सृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा हे एडवर्ड् बोनो यांनी आपल्या "सीरियस् क्रिएटिव्हिटी" या पुस्तकांत दिले आहे. हा एक मेंदूसाठी व्यायाम आहे. त्याचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत :

१) 'मी आता चाकोरीबाहेरचा विचार करणार आहे' असे ठरवून चालू असलेला चाकोरीबद्ध विचारप्रवाह थांबवणे. याला बोनो यांनी 'क्रिएटिव्ह् पॉज्' असे म्हंटले आहे. हे काहीसे परेडच्या अगोदर 'दक्ष' स्थितींत येण्यासारखे आहे.
२) सृजनशील विचारांसाठी एखादा विषय घेणे. यासाठी अक्षरश: कुठलाही विषय उचलणे. उदा. बॉलपेनचे टोपण, रीफिल्, यांसारख्या क्षुल्लक गोष्टींपासून ते जागतिक शांततेपर्यंत. एखादा विषय चांगला म्हणून निवडू नये. कारण आपल्याला चांगल्या वाटणार्‍या विषयांत बर्‍याच कल्पना चाकोरीबद्ध असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सुरवातीला सराव करतांना आपली तातडीची समस्या घेऊ नये. कारण तिच्यांतून लवकरांत लवकर बाहेर पडायला अधीर असल्यामुळे आपण नवीन नवीन कल्पना शोधण्यांत 'वेळ दवडायला' तयार होणार नाही. अर्थात् आपला अंतिम उद्देश आपली सृजनशीलता खर्‍या आयुष्यांतील समस्या सोडवण्यासाठी वापरणे हाच आहे. पण आपल्यांत पुरेशी क्षमता आल्यावर.
३) घेतलेल्या विषयाबद्दल 'हे असेच का असायला हवे?' किंवा 'हे असेच का करायचे?' असा आव्हानात्मक विचार करणे. अगदी सुरळीत चाललेल्या गोष्टींबद्दलही असा विचार करता यायला पाहिजे.
४) विचारार्थ घेतलेली गोष्ट वेगळी कशी असू शकेल, कशी असावी किंवा वेगळ्या तर्‍हेने कशी करता येईल याबद्दल पर्याय शोधणे. साधारणपणे कुठल्याही गोष्टीसाठी पर्याय पाहण्याची आपल्याला संवय नसते. बहुतेक गोष्टी आहे तशाच स्वीकारण्याकडे किंवा चालू ठेवण्याकडे आपली प्रवृत्ति असते. कुठलाही नवीन पर्याय चुकून डोक्यांत आला किंवा दुसर्‍या कोणी सुचवला की डाव्या मेंदूकडून तो विनाविलंब अव्यावहारिक म्हणून बाजूला सारला जातो. त्यासाठी व्यवहार्यतेबरोबरच 'लोक काय म्हणतील', 'असलेल्या पर्यायापेक्षा अधिक चांगला पर्याय असता तर तो अगोदरच व्यवहारांत आला नसता का' असाही विचार केला जातो. असे वारंवार होऊ लागले की त्याची परिणती नवीन पर्याय न सुचण्यांत म्हणजेच उजव्या मेंदूचे कार्य बंद पडण्यांत होते. ही सवय बदलली पाहिजे. त्यासाठी नवीन कल्पना/पर्याय निर्माण करतांना आपल्याला डाव्या मेंदूचे कार्य तात्पुरते बंद करण्याचा सराव करावा लागेल. म्हणजेच सुचलेल्या पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल ताबडतोब विचार करण्याचा मोह टाळावा लागेल. (आणि त्यांत कठीण काही नाही. कारण जोपर्यंत आपण तो अमलांत आणीत नाही तोपर्यंत त्याच्या परिणामांची काळजी करण्याचे कारण नाही). म्हणजे मग एकामागून एक पर्याय सुचत जातील. पर्याय नुसते मनांत ठेवण्यापेक्षा ते कागदावर लिहून काढावेत. नुसते तोंडी सांगतांना किंवा मनांत नोंद ठेवल्याने जेवढे पर्याय सुचतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पर्याय लिहितांना सुचतात असा अनुभव आहे. पर्याय तीन प्रकारचे असतात. एक, सहज सुचणारे, दुसरे डोक्याला थोडा ताण देऊन सुचणारे व तिसरे चमत्कारिक वाटणारे. उदा. चोवीस तास पाणी पुरवठा असलेल्या ठिकाणी दिवसांतून ठराविक वेळी दोन तास पाणी पुरवठा होऊ लागला तर निर्माण होणार्‍या समस्येवर तोडगा म्हणून पाण्याच्या वेळेंत सर्व कामे उरकून घेणे, पाणी साठवून ठेवणे, हे पर्याय पहिल्या प्रकारांत मोडतात. प्यायचे पाणी विकत घेणे हा पर्याय दुसर्‍या प्रकारांत मोडतो तर पाण्याऐवजी शीतपेये वापरणे, पाण्याशिवाय राहण्याचा सराव करणे, हॉटेलमध्ये गेल्यावर तेथे मिळणारे पाणी आपल्या बाटलींत भरून आणणे हे पर्याय तिसर्‍या प्रकारांत मोडतात. पर्याय लिहिण्यासाठी ठराविक अवधीच ठरवावा (समजा दहा मिनिटे). ज्यास्त अवधी असला म्हणजे ज्यास्त पर्याय सुचतात असे नाही. ठरवलेल्या अवधींत ज्यास्तींत ज्यास्त पर्याय लिहिण्याचा निश्चय करावा. त्यामुळे व्यावहारिक विचार आपोआपच कमी होईल. पर्याय जितके अधिक तितकी चाकोरीबाहेरचे विचार सुचण्याची क्षमता अधिक. आपला उजवा मेंदू किती कार्यरत झाला याचे ते निदर्शक आहे.

पर्याय शोधल्यानंतर त्यांच्या व्यावहारिकतेबद्दल विचार करण्यासाठी व त्यांना व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी (आत्तापर्यंत बंद ठेवलेला) डावा मेंदू कसा वापरावा ते पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)