(मागील भागावरून पुढे चालू)
काही किरकोळ मुद्दे :
१) चुकांमधून नवनिर्मिति: संगणक चूक करू शकत नाही. पण मानवी मेंदूंत चुका करण्याची "क्षमता" असते, या क्षमतेमुळे काही क्रांतिकारक शोध लागले आहेत, असे Edward Bono यांनी म्हंटले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आपल्या Serious Creativity त खालील उदाहरणे दिली आहेत :
क) लुई पाश्चरच्या सहाय्यकाने प्रयोगासाठी घेतलेल्या कोंबड्यांना कॉलर्याच्या जंतूंचा चुकून ठरलेल्या डोसापेक्षा Weak Dose दिला. ती चूक सुधारण्यासाठी नंतर ठरलेला Strong Dose दिला पण त्याचा इच्छित परिणाम झाला नाही. त्यावरून Immunology च्या प्रक्रियेचा शोध लागला.
ख) कोलंबस (पृथ्वी गोल आहे हे माहीत असल्यामुळे) पश्चिमेकडून भारताला यायला निघाला. त्यावेळी त्याने Ptolemy चे पृथ्वीच्या परीघाचे चुकीचे मोजमाप हिशेबांत घेतले. त्याऐवजी जर त्याने Ptolemy अगोदरच्या Eratosthenes ने दिलेले खरे मोजमाप घेतले असते (जे Ptolemy ने दिलेल्या मोजमापापेक्षा बरेच ज्यास्त होते) तर तो सफरीवर निघालाच नसता. कारण जहाजांत तेवढ्या अंतरासाठी खाण्यापिण्याची तरतूद करणे शक्य नाही हे त्याच्या लक्षांत आले असते. या चुकीचा परिणाम अमेरिकेचा शोध लागण्यांत झाला.
ग) संपूर्ण Electronic उद्योग हा Lee de Forrest ने प्रयोग शाळेंतील एका निरीक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे उदयाला आला. (याबद्दलची तपशीलवार माहिती वरील संदर्भांत दिली आहे. तिचे सुलभ भाषांतर करणे अवघड आहे - निदान मला तरी).
२) सृजनशीलता - नसता उपद्व्याप? नाही. सृजनशीलतेची काही तंत्रे वापरून नेहमींच्या पद्धतीने न सुटणार्या समस्या सुटू शकतात. शिवाय आजकाल सर्वच क्षेत्रांत स्पर्धा इतकी वाढली आहे की चाकोरीबाहेरचा विचार केल्याशिवाय स्पर्धेंत टिकून राहणे अशक्य आहे.
३) आपल्यांतील निद्रिस्त सृजनशीलतेला जागृत करण्यासाठी काही उपयुक्त संवयी:
क) स्वत:च्या सृजनशीलतेच्या अकल्पित रीत्या आलेल्या अनुभवांची दैनंदिनी ठेवावी. त्यांत अनुभवाचा संपूर्ण तपशील लिहावा. हे अनुभव जसजसे साठत जातील तसतसा स्वत:च्या सृजनशीलतेविषयी आत्मविश्वास वाढत जाईल. त्यांचे विश्लेषण करून कोणत्या परिस्थितींत व कोणत्या कारणांमुळे किंवा Random Input मुळे आपल्यांतील ही शक्ति जागृत होते याचा शोध लागेल.
ख) इतरांच्या सृजनशीलतेला प्रामाणिकपणे दाद द्या. त्यामुळे तुमच्याविषयी त्यांचे मत चांगले होईल व त्यांना उत्तेजन मिळून त्यांच्याकडून अधिकाधिक निर्मिति तुमच्यापुढे सादर होईल. सहसंवेदनामुळे तुमच्याकडूनही निर्मिति होऊ लागेल.
ग) चित्रपट, साहित्यिक कलाकृति, विनोद, बोधवाक्ये, यांत आढळणार्या सृजनशीलतेची जमेल तितकी नोंद ठेवा व त्यांचा गप्पांमध्ये वापर करा. त्यामुळे गप्पाष्टकांत तुमचे स्वागत होईल. त्यांतून नवनिर्मितीसाठी तुम्हाला भरपूर सामुग्री मिळेल. (बहुतेक साहित्यिक कलाकार गप्पिष्ट होते).
असो. आता लेखमालेच्या लिखाणाविषयी थोडेसे :
प्रथम हा विषय (वाचकांची सहनशीलता लक्षांत घेऊन) प्रत्येकी साडेतीनशे ते चारशे शब्दांच्या चार भागांत संपवायचा विचार होता. पण काही ठिकाणी ज्यास्त तपशील व प्रत्येक भागांतील वैचारिक सलगता कायम ठेवणे आवश्यक वाटल्यामुळे पहिल्या दोन भागांनंतर ही शब्दमर्यादा पाळणे शक्य झाले नाही. तरीदेखील लेखमाला आवर्जून वाचणार्या उपक्रमींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होते. पण त्यामुळे प्रत्येक नवीन भाग लिहितांना अगोदरच्या प्रतिसादांतील प्रशंसेमुळे लिहायला घेतलेला भाग चांगला उतरायला हवा असे दडपणही येत होते. एकूण लेखमाला वाचनीय झाली असेल तर ती मुख्यत: या दडपणामुळे.
लिखाण करतांना उपयोगी पडलेले संदर्भ:
१) Lateral Thinking by Edward Bono
२) Serious Creativity by Edward Bono
३) क्वॉलिटी सर्कल् - ले. चन्द्रशेखर बुलाख, पुणे विभागीय उत्पादकता मंडळ.
४) मराठींतील विनोदी साहित्य, चांदोबा व पाठ्यपुस्तकांतील कथा, इत्यादि.