वर्णमाला (स्वर)

काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व! आतापर्यंत आपण वर्णमालेतील व्यंजनांचे उच्चारस्थानानुसार व प्रयत्नांनुसार केलेले वर्गीकरण पाहिले, व प्रत्येक व्यंजनाच्या विशिष्ट जागेमागे काहीतरी कारण आहे, हेही आपल्या लक्षात आले. आता स्वरांकडे पाहू.

पहिल्या भागात मी दिलेल्या यादीत फक्त अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ॠ आणि ऌ एवढेच स्वर समाविष्ट केले होते. माझ्या या यादीबद्दल काहीजणांनी शंका व्यक्त केल्या. काहींचे म्हणणे होते की यात अं व अ: ही अक्षरेही सामावून घेतली पाहिजेत, तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ॡ अक्षर अस्तित्त्वात नसतानाही जसा दीर्घ ॠ आहे तसा दीर्घ ॡ तत्त्वत: असला पाहिजे. ही तीन अक्षरे मी स्वरांच्या यादीत समाविष्ट न केल्याची कारणे आता आपण पाहू.

आपली परंपरा म्हणजेच प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:।' अशी व्याख्या करते. याचा शब्दश: अर्थ 'आपण होऊन (इतरांच्या मदतीशिवाय) प्रकाशमान होणारे' असा होतो. व्याकरणतज्ञ प्र. शं. जोशी या व्याख्येचे स्पष्टीकरण 'स्वत:च्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांना इतर वर्णांची आवश्यकता नसते. उच्चारांच्या दृष्टीने ते स्वयंपूर्ण असतात' असे देतात. याचा अर्थ व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी इतर वर्णांची म्हणजेच स्वरांची गरज असते. याच कारणाने आपण हलन्त अक्षरांना म्हणजेच केवळ व्यंजनांना अपूर्ण मानतो.

मी शाळेत असताना या स्वर-व्यंजनांतील फरकाबद्दल मला सांगितले गेलेले स्पष्टीकरण असे- 'एखादा वर्ण घेऊन त्याचा उच्चार लांबवला असता, त्या वर्णाचा उच्चार शेवटपर्यंत तसाच राहतो की बदलतो यावरून तो वर्ण स्वर की व्यंजन हे ठरवले जाते.' म्हणजेच अ, आ इत्यादि स्वरांचा उच्चार लांबवला तरी तो अनुक्रमे अ, आ वगैरे असाच ऐकू येतो. परंतु क, ख इत्यादि व्यंजनांचा उच्चार लांबवल्यास शेवटी 'अ' ऐकू येतो. तसेच व आणि य या अर्धस्वरांचा उच्चार करताना तो अनुक्रमे 'उ-अ-अ-अ-अ-अ' आणि 'इ-अ-अ-अ-अ-अ' असा ऐकू येतो. अशा प्रकारे स्वर- व्यंजने- अर्धस्वर असे तीन वेगळे प्रकार पडतात. पण या व्याख्येत ऐ आणि औ हे दोन स्वर का यांचे स्पष्टीकरण मिळत नाही. कारण यांचा उच्चार अनुक्रमे 'अ-इ-इ-इ-इ' आणि 'अ-उ-उ-उ-उ-उ' असा होतो.

आता आपण जी तिसरी व्याख्या विचारात घेणार आहोत, ती आहे पाश्चात्य भाषाशास्त्रज्ञांनी दिलेली. व्यंजने म्हणजे काय हे पाहताना आपण पाहिले, की व्यंजनांचा उच्चार करताना दोन उच्चारकांचा एकमेकांना पूर्ण किंवा थोडासा स्पर्श होतो. स्पर्श झाला नाही तरी दोन्ही उच्चारक एकमेकांच्या इतके जवळ असतात की हवेला अडथळा निर्माण होतो. म्हणजेच व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी हवेला अडथळा निर्माण व्हायला लागतो. याच उलट स्वरांच्या वेळी मात्र कोणतेही उच्चारक एकमेकांच्या फार जवळ येता कामा नयेत. आता आपण मी दिलेल्या यादीतील सर्व स्वर एकदा म्हणून पाहुया. उ च्या वेळी ओठ जवळ येत असले, तरी व्यंजनांच्या वेळी जेवढे जवळ येतात तेवढे नाही. यावरून आपल्याला पुढील गोष्टी लक्षात येतात. -

१) व्यंजनांच्या वेळी उच्चारक एकदम जवळ येतात, स्वरांच्या वेळी अजिबात जवळ येत नाहीत, तर अर्धस्वरांच्या वेळी त्यांचे एकमेकांच्या जवळ येण्याचे प्रमाण स्वरांहून जास्त व व्यंजनांहून कमी असते.

२) अं व अ: ही दोन अक्षरे यातल्या कोणत्याही व्याख्येत बसत नाहीत. अनुस्वार वा विसर्ग यांचा उच्चार दुसऱ्या एखाद्या वर्णाची मदत घेतल्याशिवाय करता येत नाही, ते लांबवल्यावर उच्चारात फरक पडतो. तिसरी व्याख्या मात्र अं ला लागू होत नसली तरी अ: ला लागू होते, असे असूनही त्यात अ व विसर्ग असे दोन वेगवेगळे उच्चार असल्याचे पाश्चात्य भाषाशास्त्र मानते. म्हणून अं व अ: हे प्राचीन किंवा पाश्चात्य दोन्ही उच्चारशास्त्रांनुसार स्वर मानले जात नाहीत.

३) ऋ, ॠ आणि ऌ यांचा आपण आजच्या काळात अनुक्रमे रु, रू व ल्रु असा उच्चार करतो, त्यामुळे हे तीन स्वर वरील पैकी कोणत्याही व्याख्येत बसत नाहीत, असा आपला समज होतो. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. हे तीनही वर्ण स्वर आहेत. म्हणजेच पूर्वीच्या काळी या तीन वर्णांचा होणारा उच्चार आजच्या उच्चारांहून भिन्न, वरील तिन्ही व्याख्यांत बसणारा असा होत असणार. म्हणजेच कोणतेही उच्चारक एकमेकांच्या फार जवळ न आणता र व ल यांचा उच्चार केल्यास अनुक्रमे ऋ व ऌ हे दोन उच्चार आपल्या निर्माण करता येतात. हे नीट कळायला आपला जबडा पूर्ण उघडा. र चा उच्चार करताना आपली जीभ वर उचलली जाते व टाळूला स्पर्श करते. त्याऐवजी जीभेला वर स्पर्श करू न देता व शक्य झाल्यास तिला फारसे वर न उचलता, र चा उच्चार करण्याचा प्रयत्न करा. हे जमायला बराच वेळ लागतो, कारण आपल्याला हा उच्चार करायची मुळीच सवय नाही. ऌ च्या बाबतीतही असेच करावे. ॠ चा उच्चार करताना ऋ थोडा लांबवावा. अशाप्रकारे हे तीन स्वर आहेत, हे आपल्या लक्षात आले, व त्यांचा उच्चार कसा करायचा हेही.

अशाप्रकारे आपले स्वर आहेत- अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ॠ व ऌ

व्यंजनांचा विचार करताना आपण स्पर्श, ईशत्स्पर्श व ईशद्विवृत्त हे स्पर्शासंबंधीचे तीन प्रयत्न पाहिले. स्वरांचा विचार करताना आपण पुढील प्रयत्न विचारात घेणार आहोत-

१- विवृत्त- याचाच अर्थ वर (पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांच्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे)उच्चारकांचा एकमेकांना अजिबात स्पर्श न होणे. यात अ सोडून सर्व स्वर येतात.

२- संवृत्त- परंपरा असे मानते की, "अ हा स्वर इतर स्वरांप्रमाणे मोकळेपणाने उच्चारला जात नाही. तो उच्चारताना जिभेच्या मागच्या भागाने कंठ हे स्थान काहीसे झाकले जाते. म्हणून हा प्रयत्न संवृत्त म्हणून ओळखला जातो."

स्वरांचे आणखीही एका प्रकारे वर्गीकरण करता येते व ते म्हणजे स्वरोच्चारासाठी लागलेल्या कालानुसार केलेले ऱ्हस्व, दीर्घ , प्लुत असे वर्गीकरण. ऱ्हस्व स्वरासाठी एका मात्रेचा, दीर्घ स्वरासाठी २ मात्रांचा तर प्लुत स्वरासाठी ३ मात्रांचा कालावधी लागतो.

एक मात्रा म्हणजे किती कालावधी हे ठरवण्यासाठी प्राचीन उच्चारशास्त्रज्ञ काही प्राणी- पक्ष्यांच्या आवाजांचा आधार घेत. आपल्याला मात्र त्या तपशीलात जायची गरज नाही. ऱ्हस्व व दीर्घ उच्चारांतला फरक आपल्याला कळतोच, दीर्घ स्वराचा उच्चार आणखी लांबवला की प्लुत स्वर तयार होतो. व्यंजनांच्या वेळी मात्र अर्धमात्रेचा कालावधी लागतो असे मानले जाते, व म्हणूनच त्यांचा उच्चार पूर्ण नाही, असे म्हटले जाते.

स्वरांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे-

१)र्‍हस्व- अ, इ, उ, ऋ, ऌ

२)दीर्घ- आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ

३)प्लुत- आ३, ई३, ऊ३, ॠ३,ॡ३, ए३, ऐ३, ओ३, औ३

प्लुत स्वरचिह्नांतला ३ हा आकडा ३ मात्रा दर्शवतो. आपल्या लक्षात आले असेल, की दीर्घ ॡ असा काही प्रकारच अस्तित्त्वात नाही. तो संस्कृत वाङमयात कुठेही नाही, त्यामुळे तो तत्त्वत: असायला हवा वगैरे विधानांना फारसा अर्थ उरत नाही. जे आहे ते आहे, व जे नाही ते नाही.

पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र स्वरांचे वर्गीकरण वेगळ्या प्रकारे- त्यांच्या उच्चारस्थानांवरून करते. कसे ते आपण पुढील चित्राच्या सहाय्याने पाहू-

vowel chart
vowel chart

(संदर्भ- http://www.umanitoba.ca/faculties/arts/linguistics/russell/138/sec5/vow-...)

येथे उजवीकडील सरळ उभ्या रेषेला लागून असलेले स्वर back vowels म्हणून ओळखले जातात. डावीकडील तिरक्या रेषेवरील स्वर front vowels म्हणून ओळखले जातात. मधल्या तिरक्या रेषेवरील स्वरांना central vowels असे म्हणतात. इथे आपले पुढील स्वर दिसत आहेत. (दीर्घ स्वरांत केवळ कालावधीचा फरक आहे, स्थानाचा नाही त्यामुळे चित्रातील बरेचसे ऱ्हस्व स्वर आहेत.)-

इ- डावीकडील तिरकी रेष वरचा कोपरा.
ए- इ च्या बरोब्बर खाली
उ-उजवीकडील सरळ उभ्या रेषेवर वरच्या कोपऱ्यात.
ओ- उ च्या बरोब्बर खाली
अ- चित्रात बरोब्बर मध्यभागी म्हणजेच मधल्या तिरक्या रेषेच्या बरोबर मध्यभागी दिसणारा उलटा e
आ- उजवीकडच्या रेषेच्या सर्वांत खालच्या कोपर्‍यात रेषेच्या डाव्या बाजूचा स्वर.

या खेरीज पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञ आणखीही एका प्रकारे स्वरांचे वर्गीकरण करतात ते म्हणजे monophthongs, diphthongs असे. ऐ आणि औ सोडता इतर सर्व स्वर monophthongs मानले जातात तर ऐ आणि औ हे diphthongs मानले जातात. diphthongsमधे जीभ एका स्वराकडून दुसऱ्या स्वराच्या स्थानाकडे जाते. जसे ऐ मधे अ कडून इ कडे आणि औ मधे अ कडून उ कडे. फक्त हे अ-इ किंवा अ-उ असे उच्चार एकाच syllable मधे झाले पाहिजेत अशी अट असते. तसे न झाल्यास त्यांना दोन स्वतंत्र स्वर मानण्यात येते.
अशाप्रकारे आपले वर्णमालेतले वर्ण पाहून झाले. ते पुढील प्रमाणे-

स्वर-
१) संवृत्त,ऱ्हस्व-अ
२) विवृत्त, ह्रस्व- इ, उ, ऋ, ऌ
३) दीर्घ- आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ
४) प्लुत- आ३, ई३, ऊ३, ॠ३,ॡ३, ए३, ऐ३, ओ३, औ३

व्यंजने-
१) स्पृष्ट- क् ते म्
२) ईषद्विवृत्त- श्, ष्, स्, ह्
३) ळ्

अर्धस्वर-
१) ईषत्स्पृष्ट-य्, र्, ल्, व्

आता या आपल्या सुधारित वर्णमालेबाहेरचे वर्ण पुढील भागात. तोवर हे वर्णमालेबाहेरचे स्वर कोणते असू शकतात, यावर विचार करा. येथे प्रतिसादांत एक यादी बनवली तरी चालेल.