडे गेले. दोघांनी ज्योतिष्याला विचारले की मी निवडणूक जिंकेन का ? आता पंचाईत आली! दोघांच्या प्रश्नाची वेळ एकच म्हणून दोघांची प्रश्नकुंडली एकसारखीच येणार. दोघांनाही एकच भविष्य कसे सांगायचे ? मग अशा वेळी ज्योतिषी काय युक्ती करतो तर त्या दोघांना १ ते २४९ पैकी कुठलाही एक आकडा मनात धरायला सांगतो. दोघेही एकच आकडा धरण्याची शक्यता फारच कमी असते. मग त्या आकडयाशी संबंधीत असलेली प्रश्नकुंडली मांडून ज्योतिषी त्याना भविष्य सांगतो ! या पद्धतीवर काही ज्योतिषी असा आक्षेप घेतात की तिच्यात जन्मकुंडलीचा विचारच होत नाही. पण धंदेवाईक ज्योतिष्यांना ही पद्धत सोयीची आहे कारण, अचूक जन्मवेळ तर राहोच पण जन्मवर्ष सुद्धा ज्यांना माहित नाही असे खूप लोक असतात. त्यांची जन्मकुंडली कुठून असणार ? मग तशा लोकांचे भविष्य कसे सांगायचे ? पण प्रश्नकुंडलीच्या पद्धतीमुळे अशा लोकांची - व ज्योतिष्यांचीही - सोय झाली आहे.
या पद्धतीबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.

७) अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल असेल तर अशुभ अशी ढोबळ संकल्पना आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात एखाद्या दिवशी भारत हरला तर तो दिवस त्या अनुषंगाने भारताला अशुभ व पाकिस्तानला शुभ झाला. हीच गोष्ट उलट घडली तर तो दिवस भारताला शुभ व पाकिस्तानला अशुभ. सौद्यांमध्ये वा सट्टेबाजी मध्ये एखाद्याचा फायदा हा दुसऱ्याचा तोटाच असतो. त्यामुळे एखाद्याचे शुभ हे दुसऱ्याचे अशुभ असू शकते.
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ दाही दिशा ।। अमावस्याच काय पण कुठलाही दिवस अशुभ नाही. दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानली जाते. कारण अमावस्या म्हणजे सूर्य चंद्र युती. सूर्य चंद्र बरोबरच उगवतात व बरोबरच मावळतात. युतीत ग्रहांची फले वृद्धिंगत होतात. अशी ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे. आपल्याकडे मात्र अमावस्या अशुभ मानतात. अजून गमतीची गोष्ट अशी की दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अमावस्येच्या दिवशी असते. म्हणजे एकच दिवस स्थलसापेक्षतेने, व्यक्तिसापेक्षेने शुभ किंवा अशुभ होतो.

८) अमावस्येला -पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तस्त्राव जास्त होतो हे कितपत सत्य आहे?
ही समजूत खरी आहे की नाही या विषयावर शल्यविशारदांमध्येच मतभेद आहेत. डॉ. भा. नी. पुरंदरे यांनी १९८५ साली झालेल्या ज्योतिष अधिवेशनात स्पष्ट सांगितले की त्यांना असा काहीही अनुभव आलेला नाही. याच्या अगदी उलट काही डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्या मते अमावास्येला रक्तस्त्राव जास्त होतो. ज्योतिष्यांना या मताचा मोठाच आधार मिळाला. ते म्हणू लागले की अमावास्येला समुद्राला मोठी भरती येते. माणसाच्या शरिरातील रक्तालाही तशीच भरती येत असल्यामुळे रक्तस्त्राव जास्त होत असावा. त्यांचा हा तर्क खुळचटपणाचा आहे. कसा ते पहा. समुद्राला जेव्हा एका ठिकाणी भरती येत असते तेव्हा त्या ठिकाणापासून ६००० मैल अंतरावर ओहोटी चालू असते. तिथले पाणी इकडे खेचले जात असते म्हणून इथे भरती येत असते. तळ्यात किंवा हौदात भरती-ओहोटी होत नसते! मग माणसाच्या एवढ्याशा शरीरातल्या रक्तात भरती-ओहोटी येणे तर दूरच. दुसरी गोष्ट अशी की अमावास्येला काय किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी काय, ६ तास भरती असते तर ६ तास ओहोटी असते. अमावास्येला सकाळपासून मध्यान्हापर्यंतच भरती असते, दुपारी ओहोटी असते. आता प्रश्न असा की सदरहु डॉक्टरमहाशयांनी जो काय अनुभव घेतला तो कोणच्या वेळी घेतला ? हा प्रश्न त्यांना कुणी विचारीत नाही कारण कुणालाच धड काही माहिती नसते. ग्रहांचा मानवी जीवनावर काहीतरी परिणाम होत असावा या मताला दुजोरा म्हणून हे असले उदाहरण हमखास उगाळले जाते. डॉक्टर ज्योतिषाशी लगट करू लागले की काय गोंधळ करतात ते महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या २००१ दिवाळी अंकात डॉ. श्रीखंडे यांनी छान दाखवले आहे.

९) अमावस्या पौर्णिमेला वेडाचे झटके , अपघाताचे प्रमाण जास्त का असते?
ही मुळातच चुकीची माहिती आहे. काही गूढवादाकडे झुकलेल्या नियतकालिकांत असली चुकीची माहिती काहीतरी सनसनाटी असावं म्हणून दिलेली असते. त्यासाठी दाखले म्हणून जे संदर्भ वा सर्व्हे दिलेले असतात ते मुळातच शास्त्रीय नसतात. पण मनोरंजनासाठी वाचणारे वाचक मात्र त्यावर विश्वास ठेवतात आणि चिकित्सक लोक त्या नियतकालिकाच्या प्रकृतीनुसार त्याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे असे समज फोफावतात.
आपल्याकडे येरवडा मनोरुग्णालयात असा अभ्यास तेथील डॉ. देव यांनी केला असता या समजूतीत काडीमात्र तथ्य नसल्याचे त्यांना आढळले. अंगात येणाऱ्या लोकांच्यात धूप किंवा उद यांचा वास, घागरी फुंकणे, विशिष्ट वाद्ये हे वातावरण व आज मंगळवार आहे किंवा गुरुवार आहे या स्वयंसूचनेचा अंतर्भाव हा जसा महत्वाचा घटक असतो तसा काहीसा प्रकार म्हणून वर्तणूकीतील बदल हा भाग काही मनोरुग्णांचे बाबत असू शकतो. पण वेडाचा झटका, आत्महत्या वा तसा प्रयत्न, इपिलेप्सी या गोष्टीचा चंद्राच्या कलांशी काहीही संबंध नाही. अपघातांचे प्रमाण या वेळेस वाढते या दाव्यात तर काहीच तथ्य नाही. या साठी हवा असलेला सर्व्हे हा तुम्ही आम्ही केवळ वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरुन संकलित केला तरी आपल्या सहज लक्षात येईल.
या बाबत श्री. रा.ज. गोखले यांनी मुंबई मुन्सिपाल्टी च्या १९२७ च्या रजिस्टर वरुन सर्वेक्षण केले होते. 'रत्नाकर` या नियतकालिकाच्या जानेवारी १९३१ च्या अंकात '' लौकिक समजूतींविषयी शास्त्रज्ञ साशंक का?`` या लेखात त्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यांनी अमावस्या पौर्णिमा या तिथीच्या अलिकडे व पलिकडे दोन दिवस घेउन एकूण ११७ दिवसातील ८७४३ मृत्यूसंख्या विचारात घेतली. त्यात त्यांना या विशिष्ट तिथीतील रोजची सरासरी ही ७४.७२ आढळली. आणि एकूण वर्षातील रोजची सरासरी ही ७५.४८ आढळली. ( संदर्भ :- 'लोकभ्रम` लेखक रा. ज. गोखले, सन १९३५ )
१९६९ ते १९७३ या काळातील न्यूयॉर्क शहरातील आत्महत्येच्या एकूण ३११ केसेस चा अभ्यास मायकेल्सन, रसेल व इतर शास्त्रज्ञांनी केला. संगणकाच्या मदतीने १ लाख वेगवेगळे फलज्योतिषकीय घटक व ६२२ कुंडल्या, तीन गट, नियंत्रित घटक, मुक्त घटक यांच्या आधारे संख्याशास्त्रीय दृष्टया त्यांना आत्महत्या व कुंडलीतील फलज्योतिषकीय घटक यांचा कुठलाही परस्पर संबंध आढळला नाही. ( संदर्भ :- जर्नल ऑफ जिओकॉस्मिक रिसर्च, सन १९७८ )

१०) हिंदू धर्मात पावसाळयाची जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो असा अनुभव येतो. मग नक्षत्रे आणि मौसमी पाउस यांचा काही संबंध आहे का?

खरं तर हा भाग पूर्णपणे भूगोलाचा आहे. पृथ्वीचा आस हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी पूर्णपणे काटकोनात नाही. तो २३.५ अंश कलता आहे. तो तसा नसता तर विषुववृत्तावर बारमाही उन्हाळाच राहिला असता. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे ऋतू हा काळ व स्थळ या दोन्हीशी निगडित आहे. मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र म्हटले जाते. ७ जूनला मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र लागते याचा अर्थ असा कि सूर्य आकाशात असताना आकाशातील तारे दिसतील अशी कल्पना केली तर सूर्य हा त्या वेळी आकाशातल्या मृग नक्षत्राजवळ दिसेल. म्हणजे या ठिकाणी नक्षत्रांचा उल्लेख हा कालनिर्देशक आहे. ७ जूनला मृग नक्षत्रात प्रवेश सर्व पृथ्वीच्या संदर्भाने आहे. पण पावसाळा जून महिन्यात फक्त आपल्याकडे चालू होतो. सर्व जगभरात नाही. मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे. २१ मार्च, २२जून, २३ सप्टेंबर व २२ डिसेबर या पृथ्वीची स्थिती दर्शवणाऱ्या भूगोलातील आकृत्या पाहिल्या तर आपल्या ऋतूमान व कालनिर्देशन यांचा परस्पर संबंध लक्षात येईल. पूर्वीच्या काळी कालनिर्देशनासाठी पंचांगच वापरले जात. कुठल्या नक्षत्रावर काय धर्मकृत्ये करावीत या गोष्टी ज्योतिषाच्या संहिता या स्कंधाशी संबंधीत आहे. ही धर्मकृत्ये वा शेतीसंबंधीत कामे ही ऋतूमानाशी निगडित आहेत. ती पंचांगाचे आधारे सांगितली जात असत आणि पंचांग हे फलज्योतिषाशी संबंधीत असल्याने पावसाचा नक्षत्राशी संबंध ही बाब ज्योतिषाशी जोडली गेली.

११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?

समजा तुमचा ८०० स्केअर फूटचा तीन खोल्यांचा बंगला आहे. त्यातली एक भिंत तुम्ही पाडून सरकविली आणि एक भिंत टाकून चार खोल्या केल्या मुळे तुमच्या घराचे क्षेत्रफळ बदलले का? की तुमचा पोस्टल पत्ता बदलला? नाही ना! मग तेरावी रास हा असाच प्रकार आहे. लंडनच्या रॉयल ऎस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ही तेरावी ऑफियूचस नावाची रास प्रसिद्ध केली आहे. वृश्चिकेचा तुकडा काढून या राशीला जागा दिली. ज्योतिषशास्त्राला याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडी सनसनाटी बातमी झाली एवढीच. लोक आता तेरावी रास विसरले सुद्धा.

१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.

१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो ?
सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते. १५-२० मिनिटांच्या फरकामुळे ठोकळाकुंडलीतल्या ग्रहांची स्थाने व राशींचे आकडे यात सहसा काही फरक पडत नाही. वर सांगितल्या प्रमाणे बॉर्डर वेळेचा जन्म असेल तर उपरोक्त उदाहरणात जसे तीनचे चार झाले तसा प्रथम स्थानातल्या राशीच्या आकड्यात एका आकड्याचा फरक पडू शकतो, आणि त्याचबरोबर नक्षत्रही बदलू शकते. या बाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे!
आता प्रश्न असा आहे की हे त्यांचे संशोधन एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होउन त्याला मान्यता मिळाली आहे का ? एवढया मोठया तज्ज्ञ डॉक्टराने सांगितले ते खरे असलेच पाहिजे असे सामान्य माणूस मानणारच. दुसऱ्या तज्ज्ञांची मते या बाबतीत काय आहेत हे पहाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. यावरून एवढे मात्र दिसते की जेव्हा एखादा मोठा डॉक्टर स्वत:च ज्योतिषी बनतो तेव्हा तो त्या शास्त्राच्या समर्थनासाठी दिशाभूल करणारी विधाने करू शकतो. पुढे २४ व्या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही हेच दाखवून दिले आहे.
या ठिकाणी हस्तरेषातज्ज्ञ पुढे येतात. ते म्हणतात, ''जुळया मुलांची कुंडली एकवेळ सारखी असेल पण हस्तरेषा मात्र वेगळया असतात. अहो, हा निसर्गाचा आरसा आहे! तुमची जन्मवेळ चुकू शकते. पण हा आरसा काही बदलत नाही. तुम्ही आमच्याकडे या.``