सृजनशीलता - भाग ६ - नवीन कल्पना सुचण्यासाठी

(मागील भागावरून पुढे)

नवीन कल्पना सुचण्यासाठी मेंदूला चालना देण्याचे काही मार्ग :
१) विचारार्थ घेतलेल्या गोष्टीचे चित्र मनश्चक्षूंसमोर आणणे : इसापाच्या ओझ्याची गोष्ट सर्वांना ठाऊक आसेल. कधी कधी बोलतांना असे चित्र मनांत असेल तर बोलणे अधिक परिणामकारक होते. एकदा एका माणसाला बाकीचे उलट सुलट सूचना देत होते. त्यामुळे नक्की काय करावे हे त्याला कळत नव्हते. आपल्या या अवस्थेचे वर्णन करतांना तो म्हणाला, " माझ्या डोक्यांत ट्राफिक जॅम झालाय."
२) चालू परिस्थितींतील अडचणी लक्षांत घेऊन पर्यायी साधने किंवा पद्धती शोधणे : तंत्रज्ञानांतील प्रगति बर्‍याच अंशी अशीच होत असते. पूर्वी वीज वितरणासाठी तांब्याच्या तारा वापरत असत. तांब्याला मोडींत चांगला भाव येत असल्यामुळे त्यांची चोरी होऊ लागली म्हणून मोडींत फारशी किंमत येणार नाही अशा ऍल्युमिनियमच्या तारा वापरायला सुरवात झाली.
३) विचाराधीन असलेल्या विषयाशी संबंधित नसलेल्या गोष्टीचा संबंध लावण्याचा प्रयत्न करणे : याला "रँडम् इन्पुट्" असे म्हणतात. ग्रह-तार्‍यांच्या गतीचा अभ्यास करणार्‍या न्यूटनला झाडावरून सफरचंद पडतांना पाहून गुरुत्वीय बलाची कल्पना सुचली असे म्हणतात. पुष्कळांना त्यांच्या मनांत घोळणार्‍या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षित ठिकाणाहून किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुसर्‍याच विषयावरील बोलण्यावरून अनपेक्षितपणे मिळते. बोनो यांच्या "सीरीयस् क्रिएटिव्हिटी" मध्ये याची काही मनोरंजक उदाहरणे दिली आहेत ती पहावी. (विस्तारभयास्तव ती येथे देता येत नाहीत).
४) एखादा भाग वगळल्याने किंवा कमी केल्याने काय होईल त्याची कल्पना करणे : बहुतेक वेळा कुठलीही गोष्ट आहे तशीच चालू ठेवण्याकडे आपला कल असतो. त्यांतील एखादा भाग वगळल्यास काय होईल यावर विचार केल्यास पुष्कळदा काही बिघडत नाही असे आढळून येईल. सुरवातीला दुचाकी वाहनांना पायाचा ब्रेक व गियर्स् होते. आता हे भाग नसलेल्या दुचाकी वापरांत आलेल्या आहेत. गियर्स् नसलेल्या चारचाकी मोटारगाड्याही येऊ लागल्या आहेत.
वानगीदाखल आणखी एक उदाहरण घेऊ:
आपण रोज जेवण घेतो. त्यासाठी आपण बाजारांतून अन्नधान्य आणतो, ते शिजवतो व शिजवलेले अन्न खातो. यांपैकी अन्न शिजवणे हा भाग वगळून टाकू. म्हणजे आपण अनधान्य न शिजवता खाणार आहोत अशी कल्पना करू. ही कल्पना व्यवहार्य बनविण्यासाठी आपण तिच्यावर भाग ४ सूचना क्रमांक ५ प्रमाणे विचार करू.
प्रथम फक्त अनुकूल मुद्दे :
(अ) वेळ, श्रम व इंधनासाठी लागणारा पैसा यांची बचत
(ब) पोषक द्रव्ये व जीवनसत्त्वे नष्ट होणार नाहीत.
(क) फारशी भांडीकुंडी लागणार नाहीत.
(ड) भांडी घासण्यासाठी नोकर माणूस लागणार नाही.
आता प्रतिकूल मुद्दे :
(अ) चावायला कठीण.
(ब) चव लागणार नाही.
(क) आपली पचनसंस्था (कदाचित) कच्चे अन्न पचवू शकणार नाही.
प्रतिकूल बाबींवर उपाय :
(अ) चावायला कठीण : खायचे अन्नधान्य 'जेवणाच्या' वेळेपूर्वी काही तास पाण्यांत भिजत ठेवावे. म्हणजे ते आपल्याला चावण्यासारखे मऊ होईल. ते वाटून त्याची पेस्ट् ही बनवता येईल.
(ब) चव लागणार नाही : चव ही मुख्यत: मसाल्यांमुळे येते. वरीलप्रमाणे भिजलेल्या अन्नासाठी वापरायला योग्य असे मसाले तयार करता येतील.
(क) आपली पचनसंस्था कच्चे अन्न पचवू शकणार नाही : वर सांगितल्याप्रमाणे भिजवल्यामुळे या समस्येची तीव्रता थोडी कमी होईल असे वाटते. शिवाय हा संवयीचा प्रश्न आहे. ही संवय हळूहळू बदलता येईल. प्रथम काही दिवस थोडे कमी शिजवलेले अन्न खाऊन ते पचवायची क्षमता आणावी. पुढे टप्प्याटप्प्याने खायचे अन्न कमी कमी शिजवत जावे व शेवटी वरील (अ) व (ब) प्रमाणे बनवलेल्या कच्च्या अन्नावर यावे. (कुठलीही जुनी संवय मोडून नवी संवय लागायला दहा आठवड्यांचा काळ लागतो असे म्हणतात).
वरील मुद्दे विचारांत घेऊन आपल्याला जेवणाच्या प्रकारांत बदल करण्याची योजना आखता येईल व आपल्या दैनंदिन जीवनांतून अन्न शिजवण्याचा भाग काढून टाकता येईल. त्याचे फायदे अनुकूल मुद्द्यांतर्गत दिलेच आहेत.
५) एखाद्या वस्तूचा, उपकरणाचा आकार, आकारमान आपल्या सोयीप्रमाणे बदलण्यासंबंधांत विचार करणे : पन्नास वर्षांपूर्वी वापरांत असलेली विजेची बटणे व सध्या वापरांत असलेली विजेची बटणे, सुरवातीचे रेडियो व नंतर आलेले ट्रांझिस्टर यांतील फरक लक्षांत घ्या.

वर दिलेल्या उदाहरणांपेक्षा अधिक चांगली उदाहरणे आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. कृपया या लेखाच्या निमित्ताने त्यांची नोंद घ्या व इच्छा असल्यास प्रतिसादांत लिहा.

पुढील भागांत आपण भन्नाट कल्पनांविषयी पाहू.

(क्रमश:)