प्रस्तावना:
संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.
काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती. मी बेधडक उत्तर दिले- 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार असल्याने, आपल्या जिभेला आपण हवे तसे वळवू शकतो. परिणामी इतर कुठल्याही भाषेतले उच्चार आत्मसात करणे सोपे जाते.' मजा म्हणजे प्रश्नकर्त्या व्यक्तीलाही हे उत्तर पटले. त्यानंतर २-३ वर्षांनी मी भाषाशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या अशा अनेक गैरसमजांना धडाधड सुरूंग लागत गेले.
आपणा सर्वांच्याच मनात असे अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ अक्षरांनाच उच्चार मानणे. जसे इंग्रजी भाषा शिकवताना आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलेले असते की या भाषेत ५ स्वर आहेत- a, e, i, o, u. पण ही तर केवळ अक्षरे झाली. उच्चारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मात्र या भाषेत ५-१० नाही तर चांगले २०च्या आसपास स्वर आहेत. याचाच अर्थ, आपण लिहितो ती अक्षरे व त्यांचे उच्चार यांत बराच फरक आहे.
दुसरा गैरसमज म्हणजे मी वरील प्रसंगात उल्लेखलेला 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार आहेत' हा गैरसमज. कोणत्याही भाषेत जगातले सगळे उच्चार नसतात. संस्कृतभाषेत जे आहेत, ते सर्वच इंग्रजीत नाहीत (उदाहरणार्थ-'भ') व इंग्रजी भाषेतले काही संस्कृतात नाहीत(उदाहरणार्थ- 'ऍ'). या दोन्ही भाषांत नसलेले असे आणखी अनेक उच्चार आहेत, जे जगातल्या इतर भाषांत आहेत. त्यामुळे माझ्या वरच्या प्रसंगातल्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरत नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतभाषा ही इतर भाषांप्रमाणेच मानवनिर्मित आहे व तिला स्वतःच्या मर्यादा आहेत. पण आपण लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या भाषेत अनेक गमती जमती आहेत आणि त्या हेरून प्राचीन काळातल्या भाषाभ्यासकांनी तिचे स्वतंत्र तर्कसंगत शास्त्र निर्माण केले आहे. हे शास्त्र उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र अशा विविध पातळ्यांवर बांधले गेले आहे.
संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.
या लेखाचे प्रयोजन लेखमालेची थोडीशी पार्श्वभूमी देणे हे आहे. म्हणजे ही लेखमाला वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी जेव्हा थ्, द्, न् , आ अशी अक्षरे लिहीन तेव्हा त्यांकडे लिखित अक्षरे या दृष्टीने न पाहता, आपल्या मुखातून बाहेर पडणारे उच्चार या दृष्टीकोनातून पहावे. व्यंजने लिहिताना ती हलन्तच असतील. याचे कारण म्हणजे त्या व्यंजनात कुठलाही स्वर मिसळलेला नाही, हे दाखवणे. उदाहरणार्थ्- 'ण' या उच्चारात 'ण्' आणि 'अ' हे दोन उच्चार आहेत, एक व्यंजन आणि एक स्वर आहे. हे टाळण्यासाठी हलन्त व्यंजने योजली जातील.
हे आणखी नीट समजून घेण्यासाठी अणू-रेणू सारखी संकल्पना लक्षात घेतलीत तरी चालेल. जसे 'ण्' हा एक अणू आहे. 'अ' हा दुसरा अणू आहे. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा 'ण' हा रेणू बनतो. त्याचप्रमाणे 'क्ष' हा 'क्', 'ष्', 'अ' या अणूंपासून बनलेला रेणू आहे तर 'ज्ञ' हा आजच्या काळानुसार 'द्', 'न्', 'य्' या अणूंपासून बनलेला रेणू आहे. (आजच्या काळानुसार असे अशासाठी म्हटले की पूर्वीच्या काळी 'ज्ञ' या उच्चारात 'ज्' व 'ञ्' हे दोन उच्चार होते असे मानले जाते.) वर्णमालेत जरी आपण इतर व्यंजन-स्वरांसोबत 'क्ष' व 'ज्ञ' यांचाही समावेश करत असलो, तरीही आपल्याला फक्त 'अणूं'त रस असल्याने, या दोन 'रेणूं'चा विचार आपल्याला येथे करायचा नाही.
आणि सर्वांत महत्त्वाचे - मी जे काही थोडेफार वाचले व त्यातून मला वर्णमालेतील ज्या काही बाबींचा उलगडा झाला, त्या माझ्या कुवतीनुसार येथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मी या विषयातील तज्ज्ञ नसून केवळ एक विद्यार्थिनी आहे, त्यामुळे वाचकांच्या सर्वच प्रश्नांना मला उत्तरे देता येतील असे नाही. परंतू अशा प्रश्नांचे स्वागतच आहे, कारण असे प्रश्न उत्तरे शोधण्यासाठी विचारांना चालना देतील.
पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत- उच्चार करण्याच्या क्रियेत सहभागी असलेले विविध अवयव (vocal tract). तोवर मी येथे वर्णमाला देते आहे, जेणेकरून ज्यांना पाठ नसेल त्यांना वर्णमालेवर विचार करता येईल.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ
क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ्
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्
प्, फ्, ब्, भ्, म्
य्, र्, ल्, व्
स्, श्, ष्, ह्
ळ्
या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे. योग्य ते प्रतिशब्द सापडताच ते लेखात घातले जातील, तोवर हा इंग्रजीमिश्रित मराठी भाषेतला लेख गोड मानून घ्यावा ही विनंती! :)
आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमके काय होते? आपल्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. ही सर्व प्रक्रिया चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे भांडे बनवण्यासारखी वाटते मला. त्या मातीच्या गोळ्याला कसा हाताने वेगवेगळ्या ठिकाणी दाब देऊन आकार दिला जातो, हात जवळ ठेऊन दाब दिल्यास चिंचोळ्या मानेचे सुरईसदृश भांडे तयार होते, तेच वेगळ्या तर्हेने दाब दिल्यास बसके, पसरट भांडे बनते! उच्चाराचेही तसेच आहे. हवा तीच, पण पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.
ही प्रक्रिया आणखी स्पष्ट होण्यासाठी आपण खालील चित्र पाहू.
vocal tract |
या चित्रात आपल्याला vocal tract म्हणजे उच्चारक्रियेत जे जे अवयव भाग घेतात ते सर्व अवयव दिसत आहेत. या चित्रात दाखवले गेलेले सर्वच अवयव आपण मराठी बोलताना वापरत नाही. आपण वापरतो ते velum म्हणजे पडजीभ, palate म्हणजे टाळू, nasal cavity, lips म्हणजे ओठ, teeth म्हणजे दात, tip of the tongue म्हणजे जिभेचे टोक, body of the tongue म्हणजे जिभेचा मधला भाग, root of the tongue म्हणजे जिभेची मागची बाजू हे. pharynx, larynx इत्यादि अवयव तर वापरले जातातच. पण पडजीभेच्या मागचा भाग ज्याला uvula असे नाव दिले आहे (चित्रात हा भाग दाखवलेला नाही), तो भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़ वगैरे.
या सर्व अवयवांना articulators असे म्हणतात. आपण त्यांना उच्चारक म्हणू. वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून आपण बरेच वेगवेगळे उच्चार करतो. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार आपण ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-
uvula सारखाच आणखी एक उच्चारकही आपण वापरत नाही तो म्हणजे alveolar ridge. हा उच्चारक तोंडाच्या आतील बाजूस दातांच्या वर आहे.- त्याच्या व जीभेच्या टोकाच्या संयोगातून ट्, ठ्, ड्, ढ् हे इंग्रजी भाषेतले उच्चार निर्माण होतात. हे वर्ण आपल्या ट्, ठ्, ड्, ढ् हून वेगळे आहेत, कारण दोन्ही भाषांत वेगवेगळ्या अवयवांच्या संयोगातून ते निर्माण झाले आहेत. दोन्हीं वर्णगटांचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करून पाहिल्यास, त्यांतला फरक लक्षात येईल.
आता आपण पाहिलेली माहिती एका तक्त्यात मांडून आपण पाहू, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे ते आपल्या लक्षात येईल.
क् | ख् | ग् | घ् | ङ् | - | कण्ठ्य |
च् | छ् | ज् | झ् | ञ् | श् | तालव्य |
ट् | ठ् | ड् | ढ् | ण् | ष् | मूर्धन्य |
त् | थ् | द् | ध् | न् | स् | दन्त्य |
प् | फ् | ब् | भ् | म् | - | ओष्ट्य |
ज्यांना ही दन्त्य वगैरे 'प्रकरणे' पूर्वी माहित नव्हती, किंवा माहिती होती पण त्यांचा अर्थ माहिती नव्हता (म्हणजे माझ्यासारखे लोक) त्यांना आता आपल्या वर्णमालेत पहिल्या ५-५ व्यंजनांच्या गटांच्या वर्गीकरणामागचे कारण कळले असेल. आता यावरून पुढे असा प्रश्न पडतो, की जर स्, श्, ष् हे ही या ५ पैकी ३ गटांत समाविष्ट होतात, तर मग त्यांना पहिल्या २५ व्यंजनांच्या बरोबरीने का ठेवले नाही? या व इतर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यंजनांबद्दल अधिक माहिती देणार्या पुढच्या भागात मिळेल.
गेल्या वेळी 'श्' व 'ष्' यांत फरक काय असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. सर्व वाचकांनी वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे लक्षात येईल.
गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.
ग्लॉटिस म्हणजे vocal cords मधली मोकळी जागा किंवा विवर. या लेखाच्या आधीच्या लेखात दिलेल्या चित्रात सर्वांत खाली larynx (vocal cords) असे लिहिलेले तुम्हाला दिसेल. या नावाने निर्देशित केलेला भाग लंबगोल असून तो करड्या रंगात रंगवला आहे. त्या लंबगोलाचा करडा भाग म्हणजे खरे तर एक विवर आहे. या विवरातूनच हवा वर येते.
इथवर आपण बर्याच पारिभाषिक संज्ञा पाहिल्या. त्यांपैकी उच्चारक्रिया (articulation), उच्चारक(articulators) तसेच larynx वगैरे पाश्चात्य उच्चारशास्त्राच्या परिभाषेतील संज्ञा आहेत. कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा मात्र आपल्या प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत. होय, आपल्याकडेही विकसित उच्चारशास्त्र अस्तित्त्वात होते. त्यानुसारच त्यांनी आपल्या वर्णमालेची रचना केली.
या लेखात आपण ३ वेगवेगळ्या गटांतल्या संज्ञा वापरणार आहोत. पहिल्या गटातल्या संज्ञा या आपल्या प्राचीन उच्चारशास्त्रज्ञांच्या असून त्या निळ्या रंगात लिहिल्या जातील. दुसर्या गटातील संज्ञा या पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांच्या असून त्या लाल रंगात लिहिल्या जातील. तिसर्या गटात २ संज्ञा आहेत- उच्चारक्रिया व उच्चारक - त्या काळ्या रंगातच राहतील.
पहिल्या गटातली सर्वांत महत्त्वाची संज्ञा म्हणजे 'प्रयत्न'- थोडक्यात उच्चारक्रिया. प्रयत्न म्हणजे उच्चारकांच्या वेगवेगळ्या हालचाली. फुप्फुसांतून हवा वर येणे हा पहिला प्रयत्न झाला, मग तो ग्लॉटीस मधून वर येणे हा दुसरा मग दोन उच्चारकांचा संयोग होणे हा तिसरा इत्यादि. या सर्व प्रयत्नांची एकत्र बनते ती उच्चारक्रिया. असा फरक प्रयत्न व उच्चारक्रिया या दोहोंतना आपण करणार आहोत. तसाच फरक 'स्थान' व उच्चारक यांत आपण करुया. दन्त्य, कण्ठ्य वगैरे यातले अनुक्रमे दन्त, कण्ठ वगैरे हे स्थान असावे. असावे यासाठी, की स्थान म्हणजे नेमके काय याचा स्पष्ट उल्लेख मला सापडलेला नाही परंतू समजावण्याच्या दृष्टीने उच्चारकापेक्षा वेगळी संज्ञा वापरण्याची गरज भासली. उच्चारक व स्थान यांत वेगळेपण काय तर, क्, ख् इ. कण्ठ्य वर्ण घेतले, तर त्यांचे स्थान कण्ठ किंवा पडजीभ हे असेल तर त्यांचे उच्चारक पडजीभ व जीभ हे दोन्ही असतील. म्हणजे जेथे मला दोन्ही उच्चारकांचा उल्लेख करायचा असेल, तेथे मी उच्चारक ही संज्ञा वापरीन व जेथे मला जीभ सोडून दुसर्या उच्चारकाचा उल्लेख करायचा असेल, तेथे मी स्थान ही संज्ञा वापरीन.
[आपल्या सर्वांच्या माहितीसाठी--> कण्ठ्य- velar, तालव्य- palatal, मूर्धन्य- retroflex, दन्त्य- dental, ओष्ठ्य- bilabial]
आपल्याला आठवत असेल, तर 'समज- गैरसमज' या भागात मी सर्वांना विचार करण्यासाठी वर्णमाला लिहून दिली होती व मधे एक एक ओळ सोडून तिचे गट पाडले होते. असे गट पाडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यातल्या प्रत्येक गटासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.
आपण व्यंजनांतला सर्वांत पहिला गट म्हणजे क् ते म् हे २५ वर्ण विचारात घेऊ. यांच्यासाठी आपण 'स्पर्श' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन्ही उच्चारकांचा एकमेकांना पूर्ण स्पर्श होऊन हवा त्या दोन उच्चारकांनी तयार केलेल्या भिंतीच्या आड कोंडली जाते. मग हे दोन उच्चारक एकमेकांपासून दूर गेल्यावर ही कोंडलेली हवा जोरात बाहेर पडते. या वर्णांना 'स्पृष्ट' व plosive किंवा stop असे म्हणतात.
दुसरा गट य्, र्, ल्, व् या वर्णांचा. यांच्यासाठी आपण 'ईषत्स्पर्श' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन उच्चारक एकमेकांना किंचितसा स्पर्श करतात. त्यामुळे हवा कोंडली न जाता स्पर्श करताना व त्यानंतरही बाहेर जाते. या प्रयत्नांच्या वर्णांना 'अन्तस्थ' म्हणतात. अन्तस्थ म्हणजे व्यंजन व स्वर यांच्या मधोमध उभे राहणारे, म्हणजेच अर्धस्वर- य्, र्, ल्, व् हे चार अन्तस्थ अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ या चार स्वरांशी संबंधित आहेत असे मानले जाते. पाश्चात्य उच्चारशास्त्रात मात्र केवळ य् आणि व् यांनाच semivowels ही संज्ञा दिली जाते तर र् व ल् यांना consonant मानले जाते.
तिसर्या गटात आहेत- श्, ष्, स्, ह्. यांच्यासाठी आपण 'ईषद्विवृत्त' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन्ही उच्चारक एकमेकांना स्पर्श करत नाहीत. दोन्हींच्या मधे कळेल न कळेल अशी अगदी थोडीशीच मोकळी जागा असते. त्यामुळे stops प्रमाणे हवा कोंडली जात नाही, पण बाहेर पडायची जागा कमी झाल्याने मिळालेल्या छोट्याशा फटीतून जोरात बाहेर पडते. या वर्णांना नेमस्पृष्ट किंवा ऊष्म / fricatives असे म्हणतात.
चौथ्या गटात आहे एकटा ळ्. या ळ् च्या बाबतीत मात्र थोडा गोंधळ आहे. ळ् हे व्यंजन अभिजात संस्कृतात नसल्याने अभिजात संस्कृतवरील पुस्तकांत आपल्याला ळ् चा उल्लेख मिळणार नाही. इतकेच काय, वर्णमालेत केवळ ३३ व्यंजने आहेत, असेही सांगितले जाईल. मराठीच्या वर्णमालेत मात्र ळ् धरून ३४ व्यंजने होतात. वैदिक संस्कृत भाषेत मात्र हा ळ् आहे परंतू ड् चे एका विशिष्ट परिस्थितीतले रूप. म्हणजे काय, तर वैदिक संस्कृतात ड् हा दोन स्वरांच्या मधे आला तरच त्याचा ळ् होतो, अन्यथा ळ् चे अस्तित्व नाही. त्यामुळे ळ् चा फार कुणी विचार केलेला दिसत नाही. त्याला ड् च्या बरोबरीने मूर्धन्य स्पृष्ट ही संज्ञा दिली गेली आहे. संस्कृतशी तेवढा त्याचा संबंध नसल्यानेच त्याला वर्णमालेत शेवटचे स्थान दिले असावे. आधुनिक उच्चारशास्त्र मात्र ळ् ला flap किंवा tap ही संज्ञा देते. म्हणजे काय, तर या वर्णाच्या वेळी दोन्ही उच्चारकांचा फारच कमी वेळासाठी, क्षणिक असा स्पर्श होतो.
अशा प्रकारे आपण ४ही गट पाहिले. या चारही गटांतील वर्णांची स्थाने कण्ठ (पडजीभ), तालु, मूर्धा, दन्त, ओष्ठ, ग्लॉटीस यांपैकीच होती, फरक होता तो प्रयत्नांत.
आता आपली पुढची पायरी आहे ती स्पृष्ट वर्णांची अशी अमुक प्रकारेच रचना का केली आहे, ते पाहणे.
क् | ख् | ग् | घ् | ङ् | कण्ठ्य |
च् | छ् | ज् | झ् | ञ् | तालव्य |
ट् | ठ् | ड् | ढ् | ण् | मूर्धन्य |
त् | थ् | द् | ध् | न् | दन्त्य |
प् | फ् | ब् | भ् | म् | ओष्ठ्य |
आपल्या लक्षात येईल की वरील तक्त्यातील प्रत्येक आडव्या ओळीत प्रत्येकी ५ व्यंजने आहेत, व पाचही एकाच स्थानापासून निर्माण झालेली आहेत. एकाच स्थानापासून व स्पर्श या एकाच प्रयत्नांतून निर्माण झालेली असूनही ५ वेगवेगळी व्यंजने कशी काय? जर स्थान व प्रयत्न एकसारखेच असतील, तर त्यातून एकमेव वर्ण उत्पन्न व्हायला हवा, नाही का? म्हणजे या ५ वर्णांत स्पर्श हा प्रयत्न सोडता इतरही प्रयत्नांचा सहभाग आहे! हे प्रयत्न कोणते ते पाहू.
आता आपण या तक्त्याचे ३ उभ्या रकान्यांत विभाजन करूया. पहिल्या रकान्यात प्रत्येक गटातले पहिले २ वर्ण येतात- क्-ख्, च्-छ्, ट्-ठ्, त्-थ्, प्-फ्. दुसर्या रकान्यात प्रत्येक गटातले त्यापुढील २ वर्ण- ग्-घ्, ज्-झ्, ड्-ढ्, द्-ध्, ब्-भ्. तर तिसर्या रकान्यात प्रत्येक गटातले शेवटचे वर्ण- ङ्, ञ्, ण्, न्, म्.
तिसर्या रकान्यापासून सुरुवात करू. आपण जाणले असेलच, की हे पाचही वर्ण म्हणजे अनुनासिके आहेत. अनुनासिकांच्या वेळी स्थान, प्रयत्न जरी सारखे असले, तरीही इतर व्यंजनांप्रमाणे हवा मुखावाटे बाहेर न जाता, नाकावाटे बाहेर जाते. म्हणून ही पाच व्यंजने इतरांहून वेगळी आहेत. आता येथे बर्याचजणांना हा प्रश्न पडतो, की एवढी ५-५ व्यंजने काय कामाची? आपण एवढी व्यंजने कुठे वापरतो? याला उत्तर असे, की आपण ही व्यंजने वापरतो, परंतू आपल्या नकळत. कशी काय बुवा? तर आपण शाळेत असताना लिखाणाचा एक नियम शिकलो होतो. अनुस्वाराच्या पुढे जे व्यंजन येईल, त्या व्यंजनाच्या गटातील शेवटचे अनुनासिक वापरावे. जसे अंक हा शब्द असल्यास अनुस्वाराच्या समोर येणारे व्यंजन क् व त्याच्या गटातील शेवटचा वर्ण ङ् . म्हणून हा शब्द अंक असा न लिहिता अ़ङ्क् असा लिहावा. तसेच काञ्चन, कण्टक, अन्त, अम्बर यांच्या बाबतीत. याचे कारण असे, की शब्द उच्चारताना अनुस्वाराच्या नंतर कोणते व्यंजन येणार हे आपल्याला ठाऊक असते, त्यामुळे जीभ त्या स्थानाच्या दिशेने निघालेलीच असते. त्यामुळे अनुनासिकाचा उच्चार त्याच स्थानावर स्पर्श करून व हवा नाकावाटे सोडून होतो. अङ्क हा शब्द उच्चारताना आपल्या जीभेचा मागचा भाग पडजीभेशी संयोग करण्यासाठी वर उचलला जातच असतो, त्यामुळे तेथेच अनुनासिकाचाही उच्चार केला जातो.
आता दुसर्या रकान्याकडे पाहू. येथे 'संवार' हा प्रयत्न वापरला गेला आहे. म्हणजे- वर म्हटल्याप्रमाणे स्वरयंत्र (lyrinx) मधल्या विवरातून हवा वर येते, तशी ती येत असताना स्वरयंत्राच्या झडपांची हालचाल होते. कधी त्या संकुचित होतात. त्यामुळे हवेला थोडासा अडथळा निर्माण होतो, तो पार करताना हवा त्या झडपांवर आघात करते व त्यातून एक प्रकारचा नाद/ कंपन निर्माण होते. म्हणून या प्रयत्नांतून साकार झालेली व्यंजने 'घोष' / मृदु व voiced असतात.
आता पहिल्या रकान्याकडे पाहू. येथे 'विवार' हा प्रयत्न वापरला गेला आहे. विवार हा संवार च्या बरोब्बर उलट आहे. म्हणजे येथे स्वरयंत्राच्या झडपा संकुचित न होता त्या ताणल्या जातात, व मधे पोकळी राहते, जेणेकरून हवेला कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे नाद/ कंपनही निर्माण होत नाही. म्हणून या प्रयत्नांच्या सहाय्याने उच्चारल्या गेलेल्या व्यंजनांना अघोष/ कठोर आणि unvoiced असे म्हणतात.
आता आपण पहिल्या २ रकान्यांचे २ उभे उपरकाने करू. म्हणजे आता पुढीलप्रमाणे ४ उपरकाने होतात-
१ल्या उपरकान्यात- क्,च्,ट्,त्,प्
२र्यात- ख्, छ्, ठ्, थ्, फ्
३र्यात- ग्, ज्, ड्, द्, ब्
४थ्यात- घ्, झ्, ढ्, ध्, भ्
आपल्याला नेहमी असे वाटते, की क् मधे ह् मिसळला की ख् तयार होतो वगैरे. पण प्रत्यक्षात तसे नाही. क् उच्चारताना त्याबरोबर थोडी अधिक हवा मुखावाटे बाहेर टाकली, तर ख् तयार होतो. तुलेनेने कमी हवा वापरलेल्या या व्यंजनांना 'अल्पप्राण' / unaspirated असे म्हणतात तर तुलनेने अधिक हवा वापरून उच्चारलेल्या व्यंजनांना 'महाप्राण' / aspirated असे म्हणतात. प्राण हा शब्द आपल्याकडे वायू या अर्थाने वापरला जातो हे आपल्याला माहिती असेलच. (उदा.- पंचप्राण= अपान, उदान, व्यान वगैरे नावाचे ५ वायू)
तसेच वरील ४ रकान्यांचे आहे. पहिल्या उपरकान्यांतील सर्व व्यंजने अल्पप्राण असून त्यांच्यात थोडी हवा अधिक मिसळली की दुसर्या उपरकान्यांतील व्यंजने तयार होतात. तसेच तिसर्या उपरकान्यांतील सर्व व्यंजने अल्पप्राण असून त्यांच्यात थोडी हवा अधिक मिसळली की चौथ्या उपरकान्यांतील व्यंजने तयार होतात.
आता आपल्याला क्,च्,ट्,त्,प् या ५ वर्गांच्या विशिष्ट रचनेमागचे 'शास्त्र' कळले असेलच. परंतू संवार- विवार, अल्पप्राण-महाप्राण वगैरे प्रयत्न केवळ स्पृष्ट व्यंजनांनाच लागू होतात का? याचे उत्तर आहे- 'नाही'. अंतस्थ हे घोष (संवारप्रयत्न), अल्पप्राण असतात, तर नेमस्पृष्ट हे अघोष (विवारप्रयत्न) , महाप्राण आहेत. सर्व अनुनासिके घोष (संवारप्रयत्न), अल्पप्राण असतात. ळ् चे सर्व ड् प्रमाणे. नेमस्पृष्ट हे बहुधा नेहमीच महाप्राणच असावेत, त्यांचे अल्पप्राण जोडीदार दिसत नाहीत.
आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल, की व्यंजनांची उच्चारक्रिया ही वाटते तेवढी सोपी किंवा एकमार्गी नसून, ती अनेक प्रयत्नांची गुंफण असते. काही व्यंजनांसाठी स्पर्श, विवार, अल्पप्राण असे प्रयत्न करावे लागतात, तर काहींसाठी ईषत्स्पर्श, संवार, अल्पप्राण वगैरे. आपण बोलताना सहज बोलून जातो, पण त्यापूर्वी आपल्या फुप्फुसांपासून मुखापर्यंत अनेक घडामोडी आपल्या नकळतच घडलेल्या असतात.
आता स्वरांबद्दल पुढील लेखात.
काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व! आतापर्यंत आपण वर्णमालेतील व्यंजनांचे उच्चारस्थानानुसार व प्रयत्नांनुसार केलेले वर्गीकरण पाहिले, व प्रत्येक व्यंजनाच्या विशिष्ट जागेमागे काहीतरी कारण आहे, हेही आपल्या लक्षात आले. आता स्वरांकडे पाहू.
पहिल्या भागात मी दिलेल्या यादीत फक्त अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ॠ आणि ऌ एवढेच स्वर समाविष्ट केले होते. माझ्या या यादीबद्दल काहीजणांनी शंका व्यक्त केल्या. काहींचे म्हणणे होते की यात अं व अ: ही अक्षरेही सामावून घेतली पाहिजेत, तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ॡ अक्षर अस्तित्त्वात नसतानाही जसा दीर्घ ॠ आहे तसा दीर्घ ॡ तत्त्वत: असला पाहिजे. ही तीन अक्षरे मी स्वरांच्या यादीत समाविष्ट न केल्याची कारणे आता आपण पाहू.
आपली परंपरा म्हणजेच प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:।' अशी व्याख्या करते. याचा शब्दश: अर्थ 'आपण होऊन (इतरांच्या मदतीशिवाय) प्रकाशमान होणारे' असा होतो. व्याकरणतज्ञ प्र. शं. जोशी या व्याख्येचे स्पष्टीकरण 'स्वत:च्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांना इतर वर्णांची आवश्यकता नसते. उच्चारांच्या दृष्टीने ते स्वयंपूर्ण असतात' असे देतात. याचा अर्थ व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी इतर वर्णांची म्हणजेच स्वरांची गरज असते. याच कारणाने आपण हलन्त अक्षरांना म्हणजेच केवळ व्यंजनांना अपूर्ण मानतो.
मी शाळेत असताना या स्वर-व्यंजनांतील फरकाबद्दल मला सांगितले गेलेले स्पष्टीकरण असे- 'एखादा वर्ण घेऊन त्याचा उच्चार लांबवला असता, त्या वर्णाचा उच्चार शेवटपर्यंत तसाच राहतो की बदलतो यावरून तो वर्ण स्वर की व्यंजन हे ठरवले जाते.' म्हणजेच अ, आ इत्यादि स्वरांचा उच्चार लांबवला तरी तो अनुक्रमे अ, आ वगैरे असाच ऐकू येतो. परंतु क, ख इत्यादि व्यंजनांचा उच्चार लांबवल्यास शेवटी 'अ' ऐकू येतो. तसेच व आणि य या अर्धस्वरांचा उच्चार करताना तो अनुक्रमे 'उ-अ-अ-अ-अ-अ' आणि 'इ-अ-अ-अ-अ-अ' असा ऐकू येतो. अशा प्रकारे स्वर- व्यंजने- अर्धस्वर असे तीन वेगळे प्रकार पडतात. पण या व्याख्येत ऐ आणि औ हे दोन स्वर का यांचे स्पष्टीकरण मिळत नाही. कारण यांचा उच्चार अनुक्रमे 'अ-इ-इ-इ-इ' आणि 'अ-उ-उ-उ-उ-उ' असा होतो.
आता आपण जी तिसरी व्याख्या विचारात घेणार आहोत, ती आहे पाश्चात्य भाषाशास्त्रज्ञांनी दिलेली. व्यंजने म्हणजे काय हे पाहताना आपण पाहिले, की व्यंजनांचा उच्चार करताना दोन उच्चारकांचा एकमेकांना पूर्ण किंवा थोडासा स्पर्श होतो. स्पर्श झाला नाही तरी दोन्ही उच्चारक एकमेकांच्या इतके जवळ असतात की हवेला अडथळा निर्माण होतो. म्हणजेच व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी हवेला अडथळा निर्माण व्हायला लागतो. याच उलट स्वरांच्या वेळी मात्र कोणतेही उच्चारक एकमेकांच्या फार जवळ येता कामा नयेत. आता आपण मी दिलेल्या यादीतील सर्व स्वर एकदा म्हणून पाहुया. उ च्या वेळी ओठ जवळ येत असले, तरी व्यंजनांच्या वेळी जेवढे जवळ येतात तेवढे नाही. यावरून आपल्याला पुढील गोष्टी लक्षात येतात. -
१) व्यंजनांच्या वेळी उच्चारक एकदम जवळ येतात, स्वरांच्या वेळी अजिबात जवळ येत नाहीत, तर अर्धस्वरांच्या वेळी त्यांचे एकमेकांच्या जवळ येण्याचे प्रमाण स्वरांहून जास्त व व्यंजनांहून कमी असते.
२) अं व अ: ही दोन अक्षरे यातल्या कोणत्याही व्याख्येत बसत नाहीत. अनुस्वार वा विसर्ग यांचा उच्चार दुसऱ्या एखाद्या वर्णाची मदत घेतल्याशिवाय करता येत नाही, ते लांबवल्यावर उच्चारात फरक पडतो. तिसरी व्याख्या मात्र अं ला लागू होत नसली तरी अ: ला लागू होते, असे असूनही त्यात अ व विसर्ग असे दोन वेगवेगळे उच्चार असल्याचे पाश्चात्य भाषाशास्त्र मानते. म्हणून अं व अ: हे प्राचीन किंवा पाश्चात्य दोन्ही उच्चारशास्त्रांनुसार स्वर मानले जात नाहीत.
३) ऋ, ॠ आणि ऌ यांचा आपण आजच्या काळात अनुक्रमे रु, रू व ल्रु असा उच्चार करतो, त्यामुळे हे तीन स्वर वरील पैकी कोणत्याही व्याख्येत बसत नाहीत, असा आपला समज होतो. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. हे तीनही वर्ण स्वर आहेत. म्हणजेच पूर्वीच्या काळी या तीन वर्णांचा होणारा उच्चार आजच्या उच्चारांहून भिन्न, वरील तिन्ही व्याख्यांत बसणारा असा होत असणार. म्हणजेच कोणतेही उच्चारक एकमेकांच्या फार जवळ न आणता र व ल यांचा उच्चार केल्यास अनुक्रमे ऋ व ऌ हे दोन उच्चार आपल्या निर्माण करता येतात. हे नीट कळायला आपला जबडा पूर्ण उघडा. र चा उच्चार करताना आपली जीभ वर उचलली जाते व टाळूला स्पर्श करते. त्याऐवजी जीभेला वर स्पर्श करू न देता व शक्य झाल्यास तिला फारसे वर न उचलता, र चा उच्चार करण्याचा प्रयत्न करा. हे जमायला बराच वेळ लागतो, कारण आपल्याला हा उच्चार करायची मुळीच सवय नाही. ऌ च्या बाबतीतही असेच करावे. ॠ चा उच्चार करताना ऋ थोडा लांबवावा. अशाप्रकारे हे तीन स्वर आहेत, हे आपल्या लक्षात आले, व त्यांचा उच्चार कसा करायचा हेही.
अशाप्रकारे आपले स्वर आहेत- अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ॠ व ऌ
व्यंजनांचा विचार करताना आपण स्पर्श, ईशत्स्पर्श व ईशद्विवृत्त हे स्पर्शासंबंधीचे तीन प्रयत्न पाहिले. स्वरांचा विचार करताना आपण पुढील प्रयत्न विचारात घेणार आहोत-
१- विवृत्त- याचाच अर्थ वर (पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांच्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे)उच्चारकांचा एकमेकांना अजिबात स्पर्श न होणे. यात अ सोडून सर्व स्वर येतात.
२- संवृत्त- परंपरा असे मानते की, "अ हा स्वर इतर स्वरांप्रमाणे मोकळेपणाने उच्चारला जात नाही. तो उच्चारताना जिभेच्या मागच्या भागाने कंठ हे स्थान काहीसे झाकले जाते. म्हणून हा प्रयत्न संवृत्त म्हणून ओळखला जातो."
स्वरांचे आणखीही एका प्रकारे वर्गीकरण करता येते व ते म्हणजे स्वरोच्चारासाठी लागलेल्या कालानुसार केलेले ऱ्हस्व, दीर्घ , प्लुत असे वर्गीकरण. ऱ्हस्व स्वरासाठी एका मात्रेचा, दीर्घ स्वरासाठी २ मात्रांचा तर प्लुत स्वरासाठी ३ मात्रांचा कालावधी लागतो.
एक मात्रा म्हणजे किती कालावधी हे ठरवण्यासाठी प्राचीन उच्चारशास्त्रज्ञ काही प्राणी- पक्ष्यांच्या आवाजांचा आधार घेत. आपल्याला मात्र त्या तपशीलात जायची गरज नाही. ऱ्हस्व व दीर्घ उच्चारांतला फरक आपल्याला कळतोच, दीर्घ स्वराचा उच्चार आणखी लांबवला की प्लुत स्वर तयार होतो. व्यंजनांच्या वेळी मात्र अर्धमात्रेचा कालावधी लागतो असे मानले जाते, व म्हणूनच त्यांचा उच्चार पूर्ण नाही, असे म्हटले जाते.
स्वरांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे-
१)र्हस्व- अ, इ, उ, ऋ, ऌ
२)दीर्घ- आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ
३)प्लुत- आ३, ई३, ऊ३, ॠ३,ॡ३, ए३, ऐ३, ओ३, औ३
प्लुत स्वरचिह्नांतला ३ हा आकडा ३ मात्रा दर्शवतो. आपल्या लक्षात आले असेल, की दीर्घ ॡ असा काही प्रकारच अस्तित्त्वात नाही. तो संस्कृत वाङमयात कुठेही नाही, त्यामुळे तो तत्त्वत: असायला हवा वगैरे विधानांना फारसा अर्थ उरत नाही. जे आहे ते आहे, व जे नाही ते नाही.
पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र स्वरांचे वर्गीकरण वेगळ्या प्रकारे- त्यांच्या उच्चारस्थानांवरून करते. कसे ते आपण पुढील चित्राच्या सहाय्याने पाहू-
vowel chart |
(संदर्भ- http://www.umanitoba.ca/faculties/arts/linguistics/russell/138/sec5/vow-...)
येथे उजवीकडील सरळ उभ्या रेषेला लागून असलेले स्वर back vowels म्हणून ओळखले जातात. डावीकडील तिरक्या रेषेवरील स्वर front vowels म्हणून ओळखले जातात. मधल्या तिरक्या रेषेवरील स्वरांना central vowels असे म्हणतात. इथे आपले पुढील स्वर दिसत आहेत. (दीर्घ स्वरांत केवळ कालावधीचा फरक आहे, स्थानाचा नाही त्यामुळे चित्रातील बरेचसे ऱ्हस्व स्वर आहेत.)-
इ- डावीकडील तिरकी रेष वरचा कोपरा.
ए- इ च्या बरोब्बर खाली
उ-उजवीकडील सरळ उभ्या रेषेवर वरच्या कोपऱ्यात.
ओ- उ च्या बरोब्बर खाली
अ- चित्रात बरोब्बर मध्यभागी म्हणजेच मधल्या तिरक्या रेषेच्या बरोबर मध्यभागी दिसणारा उलटा e
आ- उजवीकडच्या रेषेच्या सर्वांत खालच्या कोपर्यात रेषेच्या डाव्या बाजूचा स्वर.
या खेरीज पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञ आणखीही एका प्रकारे स्वरांचे वर्गीकरण करतात ते म्हणजे monophthongs, diphthongs असे. ऐ आणि औ सोडता इतर सर्व स्वर monophthongs मानले जातात तर ऐ आणि औ हे diphthongs मानले जातात. diphthongsमधे जीभ एका स्वराकडून दुसऱ्या स्वराच्या स्थानाकडे जाते. जसे ऐ मधे अ कडून इ कडे आणि औ मधे अ कडून उ कडे. फक्त हे अ-इ किंवा अ-उ असे उच्चार एकाच syllable मधे झाले पाहिजेत अशी अट असते. तसे न झाल्यास त्यांना दोन स्वतंत्र स्वर मानण्यात येते.
अशाप्रकारे आपले वर्णमालेतले वर्ण पाहून झाले. ते पुढील प्रमाणे-
स्वर-
१) संवृत्त,ऱ्हस्व-अ
२) विवृत्त, ह्रस्व- इ, उ, ऋ, ऌ
३) दीर्घ- आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ
४) प्लुत- आ३, ई३, ऊ३, ॠ३,ॡ३, ए३, ऐ३, ओ३, औ३
व्यंजने-
१) स्पृष्ट- क् ते म्
२) ईषद्विवृत्त- श्, ष्, स्, ह्
३) ळ्
अर्धस्वर-
१) ईषत्स्पृष्ट-य्, र्, ल्, व्
आता या आपल्या सुधारित वर्णमालेबाहेरचे वर्ण पुढील भागात. तोवर हे वर्णमालेबाहेरचे स्वर कोणते असू शकतात, यावर विचार करा. येथे प्रतिसादांत एक यादी बनवली तरी चालेल.
आधीच्या लेखात आवाहन केल्याप्रमाणे वर्णमालेबाहेरचे वर्ण शोधण्याचे कुतुहल एकाही वाचकाला वाटल्याचे दिसले नाही. असो, चालायचेच!
वर्णमालेमधले वर्ण आपण आधीच्या लेखापर्यंत पाहिले. पण या वर्णमालेत आहेत ते संस्कृतभाषेमधले उच्चार. अर्थात, तेच उच्चार मराठीतही आहेत. पण मराठीत केवळ हेच उच्चार नाहीत, याहूनही अधिक आहेत. या वर्णमालेबाहेरच्या उच्चारांसाठी वेगळी अक्षरचिन्हे नाहीत. पण तरीही या उच्चारांना स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे, हे उच्चार मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत, म्हणून आता आपण त्यांचा विचार करूया.
या वर्णांचे मी चार गट करते आहे-
१) Affricates- 'च्, ज्, झ्' हा गट आणि 'च़, ज़, झ़' हा गट , या दोहोंतला फरक पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल-
पहिला गट | दुसरा गट |
वाचन | काच़ |
जेवण | वज़न |
झकास | झ़रा |
व्यंजनांवरील लेखात च्, छ्, ज्, झ् ही स्पृष्ट व्यंजने आहेत हे आपण पाहिले. ज्याला पाश्चात्य उच्चारशास्त्र plosives /stops असे म्हणते. च़, ज़, झ़ ही देखील व्यंजनेच आहेत. परंतु त्यांसाठी केला गेलेला 'प्रयत्न' वेगळा आहे. अर्थातच ही व्यंजने संस्कृतमधे नसल्याने या उच्चारांचा व पर्यायाने त्यासाठी केल्या जाणार्या 'प्रयत्ना'चा उल्लेख कुठे सापडत नाही. (किमान मला तरी सापडलेला नाही.) पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र जगातल्या सर्व मानवी भाषांतील उच्चारांचा अभ्यास करत असल्याने या तिघांचाही अभ्यास करते व त्यांना Affricates असे नाव देते व त्यांची व्याख्या - "When a 'stop' is released into a homorganic 'fricative' " अशी करते. stop म्हणजे स्पृष्ट व्यंजने व fricative म्हणजे ईषद्विवृत्त व्यंजने हे तर आपण पाहिलेच आहे. homorganic म्हणजे सारखीच उच्चारस्थाने असलेले. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादे स्पृष्ट व्यंजन त्याच्याप्रमाणेच उच्चारस्थाने असलेल्या ईषद्विवृत्तात सोडले जाते, तेव्हा Affricate निर्माण होते.
च़ निर्माण करण्यासाठी दन्त्य अघोष स्पृष्ट व्यंजन - त् हे दन्त्य अघोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच स् मधे सोडले जाते.
ज़ निर्माण करण्यासाठी दन्त्य घोष स्पृष्ट व्यंजन- द् हे दन्त्य घोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच z मधे सोडले जाते. हा z मराठीत नसल्याने तो त्याला IPA (International Phonetic Alphabet) ने नेमून दिलेल्या चिन्हानुसार दर्शवला आहे.
झ़ हा बाकी ज़ प्रमाणेच उच्चारून नंतर त्याला महाप्राण केले जाते.
छ चा मात्र छ़ असा काही बंधूवर्ण मराठीत नाही. त्याचा अभाव रोचक आहे.
२)Flaps- ड्, ढ् या एक गट व ड़, ढ़ हा दुसरा गट यांच्यातील फरक लक्षात येण्यासाठी पुढील उदाहरणे-
पहिला गट | दुसरा गट |
डमरू | माड़ |
ढोंग | वाढ़ |
हे चारही वर्ण मूर्धन्यच आहेत पण ड् व ढ् हे स्पृष्ट आहेत, तर ड़ व ढ़ यांना पाश्चात्य उच्चारशास्त्र flap अशी संज्ञा देते. या संज्ञेचे स्पष्टीकरण मी ळ् चा विचार करताना दिलेले आहेच. flap च्या वेळी दोन्ही उच्चारकांचा अत्यंत क्षणिक असा स्पर्श होतो. ळ् हा सुद्धा मूर्धन्य flap च आहे. पण तो lateral flap म्हणून गणला जातो. असो, फार तांत्रिक बाबींत शिरण्यात अर्थ नाही.
यांचा विचार करताना एक रोचक गोष्ट लक्षात येते. ड्, ढ्, ड़, ढ़ हे उच्चार शब्दांत कुठे कुठे वापरलेत याचा नीट विचार केल्यास असे लक्षात येईल, की ड् व ढ् हे नेहमी शब्दाच्या सुरुवातीलाच येतात. जसे- डमरू, डोकं, डोळा, डाळ, ढोकळा, ढाल, ढेकळ, ढोल, ढीग वगैरे.
शब्दाच्या शेवटी मात्र ड् किंवा ढ् नसतो. त्यांच्याजागी ड़ किंवा ढ़ येतात. जसे- माड़, पड़, वड़, झाड़,लाड़, ताड़, गड़, वेड़, गाड़, कढ़, वाढ़, दाढ़, काढ़ वगैरे.
शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी न येता, मधे जर ड्, ढ् आला तर मात्र २ शक्यता असतात-
पहिली म्हणजे दोन स्वरांच्या मधे ड् किंवा ढ् जर आला (मराठीभाषेत) तर त्यांचे अनुक्रमे ड़ व ढ़ होतात. (वैदिक संस्कृतात अनुक्रमे ळ् व ळ्ह् होतात हे आपण आधीच पाहिले आहे) जसे- (नुक्ता दिलेल्या अक्षराला काना-मात्रा-वेलांटी लावता येत नसल्याने ते अक्षर व त्याला लागून आलेला स्वर वेगवेगळे लिहिण्याची कसरत करावी लागते आहे, कृपया सांभाळून घ्यावे)- वड़ई, काड़ई, वड़आ, सड़आ, बेड़ऊक, खेड़ऊत, कढ़ई, काढ़आ, वेढ़आ, आढ़ं, तिढ़आ वगैरे
दुसरी शक्यता म्हणजे जर ड् / ढ् च्या आधी एखादे अनुनासिक आले तर मात्र ते मूळस्वरूपात म्हणजेच ड्, ढ् असेच राहतात. जसे- खोंड, तोंड, सोंड, भोंडला, बंड, थंड, खंड, ओंडका, पेंढा, कोंढाणा वगैरे.
म्हणजेच शब्दात ज्या ठिकाणी ड् व ढ् उच्चारले जातात, तेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जात नाहीत. आणि जेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जातात, तेथे ड् व ढ् उच्चारले जातात. या चार वर्णांचे उच्चार अशा प्रकारे नियमबद्ध आहेत. हे नीट कळायला पुढील तक्ता पहा-
सुरुवात | मध्य | शेवट | |
ड | डोके | भोंडला | तोंड |
ड़ | - | पड़ला | वड़ |
ढ | ढोपर | कोंढाणा | पेंढ |
ढ़ | - | कढ़ई | दाढ़ |
३) महाप्राण- स्पृष्ट व्यंजनांपैकी अननुसासिक म्हणजेच अनुनासिक नसलेल्या व्यंजनांच्या (क्, ग् वगैरे) महाप्राण व्यंजनांसाठी (ख्, घ् वगैरे) वेगळे अक्षरचिह्ने तर आहेतच, शिवाय त्यांना जोडाक्षर न मानता एकच अक्षर किंवा वर्ण मानले जाते. परंतू इतरही काही व्यंजनांचे व अर्धस्वरांचे महाप्राण होतात, पण त्यांना जोडाक्षर मानले जाते. जसे-ण्ह्, न्ह्, म्ह्, र्ह्, ल्ह्, व्ह्. हे वर्ण आलेले शब्द पुढीलप्रमाणे-
ण्ह्- कण्हणे
न्ह्- पुन्हा, गुन्हा
म्ह्- म्हणून
र्ह्- र्हास, कर्हाड
ल्ह्- कल्हई
व्ह्- व्हायला, केव्हा इ.
महाप्राण म्हणजे काय ते आधीच व्यंजनांवरील लेखात सांगितले आहेच, तेव्हा पुन्हा सांगत नाही.
४) पराश्रित- पराश्रित या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'दुसर्याचा आश्रय घेणारे'. हा अर्थ उच्चारशास्त्रात लावायचा झाला, तर जे वर्ण एकेकटे, आपलेआपण उमटू शकत नाहीत, ज्यांना स्वर किंवा व्यंजनांच्या आधाराची गरज पडते ते पराश्रित. स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे मात्र 'स्वयंभू' असतात. उरलेले वर्ण म्हणजे अनुस्वार, विसर्ग, उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे 'पराश्रित' असतात.
अनुस्वार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वरानंतर आलेले अनुनासिक. म्, न् आणि ण् यांचे जरी स्वयंभू अस्तित्त्व असले, तरी ते ज्यावेळी आपापले, एकटे एखाद्या शब्दात येतात तेव्हा अनुस्वाराच्या अर्थाने नाही. त्यामुळे ही तीन अनुनासिके व बाकीची ङ् व ञ् ही अनुनासिके पराश्रित मानली जातात. अनुनासिकांबद्दल व कुठे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार करावा याबद्दल आधीच्या एका लेखात माहिती दिली असल्याने, पुन्हा सांगत नाही.
विसर्ग हा देखील स्वरानंतरच येतो. स्वराशिवाय विसर्गाला अस्तित्त्व मिळू शकत नाही. विसर्गाचा उच्चार कसा करायचा ते मात्र सांगणे आवश्यक आहे. "त्या त्या स्वरानंतर येणार्या विसर्गाचा उच्चार 'ह्' असा होतो आणि पूर्वीच्या स्वराची छटा त्या ह् मधे मिसळते. जसे- देवः- देवह्, जना:- जनाह्, कवि:- कविहि, भानु:- भानुहु, नदी:-नदीहि, कवे:- कवेहे, भानो:- भानोहो वगैरे. मात्र ऐ आणि औ पुढे येणार्या विसर्गाचा उच्चार देवै:- देवैहि, गौ:- गौहु असा केला जातो" (संदर्भ- सुगम संस्कृत व्याकरण)
जिह्वामूलीय- विसर्गाच्या पुढे क् किंवा ख् आल्यास विसर्गाच्या जागी ह् चा घशातून केलेला उच्चार केला जातो. हा उच्चार जिभेच्या मुळाशी होतो असे मानले जाते, म्हणून त्याला जिह्वामूलीय असे नाव मिळाले आहे. जसे- श्यामः करोति- श्यामह् करोति|, श्यामः खादति- श्यामह् खादति| वगैरे
उपध्मानीय- विसर्गापुढे प् किंवा फ् आल्यास विसर्गाच्या जागी ओठ मिटून केलेला ह् चा उच्चार केला जातो. त्यामुळे विसर्गाच्या पुढे येणारा प् /फ् वर्ण दोनदा उच्चारला जातो. जसे- श्यामः पश्यति- श्यामह् प्पश्यति| श्यामः फलं खादति- श्यामह् फ्फलं खादति| वगैरे.
अशाप्रकारे हे वर्णमालेबाहेरचे विविध वर्ण आहेत. जरी त्यांना आपल्या लेखी वर्णमालेत स्थान मिळाले नसले (अनुस्वार व विसर्गास सोडून, पण त्यांची गणना स्वरांत केलेली आहे), तरी आपल्या दैनंदिन वापरल्या जाणार्या भाषेत त्यांचे अस्तित्व दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.
वर्णमालेच्या या विशिष्ट संरचनेचा उपयोग 'संधी'चे नियम बांधताना होतो. संधी म्हणजे काय, तर दोन उच्चारांचा संयोग झाल्यावर जो तिसरा उच्चार निर्माण होतो तो. त्यामुळे संधी उच्चारशास्त्रावर व पर्यायाने वर्णमालेवर काही अंशी अवलंबून आहेत. असो. संधी हा स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. परंतू त्याची माहिती सर्वच व्याकरणसंबंधी पुस्तकांत असल्याने वाचकांना अधिक त्रास देत नाही.
या लेखमालेने बर्याच लोकांची बरीच सहनशक्ती पाहिली. पहिल्या भागाच्या तुलनेत या आधीच्या भागापर्यंत वाचनसंख्या एक तृतीयांश झाली आहे. पण इतक्यावेळा तरी वाचन झाले या लेखाचे, याचे समाधान आहे. त्यावर बोनस म्हणून काहींनी प्रतिसाद दिले, चांगले प्रश्न विचारले, पाठिंबा दर्शवला, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे इतर वाचकांसोबत आभार मानते.
दुसर्या लेखापासून मला तक्ते द्यायचे होते. तक्ते कसे द्यायचे ते खूप मेहनत घेऊन माझ्यासारख्या तंत्र-अज्ञ व्यक्तीला दाखवून दिल्याबद्दल प्रियाली व अनु यांचे आभार. तसेच माझे भयाण अशुद्धलेखन पाहता विनायककाकांनी माझ्या लेखांची जी 'शुद्धिचिकित्सा' केली, त्याबद्दल त्यांचे आभार.
यांच्याखेरीज मला आणखीनही महत्त्वाचे आभार मानायचे आहेत, ते म्हणजे यनावाला, वरदा, अदिती या व्याकरणतज्ञांचे! एखादी व्यक्ती जेव्हा एखादी लेख'माला' लिहीत असते, तेव्हा वाचकांनी काही भागांवर विचारलेल्या काही प्रश्नांना लेखमालेतूनच, कोणत्या वेळी, कशी उत्तरे द्यायची हे त्या लेखनकर्त्या व्यक्तीचे आधीच ठरलेले असतात. तिच्या लेखमालेच्या प्रवाहाप्रमाणे हेतुपूर्वक काही विशिष्ट प्रश्न विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारे हाताळले जातात. अशावेळी दुसर्याच एखाद्या व्यक्तीने तिचा त्या विषयात कितीही व्यासंग असला तरी मधेच वाचकांच्या प्रश्नांची धडाधड उत्तरे दिली, तर लेखकाच्या लेखनाचा प्रवाह बिघडतो व त्याचा हिरमोड होतो. मी उल्लेखलेल्या व्याकरणतज्ञांनी तसे केले नाही, याबद्दल त्यांचे आभार!
अनु, प्रियाली, वरदा यांनी खर्या कुतुहलाने काही प्रश्न विचारले, छिद्रान्वेषीपणा करायचा म्हणून नाही, या कारणास्तव त्यांचेही आभार!
धन्यवाद.