वर्णमाला- व्यंजने

गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.
ग्लॉटिस म्हणजे vocal cords मधली मोकळी जागा किंवा विवर. या लेखाच्या आधीच्या लेखात दिलेल्या चित्रात सर्वांत खाली larynx (vocal cords) असे लिहिलेले तुम्हाला दिसेल. या नावाने निर्देशित केलेला भाग लंबगोल असून तो करड्या रंगात रंगवला आहे. त्या लंबगोलाचा करडा भाग म्हणजे खरे तर एक विवर आहे. या विवरातूनच हवा वर येते.

इथवर आपण बर्‍याच पारिभाषिक संज्ञा पाहिल्या. त्यांपैकी उच्चारक्रिया (articulation), उच्चारक(articulators) तसेच larynx वगैरे पाश्चात्य उच्चारशास्त्राच्या परिभाषेतील संज्ञा आहेत. कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा मात्र आपल्या प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत. होय, आपल्याकडेही विकसित उच्चारशास्त्र अस्तित्त्वात होते. त्यानुसारच त्यांनी आपल्या वर्णमालेची रचना केली.

या लेखात आपण ३ वेगवेगळ्या गटांतल्या संज्ञा वापरणार आहोत. पहिल्या गटातल्या संज्ञा या आपल्या प्राचीन उच्चारशास्त्रज्ञांच्या असून त्या निळ्या रंगात लिहिल्या जातील. दुसर्‍या गटातील संज्ञा या पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांच्या असून त्या लाल रंगात लिहिल्या जातील. तिसर्‍या गटात २ संज्ञा आहेत- उच्चारक्रिया व उच्चारक - त्या काळ्या रंगातच राहतील.

पहिल्या गटातली सर्वांत महत्त्वाची संज्ञा म्हणजे 'प्रयत्न'- थोडक्यात उच्चारक्रिया. प्रयत्न म्हणजे उच्चारकांच्या वेगवेगळ्या हालचाली. फुप्फुसांतून हवा वर येणे हा पहिला प्रयत्न झाला, मग तो ग्लॉटीस मधून वर येणे हा दुसरा मग दोन उच्चारकांचा संयोग होणे हा तिसरा इत्यादि. या सर्व प्रयत्नांची एकत्र बनते ती उच्चारक्रिया. असा फरक प्रयत्न व उच्चारक्रिया या दोहोंतना आपण करणार आहोत. तसाच फरक 'स्थान' व उच्चारक यांत आपण करुया. दन्त्य, कण्ठ्य वगैरे यातले अनुक्रमे दन्त, कण्ठ वगैरे हे स्थान असावे. असावे यासाठी, की स्थान म्हणजे नेमके काय याचा स्पष्ट उल्लेख मला सापडलेला नाही परंतू समजावण्याच्या दृष्टीने उच्चारकापेक्षा वेगळी संज्ञा वापरण्याची गरज भासली. उच्चारक व स्थान यांत वेगळेपण काय तर, क्, ख् इ. कण्ठ्य वर्ण घेतले, तर त्यांचे स्थान कण्ठ किंवा पडजीभ हे असेल तर त्यांचे उच्चारक पडजीभ व जीभ हे दोन्ही असतील. म्हणजे जेथे मला दोन्ही उच्चारकांचा उल्लेख करायचा असेल, तेथे मी उच्चारक ही संज्ञा वापरीन व जेथे मला जीभ सोडून दुसर्‍या उच्चारकाचा उल्लेख करायचा असेल, तेथे मी स्थान ही संज्ञा वापरीन.

[आपल्या सर्वांच्या माहितीसाठी--> कण्ठ्य- velar, तालव्य- palatal, मूर्धन्य- retroflex, दन्त्य- dental, ओष्ठ्य- bilabial]

आपल्याला आठवत असेल, तर 'समज- गैरसमज' या भागात मी सर्वांना विचार करण्यासाठी वर्णमाला लिहून दिली होती व मधे एक एक ओळ सोडून तिचे गट पाडले होते. असे गट पाडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यातल्या प्रत्येक गटासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.

आपण व्यंजनांतला सर्वांत पहिला गट म्हणजे क् ते म् हे २५ वर्ण विचारात घेऊ. यांच्यासाठी आपण 'स्पर्श' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन्ही उच्चारकांचा एकमेकांना पूर्ण स्पर्श होऊन हवा त्या दोन उच्चारकांनी तयार केलेल्या भिंतीच्या आड कोंडली जाते. मग हे दोन उच्चारक एकमेकांपासून दूर गेल्यावर ही कोंडलेली हवा जोरात बाहेर पडते. या वर्णांना 'स्पृष्ट' व plosive किंवा stop असे म्हणतात.

दुसरा गट य्, र्, ल्, व् या वर्णांचा. यांच्यासाठी आपण 'ईषत्स्पर्श' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन उच्चारक एकमेकांना किंचितसा स्पर्श करतात. त्यामुळे हवा कोंडली न जाता स्पर्श करताना व त्यानंतरही बाहेर जाते. या प्रयत्नांच्या वर्णांना 'अन्तस्थ' म्हणतात. अन्तस्थ म्हणजे व्यंजन व स्वर यांच्या मधोमध उभे राहणारे, म्हणजेच अर्धस्वर- य्, र्, ल्, व् हे चार अन्तस्थ अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ या चार स्वरांशी संबंधित आहेत असे मानले जाते. पाश्चात्य उच्चारशास्त्रात मात्र केवळ य् आणि व् यांनाच semivowels ही संज्ञा दिली जाते तर र् व ल् यांना consonant मानले जाते.

तिसर्‍या गटात आहेत- श्, ष्, स्, ह्. यांच्यासाठी आपण 'ईषद्विवृत्त' हा प्रयत्न वापरतो. म्हणजे- दोन्ही उच्चारक एकमेकांना स्पर्श करत नाहीत. दोन्हींच्या मधे कळेल न कळेल अशी अगदी थोडीशीच मोकळी जागा असते. त्यामुळे stops प्रमाणे हवा कोंडली जात नाही, पण बाहेर पडायची जागा कमी झाल्याने मिळालेल्या छोट्याशा फटीतून जोरात बाहेर पडते. या वर्णांना नेमस्पृष्ट किंवा ऊष्म / fricatives असे म्हणतात.

चौथ्या गटात आहे एकटा ळ्. या ळ् च्या बाबतीत मात्र थोडा गोंधळ आहे. ळ् हे व्यंजन अभिजात संस्कृतात नसल्याने अभिजात संस्कृतवरील पुस्तकांत आपल्याला ळ् चा उल्लेख मिळणार नाही. इतकेच काय, वर्णमालेत केवळ ३३ व्यंजने आहेत, असेही सांगितले जाईल. मराठीच्या वर्णमालेत मात्र ळ् धरून ३४ व्यंजने होतात. वैदिक संस्कृत भाषेत मात्र हा ळ् आहे परंतू ड् चे एका विशिष्ट परिस्थितीतले रूप. म्हणजे काय, तर वैदिक संस्कृतात ड् हा दोन स्वरांच्या मधे आला तरच त्याचा ळ् होतो, अन्यथा ळ् चे अस्तित्व नाही. त्यामुळे ळ् चा फार कुणी विचार केलेला दिसत नाही. त्याला ड् च्या बरोबरीने मूर्धन्य स्पृष्ट ही संज्ञा दिली गेली आहे. संस्कृतशी तेवढा त्याचा संबंध नसल्यानेच त्याला वर्णमालेत शेवटचे स्थान दिले असावे. आधुनिक उच्चारशास्त्र मात्र ळ् ला flap किंवा tap ही संज्ञा देते. म्हणजे काय, तर या वर्णाच्या वेळी दोन्ही उच्चारकांचा फारच कमी वेळासाठी, क्षणिक असा स्पर्श होतो.

अशा प्रकारे आपण ४ही गट पाहिले. या चारही गटांतील वर्णांची स्थाने कण्ठ (पडजीभ), तालु, मूर्धा, दन्त, ओष्ठ, ग्लॉटीस यांपैकीच होती, फरक होता तो प्रयत्नांत.

आता आपली पुढची पायरी आहे ती स्पृष्ट वर्णांची अशी अमुक प्रकारेच रचना का केली आहे, ते पाहणे.

क् ख् ग् घ् ङ् कण्ठ्य
च् छ् ज् झ् ञ् तालव्य
ट् ठ् ड् ढ् ण् मूर्धन्य
त् थ् द् ध् न् दन्त्य
प् फ् ब् भ् म् ओष्ठ्य

आपल्या लक्षात येईल की वरील तक्त्यातील प्रत्येक आडव्या ओळीत प्रत्येकी ५ व्यंजने आहेत, व पाचही एकाच स्थानापासून निर्माण झालेली आहेत. एकाच स्थानापासून व स्पर्श या एकाच प्रयत्नांतून निर्माण झालेली असूनही ५ वेगवेगळी व्यंजने कशी काय? जर स्थानप्रयत्न एकसारखेच असतील, तर त्यातून एकमेव वर्ण उत्पन्न व्हायला हवा, नाही का? म्हणजे या ५ वर्णांत स्पर्श हा प्रयत्न सोडता इतरही प्रयत्नांचा सहभाग आहे! हे प्रयत्न कोणते ते पाहू.

आता आपण या तक्त्याचे ३ उभ्या रकान्यांत विभाजन करूया. पहिल्या रकान्यात प्रत्येक गटातले पहिले २ वर्ण येतात- क्-ख्, च्-छ्, ट्-ठ्, त्-थ्, प्-फ्. दुसर्‍या रकान्यात प्रत्येक गटातले त्यापुढील २ वर्ण- ग्-घ्, ज्-झ्, ड्-ढ्, द्-ध्, ब्-भ्. तर तिसर्‍या रकान्यात प्रत्येक गटातले शेवटचे वर्ण- ङ्, ञ्, ण्, न्, म्.

तिसर्‍या रकान्यापासून सुरुवात करू. आपण जाणले असेलच, की हे पाचही वर्ण म्हणजे अनुनासिके आहेत. अनुनासिकांच्या वेळी स्थान, प्रयत्न जरी सारखे असले, तरीही इतर व्यंजनांप्रमाणे हवा मुखावाटे बाहेर न जाता, नाकावाटे बाहेर जाते. म्हणून ही पाच व्यंजने इतरांहून वेगळी आहेत. आता येथे बर्‍याचजणांना हा प्रश्न पडतो, की एवढी ५-५ व्यंजने काय कामाची? आपण एवढी व्यंजने कुठे वापरतो? याला उत्तर असे, की आपण ही व्यंजने वापरतो, परंतू आपल्या नकळत. कशी काय बुवा? तर आपण शाळेत असताना लिखाणाचा एक नियम शिकलो होतो. अनुस्वाराच्या पुढे जे व्यंजन येईल, त्या व्यंजनाच्या गटातील शेवटचे अनुनासिक वापरावे. जसे अंक हा शब्द असल्यास अनुस्वाराच्या समोर येणारे व्यंजन क् व त्याच्या गटातील शेवटचा वर्ण ङ् . म्हणून हा शब्द अंक असा न लिहिता अ़ङ्क् असा लिहावा. तसेच काञ्चन, कण्टक, अन्त, अम्बर यांच्या बाबतीत. याचे कारण असे, की शब्द उच्चारताना अनुस्वाराच्या नंतर कोणते व्यंजन येणार हे आपल्याला ठाऊक असते, त्यामुळे जीभ त्या स्थानाच्या दिशेने निघालेलीच असते. त्यामुळे अनुनासिकाचा उच्चार त्याच स्थानावर स्पर्श करून व हवा नाकावाटे सोडून होतो. अङ्क हा शब्द उच्चारताना आपल्या जीभेचा मागचा भाग पडजीभेशी संयोग करण्यासाठी वर उचलला जातच असतो, त्यामुळे तेथेच अनुनासिकाचाही उच्चार केला जातो.

आता दुसर्‍या रकान्याकडे पाहू. येथे 'संवार' हा प्रयत्न वापरला गेला आहे. म्हणजे- वर म्हटल्याप्रमाणे स्वरयंत्र (lyrinx) मधल्या विवरातून हवा वर येते, तशी ती येत असताना स्वरयंत्राच्या झडपांची हालचाल होते. कधी त्या संकुचित होतात. त्यामुळे हवेला थोडासा अडथळा निर्माण होतो, तो पार करताना हवा त्या झडपांवर आघात करते व त्यातून एक प्रकारचा नाद/ कंपन निर्माण होते. म्हणून या प्रयत्नांतून साकार झालेली व्यंजने 'घोष' / मृदुvoiced असतात.

आता पहिल्या रकान्याकडे पाहू. येथे 'विवार' हा प्रयत्न वापरला गेला आहे. विवार हा संवार च्या बरोब्बर उलट आहे. म्हणजे येथे स्वरयंत्राच्या झडपा संकुचित न होता त्या ताणल्या जातात, व मधे पोकळी राहते, जेणेकरून हवेला कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे नाद/ कंपनही निर्माण होत नाही. म्हणून या प्रयत्नांच्या सहाय्याने उच्चारल्या गेलेल्या व्यंजनांना अघोष/ कठोर आणि unvoiced असे म्हणतात.

आता आपण पहिल्या २ रकान्यांचे २ उभे उपरकाने करू. म्हणजे आता पुढीलप्रमाणे ४ उपरकाने होतात-
१ल्या उपरकान्यात- क्,च्,ट्,त्,प्
२र्‍यात- ख्, छ्, ठ्, थ्, फ्
३र्‍यात- ग्, ज्, ड्, द्, ब्
४थ्यात- घ्, झ्, ढ्, ध्, भ्

आपल्याला नेहमी असे वाटते, की क् मधे ह् मिसळला की ख् तयार होतो वगैरे. पण प्रत्यक्षात तसे नाही. क् उच्चारताना त्याबरोबर थोडी अधिक हवा मुखावाटे बाहेर टाकली, तर ख् तयार होतो. तुलेनेने कमी हवा वापरलेल्या या व्यंजनांना 'अल्पप्राण' / unaspirated असे म्हणतात तर तुलनेने अधिक हवा वापरून उच्चारलेल्या व्यंजनांना 'महाप्राण' / aspirated असे म्हणतात. प्राण हा शब्द आपल्याकडे वायू या अर्थाने वापरला जातो हे आपल्याला माहिती असेलच. (उदा.- पंचप्राण= अपान, उदान, व्यान वगैरे नावाचे ५ वायू)

तसेच वरील ४ रकान्यांचे आहे. पहिल्या उपरकान्यांतील सर्व व्यंजने अल्पप्राण असून त्यांच्यात थोडी हवा अधिक मिसळली की दुसर्‍या उपरकान्यांतील व्यंजने तयार होतात. तसेच तिसर्‍या उपरकान्यांतील सर्व व्यंजने अल्पप्राण असून त्यांच्यात थोडी हवा अधिक मिसळली की चौथ्या उपरकान्यांतील व्यंजने तयार होतात.

आता आपल्याला क्,च्,ट्,त्,प् या ५ वर्गांच्या विशिष्ट रचनेमागचे 'शास्त्र' कळले असेलच. परंतू संवार- विवार, अल्पप्राण-महाप्राण वगैरे प्रयत्न केवळ स्पृष्ट व्यंजनांनाच लागू होतात का? याचे उत्तर आहे- 'नाही'. अंतस्थ हे घोष (संवारप्रयत्न), अल्पप्राण असतात, तर नेमस्पृष्ट हे अघोष (विवारप्रयत्न) , महाप्राण आहेत. सर्व अनुनासिके घोष (संवारप्रयत्न), अल्पप्राण असतात. ळ् चे सर्व ड् प्रमाणे. नेमस्पृष्ट हे बहुधा नेहमीच महाप्राणच असावेत, त्यांचे अल्पप्राण जोडीदार दिसत नाहीत.

आता आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल, की व्यंजनांची उच्चारक्रिया ही वाटते तेवढी सोपी किंवा एकमार्गी नसून, ती अनेक प्रयत्नांची गुंफण असते. काही व्यंजनांसाठी स्पर्श, विवार, अल्पप्राण असे प्रयत्न करावे लागतात, तर काहींसाठी ईषत्स्पर्श, संवार, अल्पप्राण वगैरे. आपण बोलताना सहज बोलून जातो, पण त्यापूर्वी आपल्या फुप्फुसांपासून मुखापर्यंत अनेक घडामोडी आपल्या नकळतच घडलेल्या असतात.

आता स्वरांबद्दल पुढील लेखात.